WCL : 'यामुळे' भारत-पाक क्रिकेट सामना झाला रद्द

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 14 h ago
भारत-पाक संघ
भारत-पाक संघ

 

दहशतवाद्यांनी एप्रिल महिन्यात पहलगाम येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारताच्या माजी खेळाडूंनी जागतिक अजिंक्यपद लिजंड स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत न खेळण्याचा निर्णय घेतला. यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यामधील रविवारी बर्मिंगहॅम येथे नियोजित क्रिकेट सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाच्या वतीने जागतिक अजिंक्यपद लिजंड स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेचा यंदाचा दुसरा मोसम आहे. यंदाच्या मोसमाला १८ जूनपासून सुरुवात झाली असून, २ ऑगस्ट रोजी जेतेपदाचा फैसला होणार आहे. भारत चॅम्पियन्स या नावाने भारताचा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आहे. युवराज सिंग याच्याकडे या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. या संघामध्ये शिखर धवन, हरभजन सिंग, युसूफ पठाण, इरफान पठाण, सुरेश रैना, रॉबीन उथप्पा, वरुण अॅरोन या खेळाडूंचा समावेश आहे.

या स्पर्धेच्या संयोजकांकडून याप्रसंगी सांगण्यात आले की, पाकिस्तानचा हॉकी संघ यावर्षी भारतात खेळण्यासाठी जाणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये व्हॉलीबॉल सामनाही पार पडणार आहे. यामुळे जागतिक अजिंक्यपद लिजंड स्पर्धेतही या दोन देशांमधील सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही देशांतील जनतेला आनंद मिळवून देता यावा यासाठी हा प्रयत्न करण्यात येत होता, मात्र असे करण्याच्या प्रयत्नात आमच्याकडून काहींच्या भावना दुखावल्या गेल्या. आम्ही यासाठी माफी मागतो. भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

धवनचा नकार
पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर शिखर धवन याने या स्पर्धेच्या संयोजकांना आपण पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत सहभागी होणार नसल्याचे लिखित स्वरूपात कळवले होते. हरभजन सिंग, इरफान पठाण यांनीही पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले.

हिरवा कंदील
भारत सरकारकडून पाकिस्तानविरुद्ध विविध क्रीडा लढतींना हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. हॉकी आशियाई करंडक, ज्युनियर हॉकी विश्वकरंडक, ज्युनियर नेमबाजी विश्वकरंडक, जागतिक पॅरा अॅथलेटिक्स या स्पर्धांमध्ये पाकिस्तानी संघाला खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हायब्रिड मॉडेलचा अवलंब
आयसीसीच्या स्पर्धांसाठी भारत व पाकिस्तान या देशांच्या लढतीत त्रयस्थ ठिकाणी होणार आहेत. हायब्रिड मॉडेलचा अवलंब करण्यात आला आहे. यावर्षी महिलांचा एकदिवसीय विश्वकरंडक खेळवण्यात येणार आहे. भारत व श्रीलंका येथे या स्पर्धेतील लढती पार पडणार आहेत. मात्र पाकिस्तानी संघाच्या लढती भारतात न होता श्रीलंकेतील कोलंबो येथे पार पडणार आहे. पुरुषांची आशियाई करंडक ही क्रिकेट स्पर्धा यावर्षी सप्टेंबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे, मात्र या स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यामधील लढत कोठे खेळवायची याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे आशियाई करंडकाबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.