सय्यद नवाज मिफ्ताही : हजारो अंधांच्या आयुष्यात प्रकाश पसरवणारा दीपस्तंभ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
सय्यद नवाज मिफ्ताही
सय्यद नवाज मिफ्ताही

 

सानिया अंजुम, बेंगळुरू

कर दिल-ए-बीना भी खुदा से तलब 
आंख का नूर दिल का नूर नहीं

अल्लामा इकबाल या शेर मध्ये म्हणतात, "डोळ्यांची दृष्टी हे वरदान आहे, पण हृदयाचा प्रकाश हा शाश्वत आहे." बंगळुरूच्या के.आर. पुरमच्या गजबजलेल्या वस्तीत, जिथे वर्तमानपत्रांच्या छापखान्यांचा खडखडाट सतत कानी पडतो, तिथे सय्यद नवाज मिफ्ताही यांचा जन्म झाला. कदाचित हेच सत्य उलगडून दाखवण्यासाठी त्यांचा जन्म झाला असावा.

त्यांचे वडील 'डेक्कन हेराल्ड' आणि 'प्रजावाणी'मध्ये ट्रान्सपोर्ट इंचार्ज होते. ते गाड्यांच्या माध्यमातून बातम्या एका शहरातून दुसऱ्या शहरात पोहोचवत. पण नवाज यांचे नशीब वेगळे होते. त्यांना अशा कथा विणायच्या होत्या, ज्या ठिपक्यांमध्ये कोरलेल्या असतील आणि त्यातून आशेचे किरण पसरतील.

चार भावांमध्ये नवाज वेगळे होते. त्यांचा संघर्ष वेगळा नव्हता, तर त्यांचा आत्मा वेगळा होता. त्यांची भावंडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रगती करत होती. त्यांचे अक्षर सफाईदार येत होते. पण नवाज यांच्या हाताची लय वेगळीच होती.

"मी एबीसीडी उजव्या बाजूने लिहायला सुरुवात करायचो," ते जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगतात. त्यांच्या आवाजात आजही एक बंडखोर ठिणगी जाणवते. "शिक्षक आणि पालकांनी मला डावीकडून लिहिण्यासाठी खूप दबाव टाकला. पण ती माझी नैसर्गिक पद्धत होती. ती काही केल्या बदलली नाही."

त्यांनी तमिळनाडूला जाऊन धार्मिक शिक्षण घेतले आणि 'आलिम' झाले. नंतर त्यांनी उर्दूमध्ये बी.ए. आणि एम.ए. केले. त्यांचे शब्द आता श्रद्धेचे आणि विचारांचे वाहक बनले होते.

मुंबईत हृदयाला पडलेली भेग २०११ सालची गोष्ट आहे. मुंबईच्या वेगवान शहरात अंध मुलांसाठी एक परिषद आयोजित करण्यात आली होती. हा क्षण नवाज यांचे नशीब बदलणारा ठरला. तिथे लहान मुलांचे आवाज कुराणातील 'अम्मा पारा' म्हणताना घुमले. त्या आवाजात एक निरागसता आणि शुद्धता होती. ती तिथल्या गोंगाटातही स्पष्ट जाणवत होती.

नवाज यांना दृष्टी होती. पण त्या मुलांचे पठण ऐकून ते पुरते हवालदिल झाले. त्यांचे हृदय जणू दुभंगले. "त्यांच्या आवाजात एक अशी वेदना होती, जी मी नाकारू शकत नव्हतो," ते म्हणतात. आजही ती आठवण सांगताना त्यांचे डोळे पाणावतात.

त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. हे अश्रू दुःखाचे नव्हते. ते एका शपथेशी जोडलेले होते. न दिसणाऱ्या जगाशी पूल बांधण्याची ती प्रतिज्ञा होती. त्या गर्दीने भरलेल्या सभागृहात नवाज यांनी ठरवले की ते स्वतः 'ब्रेल' लिपी शिकतील. स्वतःसाठी नाही, तर त्या बोटांसाठी जे ईश्वराला स्पर्श करण्यासाठी आसुसलेले होते.

त्यांनी एखाद्या पवित्र ठेव्याप्रमाणे ब्रेल लिपीचे साहित्य गोळा केले. ते सर्व घेऊन ते बंगळुरूला परतले. प्रत्येक ठिपका (Dot) क्रांतीचे बीज होता. नवाज यांच्यासाठी हे केवळ शिकणे नव्हते. दृष्टीहीनांना अंधारात ठेवणाऱ्या जगाविरुद्धचे ते एक बंड होते.

बंगळुरूच्या शिवाजीनगरमधील 'सुलतान शाह मरकज' हे तबलिगी जमातचे केंद्र त्यांच्या प्रयोगाचे मुख्य ठिकाण बनले. हे ठिकाण ज्ञानसाधकांसाठी जिवंत होते. त्यांच्या दृष्टीकोनासाठी हेच योग्य व्यासपीठ होते.

२०१२ मध्ये नवाज यांनी मौलाना रियाझ आणि मौलाना शमसुद्दीन बिजली यांच्यासोबत एक धाडसी पाऊल उचलले. त्यांनी अंध विद्यार्थ्यांसाठी एक शाखा सुरू केली. मरकजच्या पवित्र भिंतींच्या आत साप्ताहिक वर्ग सुरू झाले. दररोज ऑनलाइन सत्रांनी न दिसणाऱ्या जगाला डिजिटल धाग्याने जोडले.

त्यांचे विद्यार्थी लहान मुले नव्हते. ते प्रौढ होते. काहींच्या हातांवर दशकांचे कष्ट कोरलेले होते. ते पहिल्यांदाच शिक्षणाच्या मिठीत शिरत होते. नवाज यांची नजर तीक्ष्ण होती, पण त्यांचे हृदय विद्यार्थ्यांच्या जगाशी एकरूप झाले होते. ते स्वतः ब्रेल शिकत होते आणि त्याच वेळी इतरांना शिकवत होते. "ते मला चिडवायचे," नवाज हसून सांगतात, "ते म्हणायचे की मी असा शिकवतो जणू मी सुद्धा त्यांच्यातलाच एक आहे. पण मला त्यांची क्षमता दिवसाच्या प्रकाशापेक्षाही स्पष्ट दिसत होती."

ईश्वरी स्पर्श: कणाकणातून किमया वृद्ध बोटांना ब्रेल शिकवणे ही संयमाची परीक्षा होती. काळाच्या ओघात खडबडीत झालेली बोटे कागदावरचे नाजूक ठिपके ओळखायला धडपडत होती. नवाज यांनी या आव्हानाचे रूपांतर एका जादूमध्ये केले.

त्यांनी "पिंचिंग तंत्र" सुरू केले. सुप्त संवेदना जागृत करण्याचा हा एक स्पर्शाचा विधी होता. पण त्यांची कल्पकता तिथेच थांबली नाही. त्यांनी जमिनीच्या शहाणपणाचा वापर केला. त्यांनी टेबलावर कणी (तुटलेले तांदूळ), नाचणी आणि जव पसरवले.

"त्यांना स्पर्श करा, त्यांना वेगळे करा," ते विद्यार्थ्यांना सांगत. कष्टाळू हातांचे रूपांतर अचूक साधनांमध्ये होताना ते पाहत असत. "मला त्यांचा स्पर्श अधिक तीव्र करायचा होता," नवाज स्पष्ट करतात. "त्यांच्या बोटांनी अशा कथा शोधाव्यात ज्या डोळे कधीच सांगू शकणार नाहीत, हे मला सिद्ध करायचे होते."

हे केवळ शिकवणे नव्हते. ही एक किमया होती. दृष्टीपेक्षाही खोल असलेल्या सहानुभूतीतून ती जन्माला आली होती.

२०१३ पर्यंत नवाज पुन्हा मुंबईच्या परिषदेत परतले. यावेळी त्यांच्यासोबत १२ अंध विद्यार्थी होते. त्यांची उपस्थिती शांत पण प्रभावी होती. आत्मा ढवळून काढणाऱ्या पठणाच्या दरम्यान, त्यांनी आपल्या फोन-आधारित शिक्षण मॉडेलचा उल्लेख केला. यामुळे देशभरातील अनेकांना अशाच पद्धती शोधण्याची प्रेरणा मिळाली.

गाणाऱ्या कथा

नवाज यांच्या मिशनचा आत्मा नवाज यांचा प्रवास अशा कथांची वीण आहे, ज्यात माणुसकी धडधडते. ५० वर्षांच्या अस्लमचे उदाहरण घ्या. एकेकाळी रमजानच्या रात्री त्यांच्या डोळ्यांतून फक्त अश्रू वाहत असत. "ते कुराण डोक्याला लावून रडायचे. त्यांना खात्री होती की ते कधीच कुराण वाचू शकणार नाहीत," नवाज अभिमानाने सांगतात.

नवाज यांच्या मार्गदर्शनाखाली अस्लम केवळ शिकले नाहीत, तर त्यांनी गरुडझेप घेतली. आता ते प्रत्येक पवित्र महिन्यात ८ ते १० वेळा कुराण पूर्ण वाचतात (खत्म करतात). "जर देवाने मला दृष्टी दिली, तर मला सर्वात आधी नवाज भाईंचा चेहरा पाहायचा आहे," असे अस्लम भावूक होऊन सांगतात. या केवळ कथा नाहीत. हा नवाज यांच्या कामाचा श्वास आहे. संधी मिळाली की नशीब बदलते, याचा हा पुरावा आहे.

नवाज यांचे मन एका कटू सत्याने व्याकुळ होते. ब्रेल मदरसे खूप दुर्मिळ आहेत. ते कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, काश्मीर, कोलकाता आणि गुजरातमध्ये ताऱ्यांसारखे विखुरलेले आहेत. "ही एक शोकांतिका आहे," ते उसासा टाकतात. "अंधांच्या श्रद्धा आणि ज्ञानाच्या अधिकाराचा सन्मान करणाऱ्या जागा खूप कमी आहेत."

'उमंग' फाऊंडेशन या गरजेतूनच 'उमंग फाऊंडेशन ऑफ द ब्लाइंड'चा जन्म झाला. ही दृष्टी धाडसी आणि सर्वसमावेशक आहे. ही संस्था 'अंधांची, अंधांसाठी' असणारी संस्था आहे. या फाऊंडेशनचे नेतृत्व अंध विश्वस्तांची एक समर्पित टीम करते.

या टीममध्ये २० वर्षांची अनुषा देखील आहे. ती मुस्लिम नाही, पण तिच्या हृदयाला सीमा नाहीत. जेव्हा तिला उमंगबद्दल समजले, तेव्हा तिने कोणताही विचार न करता पुढे येण्याचे ठरवले. तिने विश्वस्त म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि इतिहास घडवला.

"तिची काळजी घेण्याची पद्धत एक उत्कृष्ट नमुना आहे," नवाज आनंदाने सांगतात. "ही तरुण मुलगी, जिच्याकडे दृष्टी आहे, ती आमच्या कार्यासाठी आपला आत्मा ओतत आहे." ही एकतेची आणि करुणेची रंगीत साक्ष आहे, जी धर्माच्या पलीकडे जाते.

नोव्हेंबर २०२५ मध्ये बंगळुरूमध्ये निवासी केंद्र म्हणून हे सुरू होणार आहे. उमंगमध्ये धर्माचा विचार न करता सर्व दृष्टीहीनांचे स्वागत आहे. मुस्लिम विद्यार्थी ब्रेल अरेबिक लिपीत कुराण तालीम घेतात आणि तज्वीदमध्ये प्रभुत्व मिळवतात. त्याच वेळी सर्व रहिवाशांना जीवन कौशल्ये, संगणक साक्षरता आणि व्यावसायिक प्रशिक्षण मिळते.

हे असे घर आहे जिथे श्रद्धा आणि भविष्य एकत्र येतात. प्रत्येक जिवाला तिथे स्वातंत्र्य मिळते. याची गरज काय होती? नवाज यांचा आवाज जड होतो. पाठिंबा नसल्यामुळे अनेक अंध लोक आपल्या मुळांपासून दूर जात होते. काहींनी धर्मांतरही केले होते. "हे सदका-ए-जारिया (सतत सुरु राहणारे पुण्य) आहे," ते म्हणतात. त्यांनी 'सूरह अबसा'चा संदर्भ दिला. त्यात अब्दुल्ला इब्न उम्म मक्तुम या अंध सहकाऱ्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. "श्रीमंत आणि उच्चभ्रू लोक वाट पाहू शकतात," असा कुराणाचा आदेश आहे.

ज्या डोळ्यांना पलीकडचे दिसते, अशा डोळ्यांनी नवाज यांनी न दिसणाऱ्या गोष्टीला आपले ध्येय बनवले आहे.

"त्यांना दया नको आहे," नवाज आग्रहाने सांगतात. "त्यांना व्यासपीठाची गरज आहे." ते एक भागीदार म्हणून शिकवतात, गुरु म्हणून नाही. "आम्ही शिकवायला आलो होतो, पण तेच आम्हाला संयम आणि दृष्टीकोन शिकवतात." उमंग हेच कार्य पुढे नेत आहे. पवित्र शिक्षण आणि आधुनिक सक्षमीकरण यांचा मेळ घालत ते प्रत्येक हृदयाला प्रकाशमान करत आहेत.

नवाज आपली दृष्टी देत नाहीत; ते सिद्ध करतात की हृदयाची दृष्टी अधिक तेजस्वी असते. त्यांनी लवचिकता आणि साक्षात्काराची सांगड घातली आहे. सहानुभूतीमध्येच खरी दृष्टी असते, हे त्यांनी जगाला दाखवून दिले आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter