- विदुषी गौर
सारीया अब्बासी यांचा जन्म आणि बालपण उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील राम जानकी नगर मोहल्ल्यात झाले. त्यांचे वडील डॉ. तहसीन अब्बासी ऑल इंडिया रेडिओचे अनुभवी प्रसारक आहेत. आई रेहाना शमीम कनिष्ठ माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सारीयाला प्रोत्साहन आणि मूल्यांनी परिपूर्ण असे वातावरण दिले.
डॉ. तहसीन अब्बासी यांनी मुलाखतीत सांगितले की, सारीया लहानपणापासूनच सैन्यदलाकडे आकर्षित होती. सैन्यातील नातेवाईक, शौर्याच्या कथा आणि देशासाठी उभे राहणारे सैनिक यांनी तिच्या मनावर खोल छाप सोडली. “तिला नेहमी सैनिकांचा गणवेश आवडायचा,” असे त्यांनी एका यूट्यूब संवादात सांगितले.
सैन्याची आवड असूनही सारीयाने सुरुवातीला पारंपरिक शैक्षणिक मार्ग स्वीकारला. गोरखपूरच्या जीएन नॅशनल अकादमीतून शालेय शिक्षण पूर्ण केले. नंतर गाझियाबादच्या आयएमएस येथून जेनेटिक इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक. पदवी मिळवली. पदवीनंतर नामांकित कंपन्यांकडून, अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोकरीच्या संधी तिच्यापर्यंत आल्या. परंतु तिला काहीतरी कमी असल्याचे जाणवले.
सारीयाला कधीच डेस्कवर बसून नऊ ते पाच नोकरी करायची नव्हती. “मला ऑफिसात बसून काम करताना स्वतःला पाहता येत नव्हते. माझे मन नेहमी देशसेवेत होते.” असे तिने एका मुलाखतीत सांगितले.
दुसरी नोकरी सोडल्यानंतर तिने धाडसी निर्णय घेतला. यूपीएससीच्या संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) परीक्षेला बसण्याचे तिने ठरवले. तिला हव्या असलेल्या अभ्यासक्रमात महिलांसाठी फक्त १२ जागा होत्या. प्रचंड मेहनत, रात्रीचे जागरण आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर तिने दुसऱ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली. सेवा निवड मंडळाच्या (एसएसबी) मुलाखतींना सामोरे गेले. या मुलाखती मानसिक, शारीरिक आणि नेतृत्वाच्या कसोट्या पाहणाऱ्या असतात. हा आणखी एक आव्हानात्मक टप्पा तिने यशस्वीपणे पार केला.
चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (ओटीए) मध्ये प्रवेश मिळणे हा तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण होता. ९ सप्टेंबर २०१७ मध्ये कडक गणवेशात तिने ओटीएच्या पासिंग आउट परेडमध्ये सहभाग घेतला. देशसेवेची शपथ घेताना तिचे कुटुंब भावूक झाले होते.
कॅप्टन सारीया अब्बासी यांची कहाणी देशसेवेची स्वप्ने पाहणाऱ्या हजारो तरुणींसाठी प्रेरणा आहे. तिचा धाकटा भाऊ तम्सील अहमद अब्बासी सांगतो की, तिच्या प्रवासाचा कुटुंबाला खूप अभिमान आहे. “मुलींसाठी आव्हाने आहेत,” असे सारीया एका मुलाखतीत म्हणाली. “पण ज्या धाडस करतील, त्यांच्यासाठी सैन्य ही सुवर्णसंधी आहे.” अनेक मुलाखतींमधून तिने कुटुंबाच्या पाठिंब्याचे महत्त्व अधोरेखित केले. “माझी आई केवळ पालक नव्हती, तर माझी पहिली शिक्षिका होती. वडिलांनी माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला, त्यामुळे मला पंख मिळाले.” असे ती म्हणाली.
कॅप्टन सारीया यांची कहाणी भारतीय सैन्याच्या बदलत्या चेहऱ्याची साक्ष आहे. लढाऊ समर्थन भूमिका, विमानचालन आणि अग्रभागी तुकड्यांचे नेतृत्व यात महिलांसाठी आता अधिक संधी उपलब्ध होत आहेत. सारीयाची कहाणी वृत्तपत्रांपासून सोशल मीडियापर्यंत पसरत आहे. सारीया अब्बासी छोट्या गावातून आलेली, देशाच्या सीमेवर उभी असलेली धैर्याची आणि सामर्थ्याची प्रतीक बनली आहे. ती सिद्ध करते की, देशभक्तीला परवानगीची गरज नाही.
कॅप्टन सारीया अब्बासी यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) तैनात असताना ड्रोन-नाशक पथकाचे नेतृत्व केले. हवाई धोक्यांना तोंड देण्याचे तिचे कौशल्य दिसून आले. सध्या ती अरुणाचल प्रदेशातील संवेदनशील भागात देशाच्या सीमांचे रक्षण करत आहे. तिथे ती एल-७० विमानविरोधी तोफ हाताळते.
- विदुषी गौर
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter