एजाज ढेबर : छत्तीसगडच्या राजकारणातील सर्वसमावेशकतेचा चेहरा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
एजाज ढेबर
एजाज ढेबर

 

मंदिराणी मिश्रा

"स्वप्नांना धर्म, जात किंवा परिस्थिती रोखू शकत नाही," हे वाक्य रायपूरचे माजी महापौर एजाज ढेबर यांच्या जीवनावर अगदी तंतोतंत बसते. छत्तीसगडच्या राजकारणात जेव्हाही बदल आणि सर्वसमावेशकतेची गोष्ट होईल, तेव्हा एजाज ढेबर यांचे नाव नक्कीच घेतले जाईल. ते केवळ एक महापौर नव्हते, तर संघर्ष, समर्पण आणि धर्मनिरपेक्ष राजकारणाचे प्रतीक होते.
 
एका सामान्य मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या एजाज यांचे बालपण गरिबीत गेले. त्यांच्या वडिलांचे एक छोटेसे दुकान होते आणि एजाज यांनाही शिक्षण सांभाळून घर चालवण्यासाठी मदत करावी लागत असे. पण ते नेहमी म्हणतात, "माझ्या परिस्थितीने मला रोखले नाही, उलट मला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त केले."
 

राजकारणाची सुरुवात आणि महापौरपदापर्यंतचा प्रवास
वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी, आपल्या मोठ्या भावाला नगरपालिकेच्या निवडणुकीत मदत करताना त्यांना राजकारणाची आवड निर्माण झाली. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द विद्यार्थी नेता म्हणून सुरू केली आणि पुढे ते नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे (NSUI) प्रदेशाध्यक्षही बनले. सुरुवातीला त्यांना वॉर्ड स्तरावर जबाबदाऱ्या मिळाल्या, पण त्यांची मेहनत, स्पष्टवक्तेपणा आणि लोकांमध्ये असलेली पकड यामुळे त्यांना रायपूर महानगरपालिकेत ओळख मिळाली.
 
ते दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये ते रायपूरचे महापौर बनले. काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी आपले प्रतिस्पर्धी मृत्युंजय दुबे यांचा ४१ विरुद्ध २९ मतांनी पराभव केला. छत्तीसगडच्या इतिहासात हे पद भूषवणारे ते पहिले मुस्लिम महापौर ठरले. "मी स्वतःला कधीही एका विशिष्ट धर्माचा प्रतिनिधी मानले नाही, मी रायपूरच्या प्रत्येक नागरिकाचा सेवक होतो," असे ते म्हणतात. त्यांच्या नेतृत्वाची दखल घेत, त्यांना 'अखिल भारतीय महापौर परिषदे'चे राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले. हे पद मिळवणारे ते छत्तीसगडचे पहिले महापौर होते.
 
त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळाला विकास, शहरी सुशोभीकरण आणि स्वच्छतेसाठी ओळखले जाते. त्यांनी बुढा तलावाचे पुनरुज्जीवन केले, महिलांसाठी 'पिंक टॉयलेट्स' सुरू केले, मल्टी-लेव्हल पार्किंग आणि डॉग शेल्टर (कुत्र्यांसाठी निवारा) यांसारख्या योजना राबवल्या. त्यांच्याच कार्यकाळात रायपूरने राष्ट्रीय 'स्वच्छता सर्वेक्षणात' देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये स्थान मिळवले.
 

आव्हाने, पराभव आणि नवी सुरुवात
एजाज ढेबर यांचा कार्यकाळ वादांपासून दूर राहिला नाही. विरोधकांनी त्यांच्यावर विकासकामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र, ढेबर यांनी प्रत्येक आरोपाला राजकीय डावपेच म्हटले.
 
२०२५ च्या पालिका निवडणुकीत एजाज ढेबर यांना मोठा धक्का बसला. ते नगरसेवकपदाची निवडणूक हरले. त्यांची पत्नी, अर्जुमन ढेबर, नगरसेवक म्हणून निवडून आल्या, पण स्वतः ढेबर यांना पराभव पत्करावा लागला.
 
या पराभवानंतरही एजाज राजकारणात आणि समाजकार्यात सक्रिय आहेत. ते आता तरुण नेत्यांना प्रशिक्षित करणे, शहरी विकासावर चर्चासत्रे आयोजित करणे आणि अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षणासाठी काम करणे यावर लक्ष केंद्रित करत आहेत. राजकारणात पुनरागमन करण्याच्या प्रश्नावर ते हसून म्हणतात, "जर लोकांना वाटले, तर मी पुन्हा उभा राहीन. शेवटी, मी लोकांकडूनच आलो आहे."
 
ते सांगतात की, "बदल केवळ तक्रार करून नाही, तर व्यवस्थेच्या आत जाऊन काम केल्याने होतो. म्हणूनच मी राजकारण निवडले."
 

रायपूरसाठी एक स्वप्न
माजी महापौर एजाज यांच्या मनात अजूनही एक अपूर्ण स्वप्न आहे. ते म्हणतात, "रायपूर माझे घर आहे, माझ्या आत्म्याशी जोडलेले शहर. माझे स्वप्न आहे की रायपूर देशातील सर्वात स्वच्छ, सर्वात हिरवेगार आणि सर्वात आधुनिक शहर बनावे."
 
"महापौर असताना मी स्वच्छतेला रायपूरची ओळख बनवले, पण माझे मोठे स्वप्न अजून बाकी आहे - रायपूरला इनोव्हेशन आणि संधींची राजधानी बनवायचे, जिथे विकासासोबत समानता आणि बंधुभावही वाढेल," अशी भावना ते व्यक्त करतात.
 
"मी नेहमीच राजकारणाला विरोधाचे नाही, तर समाधानाचे व्यासपीठ मानले आहे आणि हाच संदेश मला तरुणांना द्यायचा आहे," असे ते म्हणतात. एका छोट्या दुकानदाराच्या मुलापासून ते रायपूरचे पहिले मुस्लिम महापौर बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हेच सिद्ध करतो की, समर्पण आणि जनसेवेने गरिबी, धर्म आणि पूर्वग्रहांच्या भिंती तोडता येतात.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter