-सेराज अनवर / पटना
बिहारमधील मुस्लीम मुला-मुलींनी दहावी आणि बारावी बोर्डांच्या परीक्षेत आपला दबदबा कायम राखला आहे. त्यामुळे समाजातील इतर मुलांसाठी ते प्रेरणास्थान बनले आहेत. इंटरमिजिएट आर्ट्समध्ये अररियाच्या मोहाद्दसा हिने टॉप केले होते. नुकतेच दहावीचे निकाल जाहीर झाले. त्यात बिहारमधील शेखपुरा येथील रुमान अश्रफ बोर्डात पहिला आला आहे. एका आठवड्यामध्ये या दोन यशोगाथा समोर आल्यामुळे मुस्लीम समाजात आनंदाचे वातावरण आहे.
रुमानचे वडील नजीबुर रहमान शेखपुरा जिल्ह्यातील अहियापूर येथील एका सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. रुमानचे मूळ गाव चकंद्रा. मध्यमवर्गीय कुटुंबातील रुमानने इस्लामिया हायस्कूल येथून शालेय शिक्षण पूर्ण केले.
इस्लामिया हायस्कूलचे सेक्रेटरी शमवील हैदर रुमानचे कौतुक करतांना म्हणतात की, “रुमानला सुरुवातीपासूनच अभ्यासात प्रचंड गती होती. पहिला आल्यामुळे त्याने केवळ शाळेचेच नव्हे तर जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. यासाठी तो नक्कीच अभिनंदनास पात्र आहे. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो.”
परीक्षेत ४८९ गुण आणि ९७.८ टक्के मिळवत रुमानने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. परीक्षेच्या तयारीसाठी शाळेतील शिक्षकांसोबतच पालकांचेही सहकार्य मिळाल्याचे रुमान सांगतो. परीक्षेच्या तयारीसाठी तो रोज पाच ते सहा तास स्व-अभ्यास करत असे. अभ्यासात स्वयंअध्ययन हे एक मोठे शस्त्र आहे आणि हेच शस्त्र अंगीकारून यश मिळवल्याचे तो सांगतो. परीक्षेच्या तयारीसाठी त्याने काही विषयांची शिकवणीही लावली होती. मात्र स्व-अभ्यासाला तो अधिक वेळ द्यायचा. आकलनात काही अडचण आलीच तर ती सोडवण्यासाठी इंटरनेटची मदत घेतल्याचे तो आवर्जून सांगतो.
इतर विद्यार्थी मित्रांना काय संदेश देशील, असे विचारल्यावर रुमान म्हणाला, “खूप अभ्यास करावा. परिश्रम घेतले की यश नक्की मिळते.”
देशसेवेची भावना
भारतीय लष्करात अधिकारी होऊन देशाची सेवा करण्याची रुमानची इच्छा आहे. “देशसेवेसाठी लष्करापेक्षा उत्तम क्षेत्र असूच शकत नाही. त्यामुळे सैन्य अधिकारी बनून देशसेवा करणे आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न आहे.”
सैन्याधिकारी बनण्यासाठी त्याला पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकादमीची म्हणजे एनडीएची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. त्यासाठी कसून अभ्यास करणार असल्याचे सांगायलाही तो विसरला नाही.
(अनुवाद : छाया काविरे)