मोहम्मद लुकमान अली : तरुणाईसाठी बनलाय कुस्तीतील रोलमॉडेल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
तरुणाईसाठी कुस्तीतील रोलमॉडेल मोहम्मद लुकमान अली
तरुणाईसाठी कुस्तीतील रोलमॉडेल मोहम्मद लुकमान अली

 

मोहम्मद लुकमान अली हे नाव आज भारतीय कुस्ती क्षेत्रात एक प्रेरणादायी उदाहरण म्हणून ओळखले जाते. जामिया मिल्लिया इस्लामियामध्ये समाजकार्य (मास्टर ऑफ सोशल वर्क) शिकणाऱ्या लुकमानने शिक्षण आणि खेळाचा समतोल साधत यश कसे मिळवता येते, हे दाखवून दिले आहे.

उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील मोहरका पट्टी या छोट्या गावात एका सामान्य कुटुंबात मोहम्मद लुकमान अली यांचा जन्म झाला. दोन बहिणी आणि चार भावांमध्ये ते सर्वात धाकटे आहेत. रेल्वे कर्मचारी असलेले त्यांचे वडील छज्जो अली यांनी त्यांना नेहमीच पाठिंबा दिला. त्यांच्या आई जायदा अली यांनी त्यांना धार्मिक शिक्षण दिले.
 

नोव्हेंबर २०२२ मध्ये उत्तर प्रदेशातील नंदिनी नगर येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक जिंकून लुकमानने केवळ आपली प्रतिभा दाखवली नाही, तर युवा पिढीला एक नवा मार्गही दाखवला. त्यांची यशोगाथा अनेक कारणांमुळे तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. 

शिक्षण आणि खेळ
लुकमानने एकाच वेळी उच्च शिक्षण आणि खेळ यांचा समतोल राखला. जामियामध्ये शिक्षण घेत असतानाच कुस्तीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून त्यांनी त्यांच्यातील समर्पण आणि वेळ व्यवस्थापनाचे कौशल्य दाखवून दिले. शैक्षणिक पात्रता आणि क्रीडा कौशल्य दोन्ही महत्त्वाचे आहेत, असा संदेश ते तरुणांना देतात. 

कठोर परिश्रम 
दररोज सकाळी सराव, कठोर प्रशिक्षण आणि अथक प्रयत्नांमुळे त्यांना यश मिळाले. त्यांची दिनचर्या अतिशय शिस्तीची आणि काटेकोर होती. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, असे ते आपल्या अनुभवातून सांगतात.

ध्येयाप्रती दृढता
लुकमानचे यश त्यांच्या दृढ निश्चयाचे फळ आहे. त्यांनी कधीही आव्हानांना हार मानली नाही आणि आपल्या ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करत राहिले. ही दृढता तरुणांसाठी एक महत्त्वाची शिकवण आहे.

सामाजिक जाणीव
समाजकार्य शिकणारा विद्यार्थी असल्याने लुकमान समाजाप्रती आपली जबाबदारी देखील जाणतात. खेळाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा ते प्रयत्न करतात आणि इतर तरुणांनाही प्रेरणा देतात.

नम्रता आणि सकारात्मक दृष्टिकोन
राष्ट्रीय स्तरावर यश मिळवूनही लुकमान यांची नम्रता कौतुकास्पद आहे. ते नेहमी आपल्या प्रशिक्षक, कुटुंब आणि विद्यापीठाचे आभार मानतात. त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन तरुणांसाठी अनुकरणीय आहे.

आव्हानांचा सामना
खेळ आणि शिक्षण या दोहोंमध्ये समतोल राखणे सोपे नसते. लुकमानने या आव्हानाचा यशस्वीपणे सामना केला आणि दोन्ही क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांचा संघर्ष तरुणांना शिकवतो की आव्हाने यशाचा मार्ग मोकळा करतात.
 

वेळ व्यवस्थापन
लुकमानचे जीवन तरुणांना वेळ व्यवस्थापनाचा महत्त्वाचा धडा शिकवते. दिवसाचे नियोजन करून खेळ आणि शिक्षण या दोहोंमध्ये यश कसे मिळवता येते हे ते सांगतात.

कुस्ती हा वैयक्तिक खेळ असला तरी लुकमान सांघिक भावनेचे महत्त्व जाणतात. ते आपल्या सहकाऱ्यांना मदत करतात आणि त्यांना प्रोत्साहन देतात. आजच्या तरुणांसाठी लुकमान एक आदर्श आहेत. त्यांची यशोगाथा सांगते की प्रतिभा, मेहनत आणि दृढ निश्चयाने कोणतेही ध्येय गाठता येते. 

ते केवळ एक यशस्वी खेळाडू नाहीत, तर समाजाप्रती आपली जबाबदारी समजणारे जागरूक नागरिक देखील आहेत. यश केवळ एका क्षेत्रापुरते मर्यादित नसावे, हे त्यांच्या यशातून तरुणांना शिकायला मिळते. व्यक्तीचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा आहे. लुकमानची कथा येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत राहील. तसेच त्यांचे बालपणीचे मित्र आरिफ चौधरी यांनी त्यांना खूप प्रोत्साहन दिले.

लहानपणापासूनच कुस्तीशी नाते
लुकमान यांचा कुस्तीशी संबंध लहानपणापासूनच होता. त्यांचे वडील देखील एक पैलवान होते, ज्यांनी आपल्या मुलाला या खेळाचे बारकावे शिकवले. दररोज पहाटे ४ वाजता उठून आखाड्यात सराव करणे, कठोर दिनचर्येचे पालन करणे आणि सातत्यपूर्ण परिश्रमामुळे ते एक कुशल पैलवान बनले. त्यांची तांत्रिक समज आणि डावपेचांची सखोल माहिती यामुळे त्यांना स्पर्धांमध्ये आघाडी मिळाली. 

मेरठ येथे झालेल्या उत्तर प्रदेश राज्य कुस्ती स्पर्धेत लुकमान यांनी ८२ किलोग्राम गटात भाग घेतला. त्यांनी आपल्या सर्व सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. अंतिम सामन्यात त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला तांत्रिक कौशल्याने हरवले. कठोर परिश्रम आणि समर्पणाला पर्याय नाही हे त्यांच्या विजयाने हे सिद्ध केले.
 

कुटुंबाचा भक्कम पाठिंबा
लुकमान यांच्या यशाचे श्रेय त्यांचे प्रशिक्षक आणि कुटुंबालाही जाते. या सर्वांनी त्यांना प्रत्येक पावलावर साथ दिली. त्यांच्या प्रशिक्षकाने त्यांची प्रतिभा ओळखली आणि ती अधिक विकसित केली. कुटुंबाने आर्थिक अडचणी असूनही त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. 

हा विजय केवळ एका स्पर्धेचा विजय नाही, तर युवा खेळाडूंसाठी तो प्रेरणास्रोत ठरला आहे. कुस्तीमध्ये यश मिळवण्यासाठी शिस्त आणि संयम खूप महत्त्वाचा आहे असे लुकमान मानतात. आपल्या ध्येयापासून कधीही विचलित होऊ नये, असा सल्ला ते युवा पैलवानांना देतात.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव झळकवले 
उत्तर प्रदेश कुस्ती संघाने लुकमान यांच्या या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. त्यांच्या विजयामुळे राज्यात कुस्तीबद्दल तरुणांचा कल वाढला आहे. अनेक युवा पैलवान त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन या खेळात पुढे येत आहेत. 

लुकमान यांचे पुढील लक्ष्य राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचे आहे. त्याचबरोबर आता लुकमान अली ऑलिंपिक पदक जिंकण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत आणि त्यांना तिथेही यश मिळेल अशी आशा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून देशासाठी पदक जिंकण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

वडिलांकडून मिळालेली प्रेरणा
माजी रेल्वे कर्मचारी असलेल्या छज्जो अलींनी, गढ मुक्तेश्वरमधील त्यांच्या पोस्टिंगदरम्यान, अनेक खेळाडूंना भेटले. त्या खेळाडूंना कुस्तीतील त्यांच्या कामगिरीमुळे नोकरी मिळाली होती. लुकमान सांगतात, "माझे वडील नेहमी त्यांच्या विभागातील यशस्वी खेळाडूंच्या कथा घरी घेऊन येत असत." 

 
यातून लुकमान यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी आपल्या घरापासून सुमारे दहा किलोमीटर दूर असलेल्या स्थानिक मातीच्या आखाड्यात सराव करण्यास सुरुवात केली. छत्रसाल स्टेडियममध्ये प्रवेश मिळाल्यानंतर लुकमान मॅटवर सराव करू लागले. गावपातळीवरील स्पर्धांमधील त्यांच्या पराक्रमाने परिसरातील ज्येष्ठांचे लक्ष वेधून घेतले.

२०१८ मध्ये पहिले यश 
लुकमान सांगतात, "गावच्या प्रशिक्षकांनी मला अशा मॅट्सवर माझे कौशल्य विकसित करायला सांगितले, जिथे आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू सराव करतात." यामुळे ते दिल्लीला आले आणि २०१८ मध्ये त्यांना छत्रसाल स्टेडियमच्या पवित्र हॉलमध्ये प्रवेश मिळाला. 

ते पुढे म्हणतात, "याच मॅट्सवर ऑलिम्पियन आणि खेळातील इतर महान खेळाडू देशाला गौरव मिळवून देण्यासाठी तासंतास सराव करतात. जेव्हा मी पहिल्यांदा त्यावर पाऊल टाकले, तेव्हा माझे डोळे फिरले." लुकमान एका लहान मुलाप्रमाणे उत्साहात सांगतात. 

थायलंडमध्ये यश
भारताची जर्सी परिधान केलेल्या पैलवानांसोबत तासंतास सराव करून आणि २०२३ मध्ये जागतिक दर्जाच्या खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, लुकमान थायलंडला गेले. तिथे त्यांनी एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले आणि आपल्या गटात सहावे स्थान पटकावले. 

आवाज द व्हॉईसशी बोलताना लुकमान पुढे सांगतात, "अनेक पालक मला फोन करून सांगतात की मी त्यांच्या मुलांना कुस्तीमध्ये येण्यासाठी प्रेरित करावे, जेणेकरून तेही आपले नाव कमावू शकतील." तसेच लुकमान सांगतात की त्यांचे आदर्श सुशील कुमार आणि रशियन ऑलिंपिक पदक विजेता अब्दुल राशिद आहेत.
 

लुकमान अली यांनी पुढे सांगितले की, "मला खेळाडूंच्या उच्च स्तरावर अनेक पदके जिंकायची आहेत." कराटे चॅम्पियन जाबीर अन्सारीचे लक्ष्य जगात सर्वोत्तम बनणे आहे. सध्याचे यूपी स्टेट चॅम्पियन असलेले लुकमान मे महिन्यात वाराणसी येथे होणाऱ्या खेलो इंडिया कुस्ती चॅम्पियनशिपची तयारी करत आहेत. 

जुलैमध्ये आशियाई इनडोअर चॅम्पियनशिप आहे. पण त्यांचे लक्ष २०२५ च्या पॅरिस ऑलिंपिकवर आहे. "जर पॅरिस नाही, तर २०२८ ऑलिंपिकमध्ये निश्चितपणे मला भारताचा झेंडा उंचावायचा आहे." असे ते आपल्या कुस्ती तंत्रात प्रभुत्व मिळवण्यासाठी पुन्हा मॅटवर जाण्यापूर्वी म्हणतात.

- अर्सला खान
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter