पद्म पुरस्कार : ‘या’ मुस्लिम मान्यवरांसह १३९ जणांचा सन्मान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 Months ago
पद्म पुरस्कार स्वीकारताना मान्यवर
पद्म पुरस्कार स्वीकारताना मान्यवर

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतच राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांचे वितरण केले. केंद्र  सरकारने ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार २०२५ ची यादी जाहीर केली होती. यामध्ये १३९ व्यक्तींना हा प्रतिष्ठित सन्मान जाहीर झाला होता. पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे. हा पुरस्कार कला, साहित्य, सामाजिक कार्य, विज्ञान, क्रीडा आणि सार्वजनिक कार्य यासारख्या क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात. 

काल वितरित केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये काश्मिरी शालविणकर फारूक अहमद मीर आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. सय्यद ऐनुल हसन यांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय महाराष्ट्रातील १४ जणांना पद्म पुरस्कार मिळालं आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे.  

फारूक अहमद मीर यांना पद्मश्री पुरस्कार 
जम्मू-काश्मीरमधील फारूक अहमद मीर यांना त्यांच्या काश्मिरी शालविणकामातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. श्रीनगरच्या खैवान भागात जन्मलेल्या मीर यांचे पूर्वजही या हस्तकलेत निपुण होते. हस्तकलेचा वारसा त्यांना तिथूनच मिळाला आहे. शिक्षणाचा अभाव असताना त्यांनी कौटुंबिक परंपरा जपत कानी शालविणकामाला नवं रूप दिलं. त्यांनी हिंदी, उर्दू आणि संस्कृत कॅलिग्राफीला कानी विणकामात समाविष्ट करून नव्या डिझाइन्सची निर्मिती केली.

त्यांच्या या कार्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला. त्यांच्या मुलांनीही उच्च शिक्षण घेऊन या हस्तकलेत नवं तंत्रज्ञान आणलं. मीर यांना राष्ट्रीय पुरस्कार (2007), संत कबीर पुरस्कार (2014), जम्मू-काश्मीर सरकारचा राज्य पुरस्कार (2019) यासह अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यांचा हा सन्मान काश्मिरी हस्तकलेला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देणारा आहे.

प्रा. सय्यद ऐनुल हसन यांचाही गौरव  
प्रा. सय्यद ऐनुल हसन यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. ऐनुल  हसन हे इंडॉलॉजी, भारतीय संस्कृती, तुलनात्मक साहित्य आणि पर्शियन साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठाचे कुलगुरू असलेल्या हसन यांनी पंचतंत्र कथांद्वारे भारतीय ज्ञान परंपरेचा प्रसार केला आहे. त्यांनी इराणी कवयित्री फरोग फर्रोखझाद यांच्यावरील संशोधनासाठी पीएचडी मिळवली आणि 100 हून अधिक प्रबंधांचं मार्गदर्शन केलं आहे. 

ऐनुल  हसन यांनी इंडो-अफगाण संबंध, पश्तो चेअर स्थापन आणि अलिगान रिसोर्स सेंटर सुरू करून सांस्कृतिक एकतेची पायाभरणी केली. त्यांनी फॅशन डिझायनिंग, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, शिक्षक प्रशिक्षण आणि कायदा शिक्षण यासारख्या अभ्यासक्रमांना प्रोत्साहन दिलं. महिला शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन यासाठी त्यांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. त्यांना राष्ट्रपती पुरस्कार (2017), अफगाणिस्तान सरकारचा शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार (2019) आणि इराणचा पर्शियन कवी पुरस्कार (2007) यासह अनेक सन्मान मिळाले आहेत.

महाराष्ट्रातील यांना मिळाला पद्म पुरस्कार 
महाराष्ट्रातील एकूण १४ व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये मनोहर जोशी, पंकज उधास आणि ⁠शेखर कपूर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार दिला गेला. तर कला क्षेत्रात भरीव योगदान दिल्यामुळे पाच जणांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये अच्युत पालव, ⁠अशोक सराफ, अश्विनी भिडे देशपांडे, ⁠राजेंद्र मुजुमदार आणि वासुदेव कामत यांचा समावेश आहे. तर अरुंधती भट्टाचार्य यांना व्यापार आणि उद्योगासाठी, चैतराम देवचंद पवार यांना समाजसेवेसाठी, जसपिंदर नरुला यांना गायनासाठी, मारुती चितमपल्ली यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात योगदान देण्यासाठी, सुभाष शर्मा यांना कृषी क्षेत्रासाठी, ⁠डॉ. विलास डांगरे यांना वैद्यकीय सेवेसाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. 

अशोक सराफ  पद्मश्री पुरस्काराने सन्मानित 
अशोक सराफ यांनी गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.. ‘अशी ही बनवा बनवी’, ‘धूम धडाका’, ‘दे दणा दण’, ‘नवरा माझा नवसाचा’ यासारख्या मराठी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आणि हिंदी चित्रपट ‘करण अर्जुन’, ‘सिंघम’, ‘येस बॉस’ आणि ‘हम पांच’ मालिकेतील त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या कायम स्मरणात आहे. मराठी रंगभूमी आणि टेलिव्हिजनवरही त्यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहे. 

वयाच्या ७८ व्या वर्षीही ते मराठी मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. महाराष्ट्र भूषण (2023), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (2022), 11 महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, 5 फिल्मफेअर पुरस्कार यासह अनेक सन्मान मिळालेले सराफ यांचा हा पद्मश्री सन्मान मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter