अमेरिकेचा भारतीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! 'वर्क परमिट'चे ॲटोमॅटिक एक्सटेंशन बंद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने (DHS) स्थलांतरित कामगारांसाठी 'वर्क परमिट' (Employment Authorisation Documents - EADs) आपोआप वाढवून  देण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा हजारो परदेशी कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसणार असून, यात अमेरिकेतील एकूण कर्मचाऱ्यांमध्ये मोठा वाटा असलेल्या भारतीयांचाही समावेश आहे.

बुधवारी DHS ने जारी केलेल्या निवेदनानुसार, "जे परदेशी नागरिक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी किंवा त्यानंतर त्यांच्या EAD च्या नूतनीकरणासाठी अर्ज करतील, त्यांना आता त्यांच्या EAD साठी ॲटोमॅटिक एक्सटेंशन (आपोआप मुदतवाढ) मिळणार नाही." मात्र, ज्यांचे वर्क परमिट या तारखेपूर्वी ॲटोमॅटिक वाढवले गेले आहे, ते वैध राहतील.

DHS ने स्पष्ट केले की, हा नवीन नियम "सार्वजनिक सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा" मजबूत करण्यासाठी "तपासणी आणि छाननी" (vetting and screening) अधिक कडक करण्याच्या उद्देशाने आणला आहे, जे ट्रम्प प्रशासनाच्या कठोर इमिग्रेशन धोरणांचे प्रतिबिंब आहे.

या नवीन निर्णयामुळे बायडेन प्रशासनाचे जुने धोरण रद्द झाले आहे. बायडेन यांच्या धोरणानुसार, स्थलांतरितांना त्यांचे वर्क परमिट संपल्यानंतरही, जर त्यांनी वेळेत नूतनीकरणासाठी अर्ज केला असेल आणि ते पात्र असतील, तर ५४० दिवसांपर्यंत काम सुरू ठेवण्याची परवानगी मिळत होती.