झेब अख्तर
झारखंडची राजधानी रांचीचे हृदय मानल्या जाणाऱ्या अल्बर्ट एक्का चौकापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर, हरिजन मोहल्ल्याजवळ, 'गुदडी कुरेशी मोहल्ला' वसलेला आहे. हा महानगरपालिकेने 'झोपडपट्टी' म्हणून घोषित केलेला परिसर आहे. या वस्तीतील बहुतांश लोकसंख्या रोजंदारी मजूर आणि छोटी-मोठी कामे करणारी होती. शिक्षणाची ज्योत येथे क्वचितच लुकलुकत असे, त्यामुळे हा भाग शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या बराच काळ मागासलेलाच राहिला.
याच वस्तीत जन्मलेल्या डॉ. शाहनवाज कुरेशी यांनी शिक्षणाच्या या विझत्या ज्योतीला एका मशालीत बदलले. त्यांचे स्वप्न होते की, प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहोचावे आणि त्यांनी ते सत्यात उतरवले. 'कुरेशी अकादमी' हा त्यांच्या याच संकल्पाचा जिवंत पुरावा बनली, जिथून डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, सॉफ्टवेअर डेव्हलपर अशा अनेक प्रतिभा उदयास आल्या. मग ती लोकांच्या प्रश्नांची पत्रकारिता असो वा समाजसेवा, डॉ. कुरेशी यांनी परिसराची विचारसरणी आणि प्रतिमा दोन्ही बदलून टाकले.
जेव्हा रात्रशाळा बनली ज्ञानक्रांतीची मशाल १९९३ मध्ये राष्ट्रीय साक्षरता अभियानाशी जोडून डॉ. शाहनवाज कुरेशी यांनी आपल्याच मोहल्ल्यात रात्रशाळेचा पाया घातला. दिवसभराच्या मजुरीने थकलेले वृद्ध लोक सायंकाळच्या नमाजनंतर वही-पुस्तक घेऊन शिकण्यासाठी येऊ लागले. हे दृश्य त्या मोहल्ल्यातील शिक्षणाप्रती असलेल्या जागरूकतेचे प्रतीक बनले. शिक्षण पूर्णपणे मोफत होते आणि पेट्रोमॅक्स (कंदील) साठी लागणारे तेल मोहल्ल्यातील लोकांच्या सहकार्यातून गोळा केले जात होते. डॉ. कुरेशी यांनी ही मोहीम 'बस्ती विकास मंच' अंतर्गत रांचीच्या इतर झोपडपट्टी भागांमध्येही पसरवली आणि साक्षरतेची एक ज्योत पेटवली.
१९८२ मध्ये वस्तीतील मशिदीजवळील तीन-साडेतीन कट्ठा जमिनीवर दोन खोल्यांच्या इमारतीत जेव्हा 'कुरेशी अकादमी' सुरू झाली, तेव्हा समाजसेवी हुसैन कासिम कच्छी यांची भूमिका महत्त्वाची होती. पण दोन दशकांनंतर शाळेची स्थिती खालावत चालली. तेव्हाच डॉ. शाहनवाज कुरेशी यांनी सचिव पदाची जबाबदारी स्वीकारली आणि शाळेला माध्यमिकवरून उच्च माध्यमिक शाळेत रूपांतरित केले.
त्यांनी स्वतः शाळा सोडलेल्या मुलींच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांशी चर्चा केली आणि त्यांना समजावले की, शिक्षणामुळे मुलींच्या लग्नातही सोय होईल. परिणामी, मुली पुन्हा शाळेत परतल्या आणि शाळेची रौनक पुन्हा परतली.
प्रत्येक शनिवारी ते मुलांना प्रेरणादायी व्यक्तींना भेटवू लागले. क्रिकेटपटू सबा करीम, कॉमेडियन एहसान कुरेशी, पत्रकार विजय पाठक, डॉ. जावेद अहमद यांसारखे लोक नियमितपणे मुलांशी संवाद साधू लागले. याचा परिणाम असा झाला की, शाळेचा मॅट्रिकचा निकाल सातत्याने शंभर टक्के लागू लागला.
खासदार सुबोधकांत सहाय यांच्या मदतीने हॉल बांधला गेला, डॉ. जावेद कुद्दुस यांच्या साहाय्याने विज्ञान प्रयोगशाळा (सायन्स लॅब) तयार झाली, रोटरी क्लब ऑफ रांची साऊथने सहा शौचालये बांधून दिली आणि अकादमीने 'झारखंड रत्न' सारखे सन्मानही मिळवले. आज तिथे हजाराहून अधिक विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.
एक काळ असा होता की, डॉ. शाहनवाज स्वतःही 'ड्रॉपआऊट' (शिक्षण अर्धवट सोडलेले) झाले होते. २७ रुपये फी भरू न शकल्याने संत पॉल स्कूलमधून त्यांचे नाव कापले गेले होते. पण एका वर्षानंतर, आई आमना खातून यांच्या मदतीने त्यांनी 'कुरेशी अकादमी'मध्ये पुन्हा शिक्षण सुरू केले. चौथ्या वर्गात असतानाच मोहल्ल्याच्या पंचायतीने त्यांच्यावर शिकवणी घेण्याची जबाबदारी सोपवली. त्यांना महिन्याला ३५ रुपये मिळत असत, पण हीच जबाबदारी पुढे जाऊन त्यांची ओळख आणि संकल्पाचा पाया बनली.
YMCAने दिले नवे आकाशYMCA (यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन) चे सचिव वू-हान-चू डेव्हिड आणि शिवप्रसाद रवी यांनी त्यांची प्रतिभा ओळखली आणि त्यांना इस्लाम नगर सेंटरचे प्रभारी बनवले. पाच वर्षे ते युनिव्हर्सिटी YMCA चे अध्यक्षही राहिले.
चर्चासत्रे, वादविवाद आणि युवा शिबिरांमध्ये डॉ. शाहनवाज कुरेशी यांनी नेतृत्व करत शिक्षण आणि सामाजिक जाणिवेच्या कार्याला दिशा दिली. 'झारखंड युथ असोसिएशन'च्या माध्यमातून १२० विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. 'भारतीय मुस्लिम: प्रतिमा आणि वास्तव' आणि 'क्विझ फॉर पीस' यांसारख्या चर्चासत्रांचे त्यांनी यशस्वी संचालन केले.
आर्थिक चणचण आणि लेखनाच्या आवडीने डॉ. शाहनवाज कुरेशी यांना १९९७ मध्ये पत्रकारितेशी जोडले. इंटरमिजिएटच्या शिक्षणादरम्यान त्यांनी 'वनांचल प्रहरी'पासून सुरुवात केली आणि 'प्रभात खबर'पर्यंतचा प्रवास केला, जिथे ते सुमारे १२ वर्षे वरिष्ठ उपसंपादक होते. रमजानमध्ये इस्लामिक विषयांवरील त्यांचे लेख खूप लोकप्रिय झाले. कोविड काळात लिहिलेल्या त्यांच्या रिपोर्ट्सनी, जसे की 'अंधारातही चमकतात हिंदपिरीचे तारे', 'कशी साजरी होणार गरिबांची ईद', समाजातील वास्तव समोर आणले.
आता झारखंडच्या शाळांमध्ये शिकवली जातात त्यांची पुस्तके२०१० मध्ये जेव्हा डॉ. शाहनवाज यांनी पत्रकारितेला रामराम करून शिक्षण विभागाकडे मोर्चा वळवला, तेव्हा त्यांनी झारखंडच्या सरकारी शाळांसाठी सामाजिक विज्ञानाची पुस्तके लिहायला सुरुवात केली. जेसीईआरटी (JCERT) चे गटप्रमुख म्हणून, त्यांनी ६ वी ते ८ वी साठी एकूण ९ पाठ्यपुस्तके तयार केली, जी आजही राज्यभरातील विद्यार्थी वाचत आहेत.
ते जागतिक बँकेच्या 'तेजस्विनी परियोजना' आणि 'प्रोजेक्ट संपूर्णा'शी देखील जोडले गेले. 'हर्ष जोहार संवाद' या पत्रिकेच्या संपादक मंडळात त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. त्यांनी झारखंडच्या क्रीडा इतिहासावर पीएच.डी. केली आणि 'झारखंड में महिला हॉकी' (झारखंडमधील महिला हॉकी) सारखे पुस्तक लिहिले, ज्याचे लोकार्पण FIH (आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ) चे अध्यक्ष तय्यब इकराम यांनी केले. या पुस्तकाची भूमिका राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी लिहिली असून, प्रस्तावना पद्मश्री बलबीर दत्त यांनी लिहिली आहे. त्यांचे पुढील बहुचर्चित पुस्तक 'भारत में सूफीवाद और हिन्दू-मुस्लिम एकता' (भारतातील सुफीवाद आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य) लवकरच प्रकाशित होणार आहे.
झारखंड सरकार, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, रोटरी क्लब ऑफ रांची साऊथ, मुस्लिम प्रोफेशनल असोसिएशन, सद्भावना मंच आणि दैनिक जागरण-आय नेक्स्ट यांसह अनेक संस्थांनी डॉ. शाहनवाज कुरेशी यांना त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाबद्दल सन्मानित केले आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -