डॉ. मोहम्मद मकसूद इम्रान रशदी
सानिया अंजुम, बेंगळुरू
बेंगळुरूच्या 'केआर मार्केट'च्या गजबजलेल्या गल्ल्यांमध्ये मसाल्यांच्या सुगंध आणि अजानचा आवाज चोहीकडे पसरलेला आहे. अशा वातावरणात मौलाना डॉ. मोहम्मद मकसूद इम्रान रशदी आशेचा किरण बनून उभे आहेत. कर्नाटकातील सर्वात मोठ्या मशिदींपैकी एक असलेल्या 'जामिया मशिदी'चे ते प्राचार्य, मुख्य इमाम आणि खतीब आहेत. त्यांचे जीवन श्रद्धा, शिक्षण आणि एकतेच्या सामर्थ्याची साक्ष देते.
एका लहान गावातील मुलापासून ते हजारो लोकांच्या जीवनाला आकार देणाऱ्या विद्वानापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. बालपणी आजोबांच्या पाहुण्यांसमोर भाषण देणाऱ्या या मुलाने आज समाजाला दिशा दिली आहे. एका व्यक्तीचा दृष्टिकोन समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो, हे त्यांच्या कहाणीतून शिकायला मिळते.
मौलाना मकसूद यांचा जन्म कर्नाटकातील कोलार येथे झाला. त्यांचे बालपण प्रेम आणि ज्ञानाने भारलेले होते. त्यांचे आजोबा, अलहाज अब्दुलगफूर नक्षबंदी, कापडाचे व्यापारी होते. त्ते लहानग्या मकसूदला पाहुण्यांसमोर भाषण देण्यासाठी प्रोत्साहन देत असत. यामुळेच मकसूद यांच्यामध्ये वक्तृत्वाची बीजे रुजली. "मनापासून बोल", असे सांगत त्यांचे आजोबा त्यांना 'मामलात' म्हणजे मानवी संबंध जपण्याची कला शिकवत असत.
मौलाना मकसूद यांचे वडील शिक्षक होते आणि आई गृहिणी. तीन भाऊ आणि दोन बहिणींमध्ये ते दुसरे सर्वात लहान होते. त्यांच्यावर नम्रता आणि सेवेचे संस्कार झाले. मुलबागलमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी अभ्यासात मोठी झेप घेतली. दहावीनंतर अवघ्या दीड वर्षात त्यांनी कुराण पाठ केले. सात वर्षांत फारसी भाषेसह 'आलीम' अभ्यासक्रम पूर्ण केला. २००१ पर्यंत त्यांनी उर्दूत एम.ए. पदवी मिळवली. ‘मौलाना मुफ्ती अश्रफ अली: हयात और खिदमत’ या विषयावर त्यांनी पीएचडी केली. यातून कवीच्या मनातील भावना आणि भक्तीचा संगम त्यांच्या अभ्यासात दिसून येतो.
१९९९ मध्ये, वयाच्या २४व्या वर्षी त्यांनी एक वर्ष विनामूल्य सेवा दिली. ही त्यांच्या भक्तीची साक्ष होती. २०००मध्ये ते जामिया मशिदीचे 'नायब इमाम' बनले. २०११मध्ये त्यांनी 'कायमस्वरूपी इमाम', 'खतीब' आणि 'जामिउल उलूम अरबी कॉलेज'चे प्राचार्य म्हणून जबाबदारी स्वीकारली. ही केवळ पदोन्नती नसून एका परिवर्तनकारी कार्याची ती सुरुवात होती.
जामिउल उलूममध्ये मौलाना मकसूद यांनी संधीच्या शोधात असलेली एक पिढी पाहिली. त्यांनी एक धाडसी पाऊल उचलले. 'जामिउल उलूम', 'शाहीन ग्रुप' आणि 'खादीम मोईमोन ट्रस्ट' यांना मानद तत्त्वावर एकत्र आणून त्यांनी शून्यातून एक विभाग सुरू केला. हा उपक्रम आता २०० निवासी विद्यार्थी, १०० डे स्कॉलर्स आणि १०० 'एनआयओएस' निवासी विद्यार्थ्यांना सेवा देतो.
दहावी, पीयुसी आणि पदवीचे शिक्षण पत्रव्यवहाराद्वारे दिले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचा निकाल सलग चार वर्षे १००% लागला आहे. जिथे शाळा सोडण्याचे प्रमाण जास्त आहे, तिथे हे यश खूप मोठे आहे.
यात झैनबची गोष्ट खास आहे. 'केआर मार्केट'च्या झोपडपट्टीत राहणारी १६ वर्षांची झैनब डे स्कॉलर म्हणून दाखल झाली. तिचे कुटुंब अन्नासाठी संघर्ष करत होते आणि त्यांना लवकर लग्नाशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता. मौलानांच्या टीमने तिला मोफत पुस्तके आणि मार्गदर्शन दिले.
झैनबने केवळ १२वी पूर्ण केली नाही, तर आता ती शिक्षिका होण्यासाठी प्रशिक्षण घेत आहे. "ज्ञान हा अल्लाहने दिलेला प्रकाश आहे," असे मौलाना अभिमानाने सांगतात. त्यांच्या या शैक्षणिक क्रांतीने शेकडो लोकांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. श्रद्धा आणि शिक्षण गरिबीची साखळी तोडू शकते, हे त्यांनी सिद्ध केले.
बेंगळुरूमध्ये जातीय तणावाच्या घटना घडत असताना मौलाना मकसूद यांनी शांततेसाठी केलेले काम कौतुकास्पद आहे. समाजकंटकांनी मशिदीत डुकराचे मांस आणि मंदिरांजवळ गाईचे मांस टाकून दंगली घडवण्याचा प्रयत्न केला होता. पण मौलानांनी वाद वाढवण्याऐवजी शांततेने ते साफ केले आणि संभाव्य दंगल रोखली. ‘इत्तिहाद में ही तरक्की है’ (एकतेतच प्रगती आहे), असे ते नेहमी म्हणतात. ‘अल्लाह की रजा और कौम की भलाई’ (ईश्वराची मर्जी आणि समाजाचे कल्याण) हे त्यांचे ध्येय आहे.
बेंगळुरूत जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता असताना मौलाना मकसूद शांततेचा आधारस्तंभ बनून उभे राहतात. २०२५ मध्ये ईद-ए-मिलादच्या वेळी ‘आय लव्ह मोहम्मद’ बॅनर्सवरून वाद निर्माण झाला होता. यामुळे देशभर निदर्शने झाली. अशा वेळी त्यांनी हुशारीने हस्तक्षेप केला. फूट पाडणाऱ्या बॅनर्समुळे सलोखा बिघडण्याची भीती होती. त्यावेळी ‘प्रेम बॅनरने नाही, तर एकता आणि चांगल्या कर्माने सिद्ध होते,’ असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यांच्या शांत पण ठाम शब्दांनी लोकांचा राग शांत झाला आणि संवादाला सुरुवात झाली.
लाऊडस्पीकरच्या वादामुळे सुसंवाद धोक्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हिंदू आणि ख्रिश्चन नेत्यांची भेट घेतली आणि सर्व धर्मांसाठी समान ध्वनी नियम निश्चित केले. ‘जर नियम एका समाजाला लागू असतील, तर ते सर्वांना लागू असले पाहिजेत,’ असे त्यांनी सांगितले. यामुळे त्यांना सर्व समाजांकडून आदर मिळाला.
मुस्लिम विक्रेत्यांना मंदिरांजवळ आणि हिंदू व्यापाऱ्यांना मशिदींजवळ व्यापार करण्यास त्यांनी मदत केली. संभाव्य संघर्षाच्या जागांचे रूपांतर त्यांनी सहजीवनाच्या जागांमध्ये केले. एकतेसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात, हे त्यांनी दाखवून दिले.
एक मुफ्ती म्हणून मौलाना मकसूद विचारपूर्वक फतवे काढतात. “अल्लाहसाठी काम करा, त्याचे श्रेय त्याला द्या आणि प्रेमाला मार्गदर्शक ठरू द्या,” या पीर झुल्फिकार यांच्या सल्ल्याने ते प्रेरित आहेत. माध्यमांमधील खळबळजनक बातम्यांविरोधात त्यांनी काढलेल्या फतव्यामुळे 'केआर मार्केट'मध्ये #TruthInMedia नावाची तरुणांची मोहीम सुरू झाली. याला हजारो शेअर्स मिळाले.
वक्फच्या वादावर ते कायदेशीर उपायांचा सल्ला देतात. २०२५ मध्ये वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात (Waqf Amendment Bill) त्यांनी पॅलेस ग्राउंडवर मानवी साखळी तयार करून शांततापूर्ण निदर्शने केली. यामुळे कोणताही संघर्ष न होता समुदाय एकत्र आले. “न्याय हे आमचे कर्तव्य आहे,” असे ते म्हणतात. इस्लामिक मूल्ये आणि आधुनिक वकिली यांचा मेळ घालून ते बदल घडवत आहेत.
पैगंबर मोहम्मद यांच्या 'मिसाक-ए-मदिना' या करारापासून प्रेरणा घेऊन मौलाना मकसूद समाजांना जोडण्याचे काम करतात. लाऊडस्पीकरच्या वादात त्यांनी बिगर-मुस्लिम नेत्यांशी चर्चा करून समानता आणली. 'आय लव्ह मोहम्मद' प्रकरणात त्यांनी समुदायांना एकत्र आणले. ‘प्रेम आचरणाने सिद्ध होते, बॅनरने नाही,’ हे त्यांनी शिकवले.
जामिया मशिदीची दारे हिंदू, ख्रिश्चन आणि दलित नेत्यांसाठी नेहमी उघडी असतात. शहरी गरिबीसारख्या सामायिक समस्यांवर तिथे चर्चा होते. त्यांनी आयोजित केलेल्या सर्वधर्मीय इफ्तारमध्ये एका हिंदू शेजाऱ्याने सांगितले, “मला माझ्या मंदिरासारखीच शांतता इथे मिळाली.” विविधतेत एकता आणि राजकारण जिथे दुभागतो, तिथे श्रद्धा जोडते, हे त्यांनी सिद्ध केले.
दहशतवादाविरोधात मौलाना मकसूद यांची भूमिका तरुणांसाठी मार्गदर्शक आहे. २०२५ मध्ये पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा बळी गेल्यानंतर त्यांनी बेंगळुरू प्रेस क्लबमध्ये याचा निषेध केला. हा हल्ला भ्याड आणि इस्लामिक तत्त्वांच्या विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी न्यायाची आणि पीडितांना मदतीची मागणी केली. “दहशतवादाला कोणताही धर्म नसतो आणि आम्ही हिंदुस्तानवर प्रेम करतो,” असे त्यांनी निक्षून सांगितले.
चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी त्यांनी पोलीस आणि समुदायाच्या नियमित बैठका घेण्याचा सल्ला दिला. हा उपक्रम आता स्थानिक पातळीवर राबवला जात आहे. सौदी आणि अमेरिकन सरकारांनी त्यांना प्रवचनासाठी आमंत्रित केले होते. पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनातील उदाहरणे देऊन ते तरुणांना शिकवतात, “ज्ञानाने अतिरेकी विचारांचा प्रतिकार करा, एकतेने समाज घडवा.” त्यांचा हा संदेश तरुणांना शांतता आणि देशभक्ती स्वीकारण्यास प्रेरित करतो.
कोलारच्या धुळीने माखलेल्या गल्ल्यांपासून ते जामिया मशिदीच्या मंचापर्यंत, मौलाना मकसूद यांचा प्रवास परिवर्तनाचा धडा आहे. त्यांच्या शैक्षणिक सुधारणांमुळे ४०० विद्यार्थी सक्षम झाले आहेत. त्यांचे शांततेचे प्रयत्न फूट पाडणाऱ्या शक्तींना रोखतात आणि त्यांचे फतवे न्यायाला चालना देतात.
फेसबुकवर १९,५०० पेक्षा जास्त फॉलोअर्स आणि हजारो लोकांपर्यंत पोहोचणारी युट्यूबवरील प्रवचने, यामुळे ते डिजिटल युगातील प्रचाराचे प्रणेते ठरले आहेत. २०२५ मधील रमजानच्या घोषणा आणि मुख्यमंत्री सिद्धरामैया यांच्यासारख्या नेत्यांशी त्यांचे संवाद, यातून परंपरा आणि प्रगतीचा मेळ घालणारा माणूस दिसून येतो. “प्रगतीसाठी मतभेद विसरा,” असे ते म्हणतात. त्यांचा आवाज शांत आहे, पण मनात परिवर्तनाची आग आहे.
जामिया मशिदीच्या नूतनीकरण केलेल्या आवारात जुम्मा बयानाचे नेतृत्व करणारे मौलाना, जामिउल उलूममध्ये पुस्तकांमध्ये रमलेले विद्यार्थी, किंवा 'केआर मार्केट'मध्ये एकत्र हसणारे हिंदू-मुस्लिम व्यापारी... ही दृश्ये त्यांच्या कार्याची साक्ष देतात.
मौलाना मकसूद हे केवळ नेते नाहीत, तर ते एक चळवळ आहेत. सब्र (संयम) आणि एहसान (उत्कृष्टता) या गुणांनी वागण्याचे ते आपल्याला आव्हान देतात. श्रद्धेचे रूपांतर सत्कर्मात करण्याचा त्यांचा संदेश आहे. जामिया मशिदीच्या मंचावरून त्यांचा आवाज बेंगळुरूच्या आकाशात घुमतो. एक हृदय आणि एक दृष्टी देशाला आकार देऊ शकते, हे त्यांनी सिद्ध केले.