काश्मीरच्या सफरचंदांसाठी रेल्वेची विशेष सेवा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

काश्मीर खोऱ्यातील फळउत्पादकांना दिल्लीच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये आपले उत्पादन पाठवण्याची गरज लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. भारतीय रेल्वेने सफरचंद वाहतुकीसाठी दोन व्हेईकल पार्सल (एलव्हीपीएच डबे) गाडी उपलब्ध करून दिली आहे. हे व्हेईकल पार्सल आज लोड केले जातील आणि प्रत्येकी २३ मेट्रिक टन सफरचंद वाहून नेईल. मागणी वाढल्यास भारतीय रेल्वे अतिरिक्त व्हेईकल पार्सल देण्यास तयार आहे. 

उत्तर रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक आणि जम्मू विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राज्य प्रशासन, फलोत्पादन विभाग, फळउत्पादक संघटना आणि व्यापाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. मुख्य सफरचंद हंगाम सुरू होताच भारतीय रेल्वे १३ सप्टेंबरपासून बडगाम ते आदर्श नगर दररोज वेळापत्रकानुसार पार्सल गाडी सुरू करत आहे. ही गाडी वैयक्तिक व्यापारी आणि फळउत्पादकांना www.fois.indianrail.gov.in या पोर्टलवरून एक व्हेईकल पार्सल ऑनलाइन बुक करण्याची सुविधा देईल.

आदर्श नगर-बारी ब्रह्मण-बडगाम (एक्स एएनडीआय - बीबीएमएन - बीडीजीएम) या मार्गावर ८ व्हेईकल पार्सलची दैनंदिन वेळापत्रकानुसार संयुक्त पार्सल प्रॉडक्ट-रॅपिड कार्गो सर्व्हिस पार्सल गाडीची अधिसूचना जारी झाली आहे. ही ८ व्हेईकल पार्सल गाडी बडगाम रेल्वे स्थानकावरून सकाळी ६:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५:०० वाजता आदर्श नगर रेल्वे स्थानकावर पोहोचेल. हा वेळ दिल्लीच्या बाजारात सफरचंद सकाळी लवकर पोहोचण्यासाठी अत्यंत योग्य आहे.भारतीय रेल्वे मध्यवर्ती स्थानकांवर व्हेईकल पार्सल जोडण्याची सुविधाही देत आहे. पुढील मागणी मिळाल्यास अशा आणखी गाड्या चालवण्यास रेल्वे तयार आहे.

९ ऑगस्ट रोजी पंजाबमधून २१ डब्यांचा सिमेंट घेऊन जाणारी पहिली मालवाहतूक गाडी काश्मीर खोऱ्यातील अनंतनाग गुड्स शेडवर यशस्वीपणे पोहोचली. ही घटना या भागाला राष्ट्रीय मालवाहतूक जाळ्याशी जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. यामुळे काश्मीरमधील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळेल आणि काश्मीर खोऱ्यातील नागरिकांचा खर्च कमी होईल. ही बाब भारतीय रेल्वेची या भागात आर्थिक वाढीला चालना देण्याची बांधिलकी दर्शवते.

उद्धमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकवर मालवाहतूक सेवा कार्यान्वित होईल. हा रेल्वे मार्ग यंदा जूनमध्ये पंतप्रधानांनी उद्घाटन केला होता. या मार्गावर कटरा आणि श्रीनगर दरम्यान दोन वंदे भारत गाड्या धावतात. दोन्ही गाड्या १०० टक्क्यांहून अधिक प्रवासी क्षमतेने धावत आहेत. या गाड्या प्रवाशांना सुलभ, परवडणारी आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देतात आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे नव्या स्तरावर नेऊन ठेवतात.