प्रचंड महागाईमुळे आणि आर्थिक दुरवस्थेमुळे पाकिस्तानच्या सामान्य लोकांची परवड होत असताना देशातील शंभरपैकी ७४ जणांकडे अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याचे चित्र आहे.
त्यामुळे पाकिस्तानच्या लोकांना खर्च भागविण्यासाठी दोन दोन नोकऱ्या करण्याची वेळ आली आहे. एका सर्वेक्षणातून पाकिस्तानची दयनीय स्थिती उघड झाली असून शहरात राहणाऱ्या नागरिकांची मते यात जाणून घेतली आहेत. पल्स कन्सल्टंटने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष पाहता अनेकांना उसने किंवा कर्ज घेऊन घरखर्च चालवावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पाकिस्तानची वृत्त वाहिनी एआरवायच्या मते, पाकिस्तानात गेल्या वर्षभरापासून प्रचंड महागाई वाढली असून त्याप्रमाणात उत्पन्न वाढलेले नाही. या कारणांमुळे लोकांना अनेक आवश्यक वस्तूंवर पाणी सोडावे लागत आहे. सर्वेनुसार, मे २०२३ मध्ये ६० टक्के लोकांनी महागाईमुळे कुटुंब आथिॅक अडचणीत आल्याचे मान्य केले. मात्र यावर्षी चौदा टक्क्यांनी वाढ झाली असून ती ७४ टक्के झाली आहे.
पाकिस्तानच्या लोकांना स्वत:च्या गरजा भागविण्यासाठी दोन दोन नोकऱ्या कराव्या लागत आहेत. पाकिस्तानच्या २४० दशलक्ष लोकसंख्येच्या निम्म्या लोकांना बचत करणे कठीण जात आहे. देशातील ५६ टक्के लोकसंख्या कमावणारी असून ते कसाबसा आपला खर्च भागवत आहेत. मूळ गरजा पूर्ण केल्यानंतरही त्यांच्याकडे बचतीसाठी पैसा राहत नसल्याचे आढळून येत आहे.
सर्वेक्षण कोठे
पाकिस्तानच्या मोठ्या अकरा शहरात सर्वेक्षण करण्यात आले. जुलै ते ऑगस्ट या महिन्यांत झालेल्या सर्वेक्षणात १११० जणांची मते जाणून घेतली. त्यात १८ ते ५५ वयोगटातील लोकांना सामील करून घेतले होते. पल्स कन्सल्टंटने केलेल्या सर्वेक्षणात या लोकांशी फोनवरून संवाद साधला गेला.
त्या आधारावरच अहवाल तयार केला गेला.दरम्यान, पाकिस्तानला आपला खर्च भागविण्यासाठी परकी कर्जावर अवलंबून राहावे लागत आहे. या कारणांमुळे कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. पाकिस्तानच्या अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १६ वर्षांत पाकिस्तानच्या सार्वजनिक कर्जाचा बोजा ६१.४ लाख कोटी रुपयांपर्यंत (पीकेआर) पोचला आहे. २००८ मध्ये हे कर्ज ६.१ लाख कोटी रुपये होते. हे कर्ज या वर्षाखेरीस ६७. ५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानच्या नागरिकांची आर्थिक स्थिती
५६ टक्के
बचत न करू शकणारे नागरिक
७४ टक्के
घरगुती खर्च चालविण्यास अडचणी
६० टक्के
घरगुती खर्चात कपात
४० टक्के
कर्ज घेऊन कुटुंबीयांची देखभाल
१० टक्के
खर्च भागविण्यासाठी पार्ट टाइम नोकरी
महागाई वाढविणारी वीजदरवाढ
इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये महागाईने जनतेला चटके बसत असताना गेल्या वर्षभरात चौदा वेळेस वीज दरवाढीचा झटका सहन करावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांवर आर्थिक ओझे वाढत चालले आहे. जुलै २०२३ ते ऑगस्ट २०२४ या काळात वीज दरवाढीमुळे नागरिकांवर अतिरिक्त ४५५ अब्ज रुपयांचा अतिरिक्त बोजा पडला आहे. सर्वाधिक वीज दरवाढ मार्च महिन्यात नोंदली आणि त्यावेळी ७.०६ रुपये (पीकेआर) प्रती युनिट वाढ करण्यात आली. वीज बिल सतत वाढत असल्याने नागरिकांना खर्च सांभाळताना नाकीनऊ येत आहे.
वीज बिल न भरल्याने भावाचा खून
तत्पूर्वी वीज बिल वाढीचा मारा हा सहन करण्यापलीकडे गेल्याने कौटुंबिक वाद होत आहेत. वीज बिलावरून एका भावाने भावाचाच खून केल्याची घटना गुजरानवाला येथे घडली. दोन भाऊ त्यांच्या आईसमवेत राहत होते. परंतु वीज बिल ३० हजार रुपये आल्याने ते भरण्यावरून वाद निर्माण झाला. यावर बाचाबाची झाली आणि त्यामुळे भावाने भावाचा चाकूने खून केला.