डझनभर देशांना अमेरिकेत प्रवेशबंदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 19 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

अंदाजे डझनभर देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी केली असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. अफगाणिस्तान, वर्मा, काँगो, चाड, इक्वेटोरियल गिनी, एरिट्रिया, हैती, इराण, लीबिया, सोमालिया, सुदान,येमेन या देशातील नागरिकांना येत्या सोमवारपासून अमेरिकेत प्रवेशबंदी असेल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले. बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लियोन, टोगो, तुर्कमेनिस्तान, व्हेनेझुएला या देशातील नागरिकांवरही अधिक कठोर निर्बंध असतील, असे सांगण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षेसाठी या देशातील नागरिकांवर बंदी घालण्यात येत असल्याचे अध्यक्षट्रम्प यांनी म्हटले आहे.

ही यादी २० जानेवारीला ट्रम्प यांनी जारी केलेल्या कार्यकारी आदेशानंतर तयार करण्यात आली आहे. या आदेशानुसार, परराष्ट्र विभाग, गृह मंत्रालय आणि राष्ट्रीय गुप्तचर संचालक यांनी अमेरिकेविषयी शत्रुत्वाची भावना असलेल्या देशांचा अहवाल तयार करावा आणि त्या देशांतून येणाऱ्या व्यक्तींच्या प्रवेशामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो का हे ठरवावे, असा आदेश होता. पहिल्या कार्यकाळात, जानेवारी २०१७ मध्ये ट्रम्प यांनी एक कार्यकारी आदेश जारी केला होता. 

'हार्वर्ड'मध्ये बंदीच्या हालचाली 
हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी देशात येणाऱ्या जवळपास सर्व विदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हालचाली करीत आहेत. विदेशी विद्यार्थ्यांवर अमेरिकेत बंदी घालण्याच्या निर्णयाच्या संदभनिच हा नवा निर्णय घेण्याचा विचार करीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. हार्वर्ड विद्यापीठाने मॅसॅच्युसेट्समधील केम्ब्रिज येथील कॅम्पसमध्ये परदेशी विद्यार्थ्यांना वास्तव्य करू दिल्यास ही गोष्ट राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते, असे आदेशात नमूद केले आहे.

"विविध देशांतील नागरिकांचा या विद्यापीठातील प्रवेश अमेरिकेच्या हितासाठी हानिकारक आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या वर्तनामुळे ते परदेशी विद्यार्थी आणि संशोधकांसाठी एक अयोग्य ठिकाण आहे," असे ट्रम्प यांनी त्या आदेशात लिहिले आहे. ट्रम्प सरकार व हार्वर्ड यांच्यातील संघर्षाचा नवा अंक या निमित्ताने सुरू होण्याची चिन्हे आहेत. गेल्या आठवड्यात बोस्टनमधील फेडरल न्यायालयाने हार्वर्डमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रतिबंध घालण्याच्या गृह विभागाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter