तुर्कीयेत पुन्हा एर्दोगन!

Story by  पूजा नायक | Published by  Pooja Nayak • 4 Months ago
रेसेप तय्यिप एर्दोगन
रेसेप तय्यिप एर्दोगन

 

नुकत्याच तुर्कीच्या अध्यक्षपदासाठी फेर निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त करत विद्यमान अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी पुन्हा सत्ता हस्तगत केली आहे. आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत सलग ११ वेळा त्यांनी विजय मिळवला. दीर्घकाळ सत्तेत असलेल्या रेसेप तय्यप एर्दोगन यांची विरोधी पक्षनेते केमाल केलिकदारोग्लू यांच्याशी कडवी झुंज होती.

 

यापूर्वी, १४ मे रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडला होता, ज्यामध्ये कोणत्याही उमेदवाराला ५०%पेक्षा जास्त मते मिळाली नव्हती.त्यामुळे फ्रान्ससारख्या इतर काही युरोपीय देशांप्रमाणे तुर्कस्तानमध्येही अध्यक्षपदासाठी अपेक्षित मते मिळाली नाहीत, तर फेरनिवडणूक घेण्याची तरतूद आहे. त्यातही एर्दोगन यांनी बाजी मारली आहे. एर्दोगन यांना एकूण ९७टक्के मतांपैकी ५२.१ टक्के तर तुर्कियेचे गांधी म्हणून ओळखल्या जाणार्‍या केमाल किलिदारेग्लू यांच्या पक्षाला ४५.०२%मते मिळाली. .एर्दोगन पुन्हा निवडून आल्याने ते पुढील पाच वर्षे म्हणजेच २०२८ पर्यंत या पदावर राहणार आहेत.

 

एर्दोगन हे २००३ पासून तुर्कीमध्ये सत्तेवर आहेत. २०१४ पर्यंत ते देशाचे पंतप्रधान होते. २०१६ मध्ये तुर्कीमध्ये सत्तापालटाचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर २०१७ मध्ये तेव्हा पंतप्रधान असलेल्या एर्दोगन यांनी सार्वमत घेतले आणि त्याद्वारे संसदीय लोकशाही संपुष्टात आणून अध्यक्षीय पद्धत सुरू केली. याद्वारे पंतप्रधान हे पद रद्द करण्यात आले आणि तेव्हा पासून सगळी सत्ता अध्यक्षांच्या हाती एकवटली. तेव्हापासून ते देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. गेल्या २० वर्षात त्यांना देशाचे प्रमुख म्हणून ११ व्यांदा सत्ता मिळाली आहे.

 

या विजयानंतर जगाच्या सर्व स्तरातून एर्दोगन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एर्दोगन यांच्या विजयावर कतारचे (Qatar) तमीम बिन हमाद यांनी ट्विट करुन त्यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, "विजयाबद्दल अभिनंदन, नवीन कार्यकाळात यशासाठी शुभेच्छा". याशिवाय अमेरिका राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही ट्विट करुन त्यांचे अभिनंदन केले. सोबतच राजकीय कारकिर्दीत काय करणे त्यांना अपेक्षित आहे यावर भाष्य केले. “तुर्कियाचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांची पुन्हा निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.मी द्विपक्षीय मुद्द्यांवर आणि सामायिक जागतिक आव्हानांवर नाटो सहयोगी म्हणून एकत्र काम करणे सुरू ठेवण्यास उत्सुक आहे.” या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

 

कोणत्या आश्वानांवर निवडणूक लढली:

रेसेप तय्यप एर्दोगन यांनी यावेळी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Election) लोकांना अनेक आश्वासने दिली होती.ज्यात भूकंपग्रस्त भागात ६लाख ५०  हजार नवीन घरे बांधणे, महागाई दर २० टक्क्यांपर्यंत कमी करणे जी  सध्या ४४ टक्के आहे. यानंतर, त्यात २०२४  पर्यंत महागाईचा दर १०  टक्क्यांपर्यंत कमी करणे, सीरियन निर्वासितांना त्यांच्या मायदेशी परत पाठवणे आणि सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांशी समझोता करणे देखील समाविष्ट आहे.

 

विजयानंतर एर्दोगन यांचे भाषण:

निसटती आघाडी निश्चीत होताच, एर्दोगान यांनी इस्तंबूलमध्ये एका बसच्या वर उभे राहून समर्थकांना उद्देशून भाषण केले. 'या निवडणुकीत तुर्की देश हाच एकमेव विजेता आहे,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. समर्थकांनी वाहनांचे हॉर्न वाजवून तसेच राष्ट्रध्वज उंचावून जल्लोष केला.

 

केमाल यांची प्रतिक्रिया:

या निकालानंतर केमाल यांनी पराभव मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यांनी एर्दोगान यांच्यावर हुकूमशाही राजवटीचा आरोप केला. ही निवडणूक अवैध असल्याचा दावाही त्यांनी केला. आपल्या बाजूने मतदान केलेल्या सुमारे दोन कोटी ५० लाख देशवासीयांचे त्यांनी आभार मानले.