प्रिन्स डॉ. हुसैन बुरहानुद्दीन आणि यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद
दाऊदी बोहरा समाजाच्या अध्यात्मिक प्रमुखांपैकी एक प्रिंस डॉ. हुसैन बुरहानुद्दीन यांनी नुकतीच संयुत्क अरब अमिराती अर्थात यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची भेट घेतली. ही भेट अबू धाबीतील कसर अल बहर इथे झाली. जगात माणुसकी व सहिष्णुता वाढवण्यासाठी आणि जगाच्या भल्यासाठी काय-काय करता येईल यावर यावेळी दोन्ही मान्यवरांमध्ये चर्चा झाली.
डॉ. हुसैन हे बोहरा समाजाचे आध्यात्मिक नेते सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांचे सुपुत्र आहेत. आपल्या शिष्टमंडळासोबत त्यांनी यूएईच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. यूएईत या शिष्टमंडळाचे दिमाखात स्वागत झाले. यूएईचे उपराष्ट्राध्यक्ष शेख सऊद बिन सक्र अल कासिमी यांनीही शिष्टमंडळाशी संवाद साधला.
ही भेट केवळ औपचारिक ठरली नाही. मानवसेवा आणि समाजाच्या उन्नतीसाठी काय करता येईल यावर या भेटीत काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा झाली. माणुसकीच्या भल्यासाठी एकत्र कसे काम करायचे, समाजात सहिष्णुता आणि शांतता कशी वाढवायची आणि भिन्नधर्मीय समाजा सुसंवाद कसा वाढवायचा यावर मान्यवरांमध्ये विशेष चर्चा झाली.
डॉ. हुसैन यांनी यूएईच्या लोककल्याणकारी कामांचे कौतुक केले. यूएई जगासाठी प्रेरणास्थान आहे. यूएईने आपल्या देशात बाणवलेली सहिष्णुता आणि माणुसकी यांचा अनुभव घेत शिष्टमंडळाने त्याविषयी कौतुकही केले. इस्लामची शांती आणि बंधुभावाची यूएई पुढे नेत आहे, असी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दाऊदी बोहरा समाज जगभर पसरला आहे. आपण जिथे राहतो तिथल्या लोकांची सेवा करा. तिथले नियम पाळा. सलोखा ठेवा, असे हा समाज मानतो. त्यांचे प्रमुख धर्मगुरू सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हुसैन जगभर मानवतावादी कार्य करतात. याचाच भाग म्हणून सैफी बुरहानी वेलफेयर फाउंडेशनमार्फत शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि समाजसेवेसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. धर्म आणि संस्कृती यांचा आधार घेत सद्भावनेने एकत्र आल्यास मानवतेचा मार्ग गवसतो, असा संदेश या भेटीने जगाला दिलाय.
यानंतर एमिरेट्स स्कॉलर सेंटर'च्या प्रतिनिधीमंडळाने 'अलजामिया-तुस-सैफीयाह'चे प्रॉव्होस्ट आणि 'सैफी बुरहानी चॅरिटेबल फाउंडेशन'चे प्रमुख डॉ. हुसैन बुरहानुद्दीन यांची भेट घेतली. धार्मिक संशोधन व बौद्धिक संवाद वाढवण्याविषयी या बैठकीत विशेष चर्चा झाली. या बैठकीत सर्वसमावेशी आणि संतुलित धार्मिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. समंजस व सहिष्णू समाज निर्माण करण्यासाठी ही अत्यंत आवश्यक आहे, ही बाब यावेळी अधोरेखित झाली. सांस्कृतिक व धार्मिक विविधता, सहअस्तित्व व परस्पर सन्मान यांसारख्या मूल्यांना प्रोत्साहन देण्याची अमीरातीची भूमिका अधोरेखित झाली.