रफिक अहमद : फाळणीच्या जखमेवर फुंकर घालणारा अवलिया!

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 2 Months ago
रफिक अहमद,
रफिक अहमद,

 

 डॉ. फिरदौस खान

काही माणसे अशी असतात जी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचतात. त्यांना स्वतःसाठी वेळच मिळत नाही. जनसेवेत ते इतके समरस होतात की त्यांना स्वतःसाठी संपत्ती किंवा सुख-सुविधा गोळा करता येत नाहीत. हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील 'इंद्री' या कस्ब्यातील रफिक अहमद हे असेच एक व्यक्तिमत्व आहे. स्वतंत्र भारतातील कर्नालचे ते पहिले मुस्लिम पदवीधर आहेत. समज आल्यापासूनच त्यांनी स्वतःला जनसेवेसाठी वाहून घेतले आणि यातच त्यांना खरा आनंद मिळतो.

फाळणीच्या काळातील आठवणी

रफिक अहमद सांगतात, "माझा जन्म १५ जुलै १९४४ रोजी हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील खेडा गावी झाला. तेव्हा हा भाग पंजाबमध्ये होता. हरियाणा राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९६६ ला झाली. माझ्या जन्माच्या वेळी देश पारतंत्र्यात होता आणि स्वातंत्र्याची चळवळ जोरात होती. मी तेव्हा खूप लहान होतो. माझे वडील मुहम्मद सद्दीक आणि आई रहमी मला त्या काळातील परिस्थितीबद्दल सांगायचे. ब्रिटिश सैनिक स्वातंत्र्यसैनिकांना कसा त्रास द्यायचे, हे मी त्यांच्याकडून ऐकले."

देश स्वतंत्र झाला आणि त्यासोबतच देशाची फाळणी झाली. पाकिस्तानातून हिंदू भारतात येत होते आणि इथले मुस्लिम तिकडे जात होते. पण अनेक मुस्लिमांनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला. "आम्ही याच मातीत जन्मलो आणि याच मातीत मिसळणार," असा त्यांचा बाणा होता.

गांधीजी आणि नेहरुंचा प्रभाव

स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींच्या सोबत असलेल्या मुस्लिम सहकाऱ्यांनी हरियाणा आणि पंजाबमध्ये जनकल्याणसाठी खूप काम केले. पानिपतचे मौलवी बका उल्लाह, कर्नालचे राव मुहम्मद हुसेन, अंबालाचे अब्दुल गफ्फार आणि फगवाण्याचे मौलवी खलीलुर्रहमान यांनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला. हे सर्वजण गांधीजींचे निकटवर्तीय होते. त्यांनी लोकांना इथेच राहण्यासाठी प्रेरित केले.

सप्टेंबर १९४७मध्ये ते महात्मा गांधींना पानिपतला घेऊन आले. गांधीजींच्या शब्दाखातर येथील मुस्लिम विणकरांनी पाकिस्तानात जाण्याचा विचार सोडून दिला. हे स्वातंत्र्यसैनिक देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याही खूप जवळचे होते. इंदिरा गांधी राव मुहम्मद हुसेन यांना 'चाचा' (काका) म्हणायच्या. ते कर्नाल जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष होते.

मस्जिद पुनर्वसनाचे कार्य

तो काळ खूप कठीण होता. रफिक अहमद सांगतात, "१९४७ ते १९५३ या काळात संयुक्त पंजाबमध्ये मुस्लिमांची संख्या मोठी होती, पण त्यांच्यासाठी मस्जिद मात्र बोटावर मोजण्याइतक्याच होत्या. बहुतांश मशिदींवर अवैध कब्जा झाला होता. पंडित नेहरूंनी येथील मुस्लिमांना आश्वासन दिले होते की त्यांच्या सुरक्षेची आणि गरजांची काळजी घेतली जाईल."

मस्जिद नसल्यामुळे मुस्लिमांची मोठी गैरसोय व्हायची. नेहरुंच्या सांगण्यावरून डीसींकडे (जिल्हाधिकारी) मस्जिद रिकामी करण्यासाठी अर्ज केला जायचा. त्यानंतर पोलीस कारवाई करून अतिक्रमण हटवले जायचे. याच पद्धतीने कब्रस्थानांवरील अतिक्रमणेही काढली गेली. पंजाब आणि हरियाणातील अनेक जुन्या मशिदी अशाच प्रकारे पुन्हा आबाद झाल्या. मोडकळीस आलेल्या मशिदींची दुरुस्ती करण्यात आली. तिथे पाणी, वीज आणि चटईची सोय केली गेली. इमाम नेमले गेले आणि पुन्हा एकदा तिथे नमाज सुरू झाली.

मोठ्यांचा सहवास आणि प्रेरणा

रफिक अहमद पुढे सांगतात, "कर्नालमध्ये नवाब अजमत अली खान यांनी एक मस्जिद बांधली होती, ज्यावर कब्जा झाला होता. १९५५ मध्ये या मशिदीतील एक खोली परत मिळाली. तिथे मौलवी बका उल्लाह, राव मुहम्मद हुसेन, अब्दुल गफ्फार असे दिग्गज नेते जमायचे. मी तेव्हा तिथेच राहायचो आणि त्यांना चहा-पाणी द्यायचो. या महान स्वातंत्र्यसैनिकांच्या सहवासात राहिल्यामुळे माझ्या मनातही देश आणि समाजाच्या कल्यासाठी काम करण्याची भावना जागृत झाली."

समाजसेवेचा वसा

जुन्या मशिदींसोबतच अनेक नव्या मशिदीही उभारल्या गेल्या. १९६० मध्ये कर्नाल आणि इंद्री येथे ईदगाह बांधल्या गेल्या. रफिक अहमद म्हणतात, "माझी संपूर्ण हयात याच कामांमध्ये गेली. अनेकदा घराची कामे बाजूला पडायची. मी स्वातंत्र्यसैनिकांनी सुरू केलेल्या चळवळीचा एक भाग बनलो होतो. हळूहळू माझ्यासोबत अनेक लोक जोडले गेले. मजरूह सुलतानपुरी यांच्या शब्दांत सांगायचे तर-

'मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर,
लोग साथ आते गए और कारवां बनता गया'

शिक्षण आणि सलोखा

"मी अभ्यासात हुशार होतो. बीएची पदवी मिळवणारा मी माझ्या शहरातील पहिला मुस्लिम ठरलो. त्याकाळी मुस्लिमांमध्ये शिक्षणाकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. मी पूर्ण प्रयत्न केले की मुस्लिमांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे," असे ते सांगतात.

त्यांचा साखर (शक्कर) बनवण्याचा व्यवसाय होता. काम संपले की ते समाजकार्यात रमायचे. अनेकदा मृत्यू झाल्यावर दफनभूमीचा प्रश्न उभा राहायचा. त्यांनी प्रशासनाशी बोलून कब्रस्तान बांधले. रफिक अहमद अभिमानाने सांगतात, "अशा कामांमध्ये हिंदू बांधवांनीही आम्हाला खूप मदत केली. आम्ही अनेक मदरसेही सुरू केले, जेणेकरून मुलांना धार्मिक शिक्षण मिळेल. कारण धार्मिक शिक्षण नसेल तर मशिदींसाठी इमाम कुठून मिळणार?"

(लेखिका शायरा, कथाकार आणि पत्रकार आहेत)