देवकिशोर चक्रवर्ती
"स्त्रिया नेहमीच जगात सर्वात शक्तिशाली राहिल्या आहेत," असे प्रसिद्ध फॅशन डिझायनर कोको शॅनेल यांनी एकदा म्हटले होते. हे विधान आजही सत्य आहे. स्त्रियांमध्ये शक्ती, चिकाटी आणि चारित्र्याची दृढता नैसर्गिकरित्याच असते. "तुम्ही जे करत आहात ते योग्य असेल तेव्हा त्याबद्दल कधीही घाबरू नये," असे नागरी हक्क चळवळीच्या कार्यकर्त्या रोझा पार्क्स यांनी एकदा म्हटले होते. या महान महिलांचे प्रत्येक शब्द हलिमा खातून यांच्यासाठी तंतोतंत लागू होतात.
पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हिंगलगंज परिसरातील उत्तर मामूदपूर, सुंदरबनमधील एक दुर्गम गाव. येथे एका गरीब कुटुंबात हलिमा खातून यांचा जन्म झाला. रोजंदारीवर जगणाऱ्या या कुटुंबात, त्यांचे आई-वडील विडी बनवून कुटुंबाचा खर्च चालवत. पण गरिबीतही, त्यांनी हलिमाच्या शिक्षणाला पाठिंबा दिला आणि तिला कोलकाता विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित केले. आपल्या गावातील विद्यापीठाची पायरी चढणारी हलिमा खातून ही पहिली महिला होती.
.jpeg)
पण हा मार्ग इतका सोपा नव्हता. त्यांना अनेक प्रतिकूल परिस्थितींना सामोरे जावे लागले, तीव्र जहरी सहन करावी लागली. पण त्या दृढ मानसिकतेच्या होत्या. सर्व अडचणींशी लढा देत त्यांनी आपले ध्येय साध्य केले. या जिद्दी स्त्रीने हार मानली नाही. आपल्या आठवणींना उजाळा देताना हलिमा सांगतात, "जेव्हा मी गाव सोडून विद्यापीठात शिकण्यासाठी कोलकात्याला आले, तेव्हा ते एक प्रकारचे बंडच होते. गावात माझ्यावर तीव्र टीका झाली. ते स्वाभाविकच होते, कारण मी विद्यापीठात शिकायला जाणारी गावातील पहिली मुलगी होते."
शिक्षणादरम्यानच, हलिमा यांनी समाजातील वंचित लोकांसाठी, विशेषतः महिलांच्या उन्नतीसाठी काम करण्यास सुरुवात केली. प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःला सिद्ध करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांसाठी त्या मार्गदर्शक म्हणून पुढे आल्या. सामाजिक विकासाच्या क्षेत्रात त्यांचे पहिले महत्त्वपूर्ण काम म्हणजे सुंदरबन परिसरातील मच्छीमार समाजातील महिलांच्या पाठीशी उभे राहणे. त्यांनी या महिलांच्या विविध समस्यांमध्ये स्वतःला झोकून दिले आणि सातत्याने त्यांच्या पाठीशी उभ्या राहून लढा दिला.

'इच्छा असेल तर मार्ग मिळतो' असे म्हणतात. आणि याच तीव्र इच्छेने हलिमा खातून यांनाही मार्ग दाखवला. २००९ मध्ये, त्यांना 'ॲक्शनएड इंडिया' या सामाजिक संस्थेसोबत काम करण्याची संधी मिळाली. ही संस्था उत्तर २४ परगणा जिल्ह्यात मुस्लिम महिलांसाठी काम करत होती. त्यांच्याच शब्दात, "गावे अत्यंत मागासलेली होती. बहुतेक लोकांकडे मतदार ओळखपत्र किंवा रेशन कार्डही नव्हते. हे हक्क कसे मिळवायचे, याबद्दल ते अजिबात जागरूक नव्हते. आमच्या समाजातील मुली शाळेत जातात, असे दृश्य अत्यंत दुर्मिळ होते. जेव्हा आम्ही काम सुरू केले, तेव्हा महिला अन्यायाविरुद्ध कधीच तोंड उघडत नसत. त्या नेहमीच भीती आणि प्रभावशाली लोकांच्या दबावाखाली दबलेल्या आवाजात जीवन जगत."
पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. 'ॲक्शनएड इंडिया'च्या मदतीने त्यांनी महिलांमध्ये नियमित संवाद आणि चर्चा सुरू केली. विविध वेळी इतर जिल्ह्यांतील महिलांसोबत प्रशिक्षण आणि अनुभव देवाणघेवाणीची संधीही त्यांनी उपलब्ध करून दिली.
.jpeg)
'आवाज द व्हॉइस'शी बोलताना हलिमा सांगतात, "आमच्या या हिंगलगंज परिसरात आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासलेले लोक राहतात. अनेक प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितींना तोंड देत आम्हाला काम करावे लागते. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक महिला 'हसनाबाद-हिंगलगंज मुस्लिम महिला संघ' (HHMMS) अंतर्गत संघटित झाल्या आहेत. १५ ग्रामपंचायतींमध्ये किशोरवयीन मुलींचे गट तयार झाले आहेत."
शिक्षणाच्या क्षेत्रात हलिमा आणि त्यांचे सहकारी नियमितपणे काम करत आहेत. माहितीच्या अधिकाराखाली (RTI) त्यांनी आतापर्यंत २१५ अर्ज दाखल केले आहेत. यामुळे ५५० मुलींना शिष्यवृत्ती मिळाली आहे. इतकेच नाही, तर बालविवाह रोखण्यात आणि मुलींची तस्करी थांबवण्यात त्यांची भूमिका उल्लेखनीय आहे. त्यांनी आतापर्यंत शंभरहून अधिक बालविवाह रोखले आहेत आणि अनेक किशोरवयीन मुलींना तस्करीतून वाचवले आहे.
समाजाच्या विकासात, विशेषतः वंचित घटकांसाठी, हलिमा आणि त्यांची संघटना अविरत प्रयत्न करत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत ७०० विडी कामगारांना स्वतःची ओळखपत्रे मिळाली आहेत. हसनाबाद-हिंगलगंज परिसरातील बहुसंख्य लोक विडी कामगार आहेत. त्यांना परिश्रमाच्या तुलनेत अत्यंत कमी मोबदला मिळतो.

गरिबीमुळे, अनेकदा पालक आपल्या लहान मुलींचे लग्न लावून देण्यास भाग पडतात. लग्नानंतर गरीब कुटुंबातील मुलीला नवऱ्याच्या घरी थोडे पौष्टिक अन्न मिळेल, अशी त्यांची भाबडी आशा असते. बहुतेक वेळा ही आशा फोल ठरते. कमी वयाच्या मुलींचे विवाह रोखण्यासाठी हलिमा यांना अनेकजण ‘दबंग’ म्हणतात. पोलिसांना सोबत घेऊन त्यांनी असे अनेक विवाह रोखले आहेत.
'आवाज द व्हॉइस'शी बोलताना, हिंगलगंजच्या पहिल्या पदव्युत्तर पदवीधर हलिमा खातून यांच्या आवाजात थोडी निराशा जाणवते. "मी अनेक वर्षे प्रयत्न करत आहे. आम्ही संघटितपणे काम करतो. आमच्या या पूरप्रवण प्रदेशात इतकी गरिबी आणि निरक्षरता आहे की काय सांगावे. आम्ही आमच्या मर्यादित साधनाने शक्य तितका लढा देत आहोत. मी आयुष्यात थांबायला शिकले नाही, आणि हरायलाही नाही."
तरीही, हलिमा यांच्या कामामुळे त्यांना अनेक कट्टरपंथीयांची नाराजी नियमितपणे सहन करावी लागते. समाजातील प्रभावशाली हितसंबंधी गटाचा त्यांना राग सहन करावा लागला आहे. त्यांना अनेकदा धमक्यांचे फोन आले, ज्यात त्यांना शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराच्या भयंकर परिणामांची धमकी दिली गेली.
हलिमा सांगतात, "एकेकाळी, परिसरातील कट्टरपंथी म्हणायचे की ही शिक्षा मला मिळायलाच हवी, कारण मी महिलांना त्यांचे हक्क मागण्यासाठी चिथावणी देत आहे, त्यांना घराबाहेर पडून जग पाहण्याचे धाडस देत आहे." पण हलिमा आशावादी आहेत. एक दिवस नवीन सूर्योदय होईल, हे त्यांना माहित आहे. त्या म्हणतात, "या दडपशाही शक्तींची मानसिकता हळूहळू बदलू लागली आहे. ते आता अनेकदा मला माध्यमांमध्ये पाहतात आणि आमच्याकडील सकारात्मक आणि बदलांच्या कथेमुळे त्यांचा दृष्टिकोन बदलत आहे."
केवळ समाजातच नाही, तर हलिमा यांच्या स्वतःच्या आयुष्यातही बदल झाला आहे. त्या आता विवाहित आहेत आणि एका मुलाच्या आई आहेत. तरीही, त्या नेतृत्व करत आहेत आणि अनेकांना संघर्षात सामील होण्यासाठी प्रेरित करत आहेत.
आता महिला संघटित होत आहेत, दडपशाहीविरोधात उभे राहत आहेत आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठवत आहेत, ही खरोखरच समाधानाची बाब आहे. काही वर्षांपूर्वी हे जवळजवळ अशक्य होते, असे त्यांना वाटते. त्यामुळे आश्वासकपणे त्या सांगतात, "आम्ही आता पश्चिम बंगालमधील मुस्लिम महिलांसाठी एक मोठे व्यासपीठ तयार करण्याच्या प्रक्रियेत आहोत, ज्याचे नाव 'पश्चिम बंग मुस्लिम महिला संघटन' असेल."