पसमांदा समाजाचे रक्षक डॉ. फैयाज अहमद फैजी
उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील भृगु आश्रमातल्या छोट्या गावात डॉ. फैयाज अहमद फैजी यांचा जन्म झाला. आज देशभरात फैयाज अहमद यांनी ओळख मिळाली असली तरी त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. आयुष चिकित्सक, लेखक, स्तंभलेखक, अनुवादक आणि सामाजिक कार्यकर्ता अशा अनेक भूमिकांतून त्यांनी पसमांदा समाजाला आवाज दिला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणांत ‘पसमांदा मुसलमान’ असा उल्लेख करतात तेव्हा त्यामागे फैजी यांची वर्षानुवर्षांची मेहनत, संघर्ष आणि संकल्प दिसतो.
फैयाज फैजी यांचे वडील शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्याकडून फैजी यांना समाजसेवेची प्रेरणा आणि वारसा लाभला आहे. लहानपणापासून फैजी यांचं पसमांदा समाजाला नवी दिशा देण्याचं स्वप्न होतं. शिक्षणासाठी आईने दागिने विकल्याचे ते सांगतात. त्यावेळी त्यांची आई म्हणायची, “माझा मुलगा वडिलांसारखा शिक्षक नाही तर समाजाचा रक्षक व्हावा.” याच शब्दांनी फैजी यांच्या जीवनप्रवासाला दिशा मिळाली.
फैयाज फैजी म्हणतात, “शाळेत एकदा मित्रासोबत जेवताना काही मुलांनी आमच्यासोबत जेवण वाटून घेण्यास नकार दिला. त्या क्षणी जाणवलं की जातीय भेदभाव हा फक्त पुस्तकांतला विषय नाही. तो मागास वर्गाच्या आयुष्यातील कटु सत्य आहे. त्या घटनेने मनात मशाल पेटवली आणि मी पसमांदा समाजाचा आवाज बनण्याचा संकल्प केला.”
पुढे ते म्हणतात, “आईने नेहमीचं मला वाईट गोष्टीपासून दूर राहण्याचं बळ दिलं. आजही ती माझी काळजी घेते. माझ्या आईमुळेच मला हे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. मी पसमांदा समाजाचा आवाज बनण्यात तिचा मोठा वाटा आहे.”
वक्फ, कलम 370 आणि पसमांदा
देशात आणि समाजात घडणाऱ्या गोष्टींवर फैजी यांचं बारीक लक्ष असतं. कलम 370 रद्द झाल्यावर त्यांनी ठणकावून सांगितलं, “जम्मू-काश्मीरमधील पसमांदा समाजासाठी ही नवी संधी आहे.” वक्फ दुरुस्ती कायदा २०२५ बद्दल त्यांचं केलेलं विश्लेषण समाजाविषयी त्यांचा वेगळा दृष्टिकोन अधोरेखित करतो. ते म्हणतात, “या कायद्यामुळे वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता येईल. आणि त्याचा फायदा मुस्लिम समाजातील खऱ्या गरजूंना म्हणजेच पसमांदांना मिळेल.”
पसमांदा समाजाला वक्फ मंडळात सहभाग मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. सामाजिक न्यायाच्या संस्थांमध्ये ९० % प्रतिनिधित्व पसमांदा मुस्लिमांच्या प्रतिनिधिंना मिळाव्यात तेव्हाच खरा न्याय मिळेल, असं त्यांचं ठाम मत आहे.
समान नागरी कायदा (UCC)चं समर्थन करतानादेखील त्यांनी नवीन दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला.. हा कायदा अजून लागू झाला नसला तरी हा कायदा देशाची एकता बळकट करेल. सर्वांना समान हक्क मिळतील, असं त्यांचं मत आहे. विशेषतः पसमांदा महिलांना पारंपरिक कायद्यांमुळे होणारा त्रास कमी होईल.
फैजी यांना पसमांदा समाजासाठी फरिश्ता (देवदूत) म्हणणं चुकीचं ठरणार नाही. फैजी यांच्या प्रयत्नांनी पसमांदा समाजात मोठे बदल झाले आहेत. एके काळी पसमांदा समाजाला घर मिळणं कठीण होतं. मात्र फैजी यांच्यामुळे आज वक्फ मंडळ कायदा २०२५ मध्ये त्यांना सहभाग मिळाला आहे. यापूर्वी अल्पसंख्याक किंवा मुस्लिम संस्थांमध्ये पसमांदा समाजाला प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. मात्र आता परिस्थिती सुधारली आहे.
सुधारणावादी विचारांमुळे आणि सत्य परिस्थिती मांडल्यामुळे अनेकवेळा फैयाज फैजी यांना अनेकदा विरोधाला सामोरे जावे लागते. बरेचदा त्यांना धमकीचे फोन येतात. याविषयी ते म्हणतात ते म्हणतात, “मला वारंवार धमकीचे फोन आणि संदेश येतात. एकदा असाच धमकीचा फोन आला होता. तेव्हा आई रडू लागली होती. पण मी थांबलो नाही. आईने दागिने विकून मला शिकवलं, तिच्या डोळ्यात अश्रू मला मान्य नाहीत. समाजातील अन्याय संपेपर्यंत मी थांबणार नाही.”
फैयाज फैजी हे सातत्याने लिखाणदेखील करतात. त्यांचे अनेक लेख नामांकित वृत्तपत्र आणि मासिकांत प्रसिद्ध होतात. टीव्ही चॅनल्सवरील विविध चर्चांमध्ये सहभागी होतात आणि आपलं मत निर्भीडपणे मांडतात.. नुकतीच त्यांनी एका पुस्तकाची घोषणा केली आहे. या पुस्तकामध्ये पसमांदा समाजाची वेदना, संघर्ष आणि नव्या बदलांची कहाणी असेल. हे पुस्तक ऐतिहासिक दस्तऐवज तर असेलच, शिवाय नव्या पिढीसाठी ते मार्गदर्शकही ठरेल.
डॉ. फैयाज अहमद फैजी केवळ व्यक्ती नाहीत, ते एक सामाजिक चळवळ बनले आहेत.. त्यांनी दबलेल्या पसमांदा समाजाला आवाज दिला असून सामाजिक न्यायाची लढाई लढली आहे.बदल केवळ घोषणा देऊन घडत नाही तर दृष्टिकोनातून घडवता येतो, हे त्यांनी आपल्या कृतींमधून दाखवून दिलं आहे.
जाती, धर्म, वर्ग यापलीकडे जाऊन माणुसकी आणि न्यायाची भाषा बोलणाऱ्या फैयाज फैजी यांच्यासारख्या नागरिकांची समाजाला गरज आहे. त्यांच्यासारखे नागरिकच बलशाली आणि समृद्ध भारताची पायाभरणी करू शकतात. डॉ. फैयाज फैजी यांचं अव्याहतपणे सुरू असलेलं कार्यच समाजाला नवी दिशा आणि युवकांना प्रेरणा देणार आहे.
- अर्सला खान
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter