संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यातील शिखर परिषद अखेर निष्फळ ठरली आहे. शुक्रवारी अलास्का येथे झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत युक्रेनमधील युद्ध संपवण्यावर कोणताही करार होऊ शकला नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
बैठकीनंतर ट्रम्प यांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांमध्ये स्पष्ट चर्चा झाली, परंतु युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या मुद्द्यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी, "जर पुतीन यांनी शांततेसाठी सहमती दर्शवली नाही, तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील," असा इशारा दिला होता. बैठक अयशस्वी झाल्याने आता अमेरिका रशियावर कोणते निर्बंध लादणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या बैठकीच्या अपयशामुळे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत होणारी संभाव्य त्रिपक्षीय बैठकही आता संकटात सापडली आहे. अलास्का बैठक यशस्वी झाल्यासच दुसरी बैठक आयोजित केली जाईल, असे ट्रम्प यांनी आधीच स्पष्ट केले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशिया आपल्या जुन्या मागण्यांवर ठाम राहिल्याने या चर्चेत कोणताही मार्ग निघू शकला नाही. युक्रेनने रशियाने दावा केलेल्या चार प्रदेशांमधून आपले सैन्य मागे घ्यावे आणि नाटोमध्ये सामील होण्याची योजना कायमस्वरूपी सोडावी, या प्रमुख अटी रशियाने ठेवल्या आहेत, ज्या युक्रेनला मान्य नाहीत.
या हाय-प्रोफाइल बैठकीच्या अपयशाने आंतरराष्ट्रीय समुदायाची निराशा झाली आहे. युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी या बैठकीतून काहीतरी सकारात्मक निष्पन्न होईल, अशी आशा अनेकांना होती. मात्र, आता हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.