आम्ही मुस्लिम बरेचदा विचारात पडतो की, यहूदी (ज्यू) इतके पुढे गेले कसे? आणि मग आम्ही स्वतःचीच समजूत काढतो : कारण, अमेरिका त्यांच्या पाठीशी आहे, माध्यमे त्यांच्याच ताब्यात आहेत, जग त्यांच्या बाजूने आहे. आम्ही मात्र बिचारे, अन्यायग्रस्त, षडयंत्रांचे बळी, निर्दोष असूनही दुर्लक्षित. ठीक आहे. मान्य आहे, खरोखरच संपूर्ण जग त्यांच्या मागे आहे, पण केवळ षडयंत्रांमुळे एखादा समुदाय इतक्या उंचीवर पोहोचू शकतो का?
जगाच्या एकूण लोकसंख्येत यहूदिंची संख्या अगदीच नगण्य, म्हणजे साधारण दीड कोटी आहे. पण नोबेल पारितोषिकांच्या यादीत त्यांची उपस्थिती इतकी ठळक आहे की, प्रत्येक काही पानांनंतर त्यांचे नाव दिसतेच. विज्ञान, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपली छाप सोडली आहे. आइनस्टाइन, फ्रॉइड, साख, एली व्हिझेल यांसारखी नावं वाचताना दम लागतो. पण नावांची गती काही थांबत नाही.
आता विचार करा, ही सगळी मंडळीदेखील एखाद्या षड्यंत्राचा भाग होती का? त्यांनी प्रत्येक नव्या गोष्टीला ‘हराम’ म्हणून नाकारले का? मुलींच्या शिक्षणाला षड्यंत्र ठरवले का? संशोधन केंद्रांऐवजी मदरसे आणि प्रयोगशाळांऐवजी वादविवादांचे अड्डे उभारले का? नाही, उलट त्यांनी शिक्षणाला आपले हत्यार बनवले.
युरोपात शतकानुशतके छळ झालेले, हिटलरच्या गॅस चेंबर्समध्ये ढकलले गेलेले, क्रुसेड्सपासून होलोकॉस्टपर्यंत नष्ट करण्यात आलेले हे तेच यहूदी होते. पण त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला नाही, तर पुस्तके हाती घेतली. त्यांना माहीत होते की प्रश्न विचारणे म्हणजे बंडखोरी नव्हे, तर कर्तव्य आहे. यहूदी समाज हा काही तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेला नाही.
मध्ययुगीन युरोप आणि यहूदी समाज
मध्ययुगीन युरोपात यहूद्यांना येशू ख्रिस्ताच्या मृत्यूसाठी दोषी ठरवले गेले. त्यामुळे त्यांना तीव्र धार्मिक आणि सामाजिक भेदभावाला सामोरे जावे लागले. जेव्हा ख्रिश्चनांनी सत्ता हाती घेतली, तेव्हा यहूद्यांविरुद्ध कठोर कायदे करण्यात आले. त्यांना शहरांबाहेर गलिच्छ वस्त्यांमध्ये (घेटो) ढकलण्यात आले. शेती, व्यापार आणि अशा प्रतिष्ठित व्यवसायांपासून त्यांना वंचित ठेवले गेले. तेव्हा त्यांनी व्याजाने पैसे देणे आणि हस्तकला यांसारख्या क्षेत्रांत आपले स्थान निर्माण केले.
ख्रिश्चनांसाठी व्याज घेणे पाप मानले जायचे, त्यामुळे यहूद्यांसाठी व्याजखोरी हाच पर्याय उरला. लोकांनी त्यांना धूर्त, लोभी आणि फक्त पैशांचा विचार करणारे समजले. यहूदी वस्त्यांमध्ये ख्रिश्चन कर्ज घेण्यासाठी किंवा परत करण्यासाठी यायचे, ज्यामुळे दोन्ही समुदायांमधील तणाव आणि अविश्वास वाढला.
कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा धार्मिक द्वेषामुळे यहूदी वस्त्यांवर हल्ले (पोग्रोम) व्हायचे, घरे जाळली जायची, लोकांचे खून केले जायचे, मालमत्ता लुटली जायची. क्रुसेड्स, ब्लॅक डेथ (प्लेग) आणि इतर संकटांच्या काळात युरोपच्या विविध भागांत असे हत्याकांड आणि हिंसाचार सामान्य होते.
गिल्ड सिस्टममुळे (व्यावसायिक संघटनांचे नियम) त्यांना मुख्य प्रवाहातील व्यवसायांपासून दूर ठेवले गेले, पण त्यांनी सोनार, शिंपी, अभियांत्रिकी आणि विज्ञान यांसारख्या क्षेत्रांत आपले स्थान निर्माण केले. जेव्हा समाजाने दरवाजे बंद केले, तेव्हा त्यांनी खिडक्यांमधून प्रकाश मिळवला. हा तो काळ होता जेव्हा संपूर्ण जग अंधश्रद्धांमध्ये बुडाले होते. आणि यहूदी समाज मात्र हळूहळू बुद्धी आणि अनुभवाच्या मार्गावर चालू लागला.
यहूदी समाजाचे शिक्षण आणि प्रगती
फ्रेंच क्रांतीनंतर जेव्हा नागरी हक्कांचे युग सुरू झाले तेव्हा फ्रांस हा यहूद्यांना समानतेने वागवणारा पहिला देश ठरला. त्यानंतर ब्रिटन आणि जर्मनीनेही फ्रांसच्या पावलावर पाऊल ठेवले. सामाजिक भेदभाव पूर्णपणे संपला नाही, पण किमान त्यांच्यासाठी जगण्याचे मार्ग मोकळे झाले. याच काळात हास्काला म्हणजे यहूदी प्रबोधन चळवळ सुरू झाली. त्यांनी पुस्तकांमधून केवळ प्रार्थनाच नव्हे, तर विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचाही अभ्यास केला. एक रंजक उदाहरण पाहा- सतराव्या शतकात बारुख स्पिनोझा नावाचा यहूदी तत्त्वज्ञानी होता. त्याने आपल्या धर्मातील काही गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे त्याच्याच समाजाने त्याला बहिष्कृत केले.
पण तोच स्पिनोझा पुढे आधुनिक विचार आणि समीक्षात्मक चेतनेचे प्रतीक बनला. आणि यहूदी समाज? तो कालांतराने शिकला की प्रश्नांना मारले, तर विचारही मरतो. आज तोच यहूदी समाज स्पिनोझाच्या नावाने संशोधन निधी आणि पुरस्कार देतो आणि मान्य करतो, “आम्ही चूक केली होती.”
आम्ही कधी असे म्हटले आहे का? प्रश्न विचारणाऱ्यांना तर आम्ही थेट फासावर लटकवतो. मुस्लिम समाज विज्ञानाच्या बाबतीत इतका का मागे पडला? आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न विचारतो- मुस्लिम समाजात वैज्ञानिक विचार का बहरला नाही, आणि इस्लामी जगात मोठी वैज्ञानिक क्रांती का घडली नाही?
या प्रश्नाचे अनेक पैलू आहेत. पण इतिहास साक्षी आहे की, प्रारंभिक काळात मुस्लिम समाजाने विज्ञान, गणित, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र आणि तत्त्वज्ञानात खूप प्रगती केली होती. बगदादमधील बैत-अल-हिक्मत (ज्ञानमंदिर) जगभरातील विद्वानांचे केंद्र होते. पण तेराव्या शतकानंतर हा सुवर्णकाळ हळूहळू संपुष्टात आला. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे विचार आणि दृष्टिकोनातील बदल.
मुस्लिम समाजाचा हळूहळू नशीब आणि नियतीवरील विश्वास वाढला. जगात जे काही घडते, ते थेट अल्लाहच्या इच्छेने घडते, असे ‘अशारी’ या प्रमुख विचारसरणीने मानायला सुरुवात केली. नियतीत माणसाचा विशेष हस्तक्षेप नसतो हा विचार दृढ झाला आणि कारण आणि परिणाम (Cause and Effect) याविषयीची वैज्ञानिक समज कमकुवत झाली.
जेव्हा समाजात असा विश्वास रुजतो की सर्व काही वरच्याच्या इच्छेने घडते, तेव्हा लोक निसर्गाच्या नियमांचा आणि विज्ञानाचा शोध घेण्यात कमी रस दाखवतात. यामुळे या समाजाची कुतूहल, कल्पनाशक्ती आणि संशोधनाची भावना मंदावत गेली. शिक्षण क्षेत्रातही बदल झाला. बहुतांश लक्ष धार्मिक शिक्षणावर केंद्रित झाले, आणि विज्ञान, गणित यांसारख्या विषयांना कमी महत्त्व दिले गेले. यामुळे मुलांमध्ये वैज्ञानिक विचार आणि तर्कशक्ती बहरलीच नाही. पुढे, युरोपात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती होत होती, तेव्हा मुस्लिम समाजात शिक्षणाचा दर्जा घसरत गेला आणि वैज्ञानिक विचार मागे पडला.
राजकीय आणि सामाजिक संस्थांचे योगदान
राजकीय आणि सामाजिक संस्थांचाही यात मोठा वाटा होता. मुस्लिम देशांत राजेशाही आणि धार्मिक नेत्यांची अभद्र युती कायम राहिली. त्यामुळे मुक्त विचार आणि नव्या कल्पना स्वीकारण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही. जेव्हा समाजात प्रश्न विचारणे, प्रयोग करणे आणि नवे सिद्धांत आजमावण्याची परवानगी नसते, तेव्हा तिथे विज्ञान आणि नव्या शोधांची प्रगती होत नाही. मग असे झाले की, आमच्या समाजात प्रश्न विचारणे हे ईमानच्या विरोधात मानले गेले.
एखाद्या मुलाने जर विचारले की, “हजरत खदिजा व्यापार करत होत्या, मग आमच्या बहिणींना ऑफिसला जाण्यापासून का रोखले जाते?” तर त्याला एकतर रोषाचा सामना करावा लागतो किंवा त्याच्याविरोधात फतवा निघतो. आजही छोट्या शहरांमध्ये मुलीने कॉलेजला जायचे ठरवले, तर घरात हंगामा होतो. बँकेत नोकरी स्वीकारली, तर इस्लाम धोक्यात येतो. मुस्लिम समाजात रुजलेली धारणा अशी आहे की, हे जग एक परीक्षा आहे, आणि खरा ठिकाणा आखिरत (परलोक) आहे.
यामुळे पारंपरिक शिक्षण, धार्मिक मूल्ये आणि विज्ञान-तंत्रज्ञानापासून मुस्लीम समाजाचे अंतर वाढत गेले. मोबाइल, इंटरनेट, नव्या तंत्रज्ञानाबद्दल संशय वाढले, मुलांची डिजिटल समज खुंटली आणि थांबली. मला आठवते, १९९० ते २०००च्या दशकात मुस्लिम समाजात घरात टीव्ही लावला जात नव्हता.
दुसरीकडे, यहूदी समाजात शिक्षण म्हणजे केवळ घोकंपट्टी नव्हे, तर विचार कसा करायचा हे शिकवणारी कला आहे. तर्क, प्रयोग आणि आधुनिक विज्ञान हे त्यांच्या शाळांमध्ये आवर्जून शिकवले जाते. इस्रायलमधील एक मूल सायबर सिक्युरिटी आणि रोबोटिक्सवर प्रकल्प बनवत असते, तर आपल्याकडील त्याच वयाचा मुलगा ‘डिजिटल तसबिह’ शोधत असतो. यहूदी समाजात मुले ही भविष्याची संपत्ती मानली जाते, तर आपल्या समाजात त्यांच्यावर लवकरात लवकर लग्नाची जबाबदारीटाकली जाते. “मुलींना बाहेर पाठवा, त्यांना शिकवा” असे म्हणणे आपल्याकडे यहूदी साजीश ठरवली जाते.
लग्नाची वयोमर्यादा आणि सामाजिक दृष्टिकोन
लग्नाची वयोमर्यादा १८ वर्षे निश्चित करण्याची चर्चा होते, तेव्हा ‘शरियतमध्ये हस्तक्षेप’ असा आरडाओरडा होतो, जसा सध्या पाकिस्तानमध्ये होत आहे. सेक्युलरिझम हा शब्द आपल्या समाजात शिवी बनला आहे. जग क्वांटम कॉम्प्युटिंग आणि जेनेटिक इंजिनीअरिंगवर काम करत आहे, आणि आपण अजूनही मोबाइल अॅप्स हलाल की हराम यावर चर्चा करत आहोत.
इस्रायलचा बहिष्कार हा विषय नेहमीच चर्चेत असतो. पण बहिष्कार तेव्हाच यशस्वी होतो, जेव्हा तुमच्याकडे स्वतःचा पर्याय असतो. त्यांचे तंत्रज्ञान, औषधे, सॉफ्टवेअर यांचा बहिष्कार तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुमच्याकडे स्वतःच्या प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे, विद्यापीठे असतील. जे आपण बनवू शकत नाही, आणि त्यामुळे त्याचा बहिष्कारही करू शकत नाही. नाहीतर खिशात पैसे नसलेल्या माणसाने, “मी अंबानीच्या मॉलमध्ये जाणार नाही.”, असे म्हणण्यासारखेच हे आहे.
गेल्या पन्नास वर्षांत आपण किती अशा विद्यापीठे उभारली, ज्यांचा उल्लेख न्यूयॉर्क टाइम्स किंवा वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये होतो? असा कोणता मदरसा आहे, जिथे मूल फिकहबरोबर भौतिकशास्त्रही शिकते? मस्जीदी बांधल्या, हे चांगले आहे, पण त्यांच्यासोबत जर वैज्ञानिक प्रयोगशाळाही असत्या, तर आणखी बरे झाले असते.
धर्म आणि विज्ञानाची सांगड
धर्म आणि जग यांच्यात टक्कर नसते, तर समन्वय असतो. उलट, जेव्हा पाश्चात्य जगात औद्योगिक क्रांती आणि वैज्ञानिक शोध होत होते, तेव्हा मुस्लिम समाजाने ते स्वीकारण्यास उशीर केला. जेव्हा युरोपियन विज्ञानाच्या रेल्वेवर स्वार होऊन पुढे गेले, तेव्हा मुस्लिम समाज आपल्या जुन्या खेचरावर बसून विचार करत राहिला की, आपल्याकडेही कधीकाळी अरबी घोडा होता. छापखाना आला, तेव्हा त्यालाही स्वीकारण्याची भीती वाटली. कारण, कदाचित कुराण छापले गेले तर पवित्रता कमी होईल. ज्ञानाचा प्रसार तर सोडाच, पुस्तके छापणेही पाप ठरवले गेले. सुधारणांचा अर्थ धर्म सोडणे नसून, तो अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आहे.
अल्लाहने आपल्याला बुद्धी दिली आहे, विचारशक्ती दिली आहे. तिचा उपयोग न करणे ही कृतज्ञता आहे का? आपण म्हणतो की आपण मागास आहोत, पण याची जबाबदारी कोणाची? फक्त अमेरिका, इस्रायल, यहूद्यांची? की आपल्या आळशीपणाची, संकुचित मानसिकतेची की प्रत्येक गोष्ट ‘फितना’ (बंडखोरी) म्हणून टाळण्याच्या सवयीची?
धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले, तर इस्लाममध्ये ज्ञानाला खूप महत्त्व आहे. पण प्रत्यक्षात धार्मिक संस्थांनी आणि समाजाने वैज्ञानिक विचारांना खुल्या मनाने कधीच प्रोत्साहन दिले नाही. बरेचदा धार्मिक विश्वास आणि परंपरा विज्ञानाच्या मार्गात अडथळा ठरल्या. जर आपल्याला खरोखरच आपल्या मुली शाळेत जाव्या, आपली मुले प्रयोगशाळेत रमावीत, आणि मस्जिदींमधून कुराणच्या तिलावतीबरोबर वैज्ञानिक चेतनाही बाहेर पडावी असे वाटत असेल, तर आपल्याला बदलाची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल.
आता नुसत्या घोषणांनी नव्हे तर पर्यायांनीच भले होईल. भीतीने नाही, तर विचारानेच पुढे जाता येईल. आणि प्रत्येकवेळी आंधळ्या विरोधाऐवजी पर्याय आणि उपाय शोधूनच प्रगती होईल. मागासलेपणाची चर्चा माझ्या परिसरातील चहाच्या टपरीपासून ते फेसबुकवरील ‘जिहादी तलवार’ इमोजीपर्यंत सगळीकडे आहे.
आपल्या समाजाच्या जखमेला ‘उम्मतची जखम’ बनवले जाते. कॉलेजमध्ये सय्यद साहेबांच्या मुलाला जागा मिळाली नाही, तर ‘इस्लाम धोक्यात आहे.’ शेख साहेबांचा ठेका गेला, तर ‘मुस्लिमांवर अन्याय’. आणि जेव्हा कोणी वंचित विचारतो, “आमच्यातून नेता कधी तयार होणार?” तेव्हा लगेच फतवा निघतो - “फसाद पसरवू नका, आता वेळ एकतेची आहे!”
(लेखक पसमंदा चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)