नौशाद अख्तर
खुर्शीद अहमद यांनी बिहारच्या सांस्कृतिक वारशाला पुन्हा जीवनदान दिले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे पाटणा साहित्यिक आणि कलात्मक गतिविधींचे जीवंत केंद्र बनले. खुर्शीद हे बिहारच्या सांस्कृतिक आत्म्याचे पुनरुज्जीवक आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे कव्वाली, कविता, साहित्य आणि सूफी संगीत या पारंपरिक कला पुन्हा लोकजीवनात झळकत आहेत. त्यांच्या उपक्रमांनी या काळातील अभिव्यक्तींना नवीन ऊर्जा आणि आधुनिक महत्त्व मिळाले.
पाटण्यात मोठी साहित्यिक सभा, मुशायरा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम होतो, तेव्हा त्यामध्ये खुर्शीद यांचा प्रभाव स्पष्ट दिसतो. त्यांनी पाटणा साहित्य महोत्सवाचे (पीएलएफ) संस्थापक आणि सचिव म्हणून त्यांनी बिहारमध्ये सांस्कृतिक वारसा निर्माण केला आहे. हा महोत्सव आता भारतातील अग्रणी साहित्य व्यासपीठांपैकी एक आहे.
बिहार केवळ राजकीय क्रांती, पुरातत्वीय चमत्कार किंवा ऐतिहासिक चळवळींची भूमी नाही. तर ही कविता, सूफीवाद, नजाकत आणि साहित्यिक वारसाचा शतकानुशतके समृद्ध झालेली माती आहे. या भागाने आपल्याला बुद्ध, कबीर, गुरु गोबिंद सिंग आणि शेरशाह सूरी यांसारखे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे दिली.
आजच्या डिजिटल काळात हा समृद्ध सांस्कृतिक वारसा कुठेतरी लुप्त होण्याचा धोका आहे. त्यामुळे खुर्शीद अहमद यांनी हा वारसा जपण्याची आणि त्याला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी स्वीकारली. ते अॅडव्हांटेज ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालकही आहेत. हा ग्रुप बिहार आणि झारखंडमध्ये अग्रणी इव्हेंट मॅनेजमेंट आणि पीआर कंपनी आहे.
व्यावसायिक शिस्त आणि कलात्मक संवेदनशीलता यांचा मिलाफ करून खुर्शीद त्यांच्या कार्यक्रमांना भावनिक तसेच सांस्कृतिक अनुभवात रूपांतरित करतात. त्यांच्यासाठी हे फक्त कार्यक्रम नाहीत, तर भावनिक आणि आध्यात्मिक प्रवास आहेत. त्यांच्या या कार्याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली.
दुबईतील नामांकित शेख रशीद ऑडिटोरियममध्ये नुकत्याच झालेल्या मुशायरात ‘अंदाज-ए-बयान’मध्ये त्यांना जगातील १४ नामांकित कवींसोबत सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार दुबईतील दानशुर शेख सुहैल मोहम्मद झरुनी यांनी प्रदान केला. त्यांनी खुर्शीद यांचे योगदान फक्त इव्हेंट मॅनेजमेंट नसून बिहारपासून खंडांतील सांस्कृतिक चळवळ असल्याचे म्हटले.
खुर्शीद यांनी पाटण्यात राबवलेल्या साहित्यिक उपक्रमांच्या प्रचंड यशामुळे त्यांना ही मान्यता मिळाली. विशेष म्हणजे त्यांनी बुकमायशोद्वारे भारतातील पहिल्या तिकीटविक्री मुशायराचे आयोजन केले. हा प्रयोग क्रांतिकारी ठरला. या कार्यक्रमाला शेकडो लोकांनी प्रत्यक्ष हजेरी लावली, तर ३.५ कोटींपेक्षा जास्त लोकांनी कार्यक्रम ऑनलाइन पाहिला. खुर्शीद यांनी उद्घाटन प्रसंगी केलेल्या भाषणाने त्यांचे व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवले.
खुर्शीद अहमद यांचा दृष्टिकोन पारंपरिक इव्हेंट नियोजनापलीकडे आहे. त्यांनी कवितेला सार्वजनिक संवादाचा स्त्रोत बनवला. पीएलएफ अंतर्गत त्यांनी ‘रुबरू’ या संवादात्मक कविता मालिकेची सुरुवात केली. या मालिकेत मनोज मुंतशिर, ए.एम. तुराझ, अलोक श्रीवास्तव, शबीना अदिब आणि अझम शाकरी यांसारखे नामांकित कवी सहभागी झाले. या कार्यक्रमाचे रुपांतर कविता, विचार आणि प्रेक्षकांमधील संवादात झाले.
या सांस्कृतिक पुनरुज्जीवनात खुर्शीद यांना डॉ. ए.ए. हई (अध्यक्ष), फरहत हसन (उपाध्यक्ष), फैजान अहमद (कार्यक्रम प्रमुख), फैहीम अहमद, इजाज हुसैन, शिवजी चतुर्वेदी, राकेश रंजन, बी.के. चौधरी, चंद्रकांता खान, फरहा खान आणि अनुप शर्मा यांसारख्या समर्पित टीमने साथ दिली. त्यांचे अथक प्रयत्न बिहारच्या संस्कृतीला नक्कीच नवा आयाम देईल.
खुर्शीद यांचे कार्यक्रम भव्य असतातच परंतु ते प्रेक्षकांना भावनिक साद सुद्धा घालतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे १३ ऑगस्टला पाटण्यातील होटल रॉयल बिहार येथे झालेला मुशायरा. या मुशायराला जयपूर, हैदराबाद आणि झारखंडमधून ६०० पेक्षा अधिक मान्यवर उपस्थित होते. आठ तास चाललेला हा कविता आणि संस्कृतीचा उत्सव इतका प्रभावी होता की उपस्थितांनी त्याला ‘बिहारचा जश्न-ए-रेख्ता’ म्हटले. खुर्शीद 'काम पूजेसारखे करावे' या तत्वावर चालतात. हा दृष्टिकोन त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमातून दिसून येतो. लॉजिस्टिक्सपासून निमंत्रणापर्यंत प्रत्येक गोष्ट जवळजवळ अचूकतेने नियोजित होते.
अलीकडेच १३ एप्रिलला बँकिपूर क्लब, पाटणा येथे झालेला सूफी संगीताचा कार्यक्रम हा खुर्शीद यांच्या यशाचा अजून एक नमुना आहे. हा कार्यक्रम किंवदंतू उस्ताद नुसरत फतेह अली खान यांना समर्पित होता. या कार्यक्रमात देहरादूनच्या रहमत नुसरत ग्रुपने सहभाग घेतला. हा ग्रुप दुबई, ब्रिटनसह इतर ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर होतो. सरवजीत तमता यांच्या नेतृत्वाखाली हा ग्रुप आहे. त्यांची गायकीला सरस्वतीची आशीर्वाद मानले जाते. हा कार्यक्रम भावनिक आणि आध्यात्मिक अनुभव ठरला.
या कार्यक्रमाला अनेक स्तरावरील मान्यवर उपस्थित होते. संगीताची शोभा, प्रेक्षकांची नजाकत आणि अचूक अंमलबजावणी यांनी बिहारच्या सांस्कृतिक मुळांना बळकटी मिळाली. पीएलएफचे अध्यक्ष डॉ. सत्यजित सिंग म्हणाले, “सूफी संगीत आणि कविता आत्म्याला शांतीची अनुभूती देते. हा बिहारच्या मातीतील जुना सांस्कृतिक वारसा आहे. खुर्शीद अहमद यांसारख्या उत्साही व्यक्तींमुळे पाटणा साहित्य महोत्सव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला.”
आत्तापर्यंत पीएलएफने १५ हून अधिक यशस्वी उपक्रम राबवले. हा महोत्सव फक्त कवितेवरच नाही, तर बौद्धिक देवाणघेवाण, विचारमंथन आणि समाज सहभागावर लक्ष केंद्रित करण्यासाठी होता. हा कार्यक्रम सांस्कृतिक समृद्धी आणि सार्वजनिक संवादाचा केंद्रबिंदू बनला. खुर्शीद अहमद यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांनी त्यांच्या उपक्रमांमधून दाखवले की उत्साह आणि उद्देश एकत्र आल्यास समाज बदलण्याची ताकद निर्माण होते. त्यांची दृष्टी, नियोजन कौशल्य आणि साहित्यावरील प्रेमाने बिहारचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवा चेहरा घडवला. त्यांच्या कामामुळे पाटणा फक्त ऐतिहासिक राजधानी नाही, तर साहित्यिक आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा प्रकाशस्तंभ बनत आहे.