पॅलेस्टाईन राष्ट्राला आमचा विरोधच, नेतन्याहूंनी UN मध्ये पुन्हा दाखवला आडमुठेपणा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

 

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू पुन्हा एकदा एकटे पडल्याचे दिसले. अनेक देशांनी त्यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला, तर दुसरीकडे त्यांनी पॅलेस्टिनी राष्ट्राच्या स्थापनेला 'राष्ट्रीय आत्महत्या' म्हणत आपला आडमुठेपणा कायम ठेवला.

फ्रान्स, ब्रिटन आणि इतर पाश्चात्य देशांनी पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता दिल्यानंतर काही दिवसांनी, नेतन्याहू यांनी या शांततापूर्ण प्रयत्नांना 'ज्यूंच्या हत्येला दिलेले बक्षीस' म्हटले. ते म्हणाले, "इस्रायल तुम्हाला आमच्या घशात दहशतवादी राष्ट्र घालू देणार नाही."

अमेरिकेने व्हिसा नाकारल्यामुळे, पॅलेस्टिनी राष्ट्रपती महमूद अब्बास यांना एक दिवस आधीच व्हर्च्युअल माध्यमातून आपले म्हणणे मांडावे लागले होते. त्यांनी आपल्या भाषणात हमासच्या हल्ल्याचा आणि ज्यू-विरोधी विचारांचा निषेध केला होता. असे असूनही, नेतन्याहू यांनी अब्बास यांना मिळणाऱ्या पाश्चात्य समर्थनाची खिल्ली उडवली आणि पॅलेस्टिनी प्राधिकरणाला "पूर्णपणे भ्रष्ट" म्हटले.

एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 'युद्धविरामाचा करार झाला आहे' असे संकेत देत होते, तर दुसरीकडे नेतन्याहू गाझामध्ये 'काम पूर्ण करण्याची' म्हणजेच हल्ले सुरूच ठेवण्याची शपथ घेत होते. यातून इस्रायल आपल्या सर्वात जवळच्या मित्राच्याही मतांचा आदर करत नसल्याचे दिसून आले.

युद्ध गुन्ह्यांच्या आरोपांवरून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या (ICC) अटक वॉरंटचा सामना करत असलेल्या नेतन्याहूंना न्यूयॉर्कला पोहोचण्यासाठीही वेगळा हवाई मार्ग निवडावा लागला. त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच अनेक देशांच्या प्रतिनिधींनी सभात्याग करून आपला निषेध नोंदवला.