"शांतता करार करा, नाहीतर..."; पुतीन यांना ट्रम्प यांचा थेट इशारा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या अलास्का भेटीपूर्वी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना थेट इशारा दिला आहे. "जर पुतीन यांनी शांततेसाठी सहमती दर्शवली नाही, तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यासोबतच, त्यांनी पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत त्रिपक्षीय बैठकीचा प्रस्तावही ठेवला आहे.

शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी अलास्का येथे होणाऱ्या बैठकीत अपेक्षित परिणाम न मिळाल्यास आर्थिक निर्बंध लादण्याचा इशारा ट्रम्प यांनी यापूर्वीच दिला होता. मात्र, आता त्यांनी परिणामांचे स्वरूप स्पष्ट करण्यास नकार दिला आहे. "ते गंभीर परिणाम निर्बंध असतील की शुल्क?" असे विचारले असता, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "मला ते सांगण्याची गरज नाही. पण परिणाम खूप गंभीर असतील".

झेलेन्स्कींसोबत दुसरी बैठक?
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की, अलास्का येथील पहिली बैठक यशस्वी झाल्यास, तातडीने दुसरी बैठक आयोजित करण्याची त्यांची योजना आहे. या दुसऱ्या बैठकीत पुतीन आणि झेलेन्स्की यांच्यासोबत आपण स्वतः उपस्थित राहू इच्छितो, असे ते म्हणाले. "पहिली बैठक यशस्वी ठरल्यास, आम्ही जवळजवळ तात्काळ दुसरी बैठक घेऊ," असे ट्रम्प यांनी नमूद केले.

दुसरीकडे, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अलेक्सी फादेव यांनी स्पष्ट केले आहे की, मॉस्कोची भूमिका गेल्या वर्षापासून बदललेली नाही. रशियाने दावा केलेल्या चार प्रदेशांमधून युक्रेनने सैन्य मागे घ्यावे आणि नाटोमध्ये सामील होण्याची योजना अधिकृतपणे सोडावी, या दोन अटी पुतीन यांनी युद्धविरामासाठी ठेवल्या आहेत.

दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले की, या शिखर परिषदेत युद्धविराम घडवून आणण्याची अमेरिकेची इच्छा असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प, झेलेन्स्की आणि इतर युरोपीय नेत्यांच्या आभासी बैठकीनंतर मॅक्रॉन बोलत होते.