डॉ. सबिहा इनामदार
भक्ती चाळक
“जिस्म की बात नहीं, रूह तक जाना है…” या ओळी आहेत ४८ वर्षीय डॉ. सबिहा इनामदार यांच्या. महाराष्ट्रातील एका सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या सबिहा आज सेक्स आणि रिलेशनशिप कोच म्हणून भारतभर प्रसिद्ध आहेत. लैंगिक आरोग्य आणि प्रेमसंबंध या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर खुलेपणाने बोलणं आजही टाळलं जातं. त्याविषयी बोलणाऱ्यांविषयी उलट-सुलट बोललं जातं. अशा समाजात एका स्त्रीने, ते ही एका मुस्लीम स्त्रीने या विषयांवर मार्गदर्शन करणं मोठ्या धाडसाचे काम आहे आणि सबिहा हे काम धैर्याने करत आहेत.
डॉ. सबिहा इनामदार या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी सेक्स आणि रिलेशनशिप यांच्याशी निगडित समस्यांवर मार्गदर्शन करणारी व्यावसायिक सेवा सुरू केली. त्यांच्यापूर्वीही अनेकजण या क्षेत्रात योगदान दिलं आहे, मात्र सबिहा यांचं वेगळेपण म्हणजे त्यांनी या विषयीचे अवघडलेपण दूर केलं. ‘डॉ. सबिहा कोचिंग अँड कन्सल्टिंग’ (डीएससीसी) या संस्थेच्या माध्यमातून आज त्या कित्येक जोडप्यांना नातेसंबंधातील समस्यांवर मार्गदर्शन देतात. न्यूरो-लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग (एनएलपी) मध्ये शिक्षण झाल्याने त्यांना जोडप्यांच्या मनातील भावना सहजपणे लक्षात येतात. त्यामुळे समाजात अनेकदा निषिद्ध मानल्या जाणाऱ्या विषयांवर लोक सबिहा यांच्यसोबत मोकळेपणाने चर्चा करतात.
‘सेक्स म्हणजे केवळ कर्तव्य नाही’
विवाहानंतर भावभावना, सुखदु:ख, कौटुंबिक नातेसंबंध, जबाबदारी हे सगळे सांभाळून घेण्याचे खूप मोठे आव्हान असते. वैवाहिक आयुष्यात हे आव्हान एकत्रित पेलायचे असेल तर पती-पत्नींमध्ये भावनिक नाते निर्माण होणे खूप गरजेचे असते. सेक्स आणि रिलेशनशिपचे मार्गदर्शन करण्याच्या कल्पनेमागे माझे लग्नचं एक मोठी घटना आहे, असे सबिहा सांगतात. याविषयी बोलताना त्या म्हणतात, “मी पुण्यात वैद्यकीय क्षेत्रात प्रॅक्टिस करत असताना माझ्या मैत्रिणींची लग्न होऊ लागली. तेव्हा मीही पंचविशीत होते. मलाही लग्न करायचं होतं. लग्न म्हणजे केवळ समारंभ एवढंच मला माहिती होतं.”
त्या पुढे म्हणतात, “पुढे जाऊन माझं लग्न अली यांच्यासोबत झालं. लग्न झाल्यावर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. अनेक कर्तव्ये आणि जबाबदऱ्या आल्या. त्यापैकीच एक कर्तव्य म्हणजे सेक्स, असं मी समजायचे. कारण मी डॉक्टर असले तरी सेक्स म्हणजे नेमकं काय असतं हेच मला माहिती नव्हतं. तेव्हा मी त्याकडे केवळ क्रिया म्हणून पहायचे. माझा असा समज होता की आई होणं माझं महत्वाचं कर्तव्य आणि आई बनल्यावर वैवाहिक जीवन सफल होतं. मला मुलगी झाल्यानंतर १० वर्षांनी मला जाणीव झाली की सेक्स ही केवळ क्रिया नसून प्रेम व्यक्त करण्याची कृतीदायी भाषा आहे. तो एक शृंगार आहे, हे जेव्हा माझ्या लक्षात आले त्यानंतर मी या विषयाकडे गांभीर्याने पाहू लागले.”
पत्नी ते लाईफ कोचपर्यंतचा प्रवास
सबिहा म्हणतात सेक्स कोच होण्यापर्यंतचा प्रवास केवळ माझ्या नवऱ्याच्या प्रोत्साहनामुळे सोपा झाला. सबिहा म्हणतात, “आज जेव्हा मी सेक्स कोच डॉ. सबिहा म्हणून स्वतःची ओळख करून देते तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावतात. मग मी दरवेळी माझी ओळख केवळ डॉ. सबिहा अशीच करून देते. परंतु मला माझा नवरा म्हटला की जर मी माझी ओळख सिव्हिल इंजिनियर म्हणून करून देतो तर तु सेक्स कोच म्हणायला संकोच का बाळगतेस. हे फील्ड निवडन्यापासून ते आजपर्यंत अली यांनी मला खंबीरपणे पाठिंबा दिला.”
‘अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो’
महिला आणि विशेषता मुस्लिम समाजातून येणाऱ्या सबिहा यांनी सेक्स आणि रिलेशनशिप कोच म्हणून काम करत असताना समाजातून होणाऱ्या टीका आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंग यांचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी लैंगिक शिक्षण आणि मानसिक स्वास्थ्यावर मोकळेपणाने बोलण्याचे धाडस दाखवले. याविषयी सबिहा म्हणतात, “‘फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे, वो शमा क्या बुझे जिसे रौशन खुदा करे’ असं मी नेहमी म्हणते. कारण हे कार्य करताना मला अनेकदा टीकांना सामोरे जावे लागते. परंतु माझ्या वडिलांनी नेहमीच माझ्या निर्णयांवर विश्वास ठेवून मला बळ दिले आहे.
त्या पुढे म्हणतात, “जेव्हा जेव्हा माझ्या टीका होतात तेव्हा तेव्हा वडिलांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं ‘अन्याय सहन करणारा, अन्याय करणाऱ्यापेक्षा मोठा गुन्हेगार असतो.’ माझे वडील फॉरेस्ट डिपार्टमेंटला काम करत होते. शिक्षणमुळे त्यांचे विचार प्रगल्भ होते. त्यांनी लहानपणापासूनच आम्हाला तिघा भावंडांना व्यावहारिक ज्ञान दिले होते. आम्हाला त्यांनी आत्मनिर्भर बनवले होते. त्यामुळे मी कोणताही निर्णय घेतल्यावर त्यावर ठाम असते. कितीही संकटे आली तरीही मी डगमगत नाही.”
आज सबिहा त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून समजकार्यचं करत आहेत. वैयक्तिक कोचिंग सत्रे, सार्वजनिक व्याख्याने आणि कार्यशाळांच्या माध्यमातून त्या लोकांशी संवाद साधतात. त्यांचे कार्य केवळ समस्यांचे निराकरण करण्यापुरते मर्यादित नाही, तर लोक स्वतःबद्दल आणि त्यांच्या जोडीदाराबद्दल कसे विचार करतात आणि काय अनुभवतात यात बदल घडवण्यासाठी आहे.
आपल्या समाजात लैंगिक आरोग्याविषयी खुलेपणाने बोलणे हे अजूनही निषिद्ध मानले जाते. अशा वातावरणात डॉ. सबिहा यांनी धैर्याने पुढे येत या विषयांना सामान्य माणसापर्यंत पोहोचवले. त्यांचे कार्य केवळ वैद्यकीय सल्ला देण्यापुरते मर्यादित नाही. तर त्यांनी समाजातील गैरसमज दूर करत लोकांना या विषयांवर मोकळेपणाने बोलण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.
सेक्स एज्युकेशन का गरजेचे आहे, यावर सबिहा म्हणतात, “मुलामुलींच्या वयात येण्याच्या या काळात त्यांनी ‘काय नाही करायचे’ याबाबतचे शिक्षण त्यांना दिले जाते. परंतु या शारीरिक बदलासोबत बदलणाऱ्या भावनांबद्दल त्यांच्याशी बोललेच जात नाही. त्यामुळे कृती आणि भावना यामधील फरक समजत नसल्याने मुलामुलींच्या मनात सेक्सबद्दल अनेक चुकीच्या धारणा निर्माण आहेत.”
एका संवेदनशील विषयाला सामाजिक स्वीकार्यता मिळवून देण्याचा प्रयत्न सबिहा करत आहेत. हे विषय समाजात खुलेपणाने मांडत असताना काय अनुभव येतात, याविषयी सबिहा सांगतात, “सेक्स विषयावर समाजात अनेक व्याखाने व्हायला पाहिजे, यावर मोकळेपणाने चर्चा व्हायला पाहिजेत. लोकांना हे सांगणे गरजेचे आहे की, लैंगिक शिक्षण हे फक्त शारीरिक संबंधांपुरते मर्यादित नाही, तर ते भावनिक आणि मानसिक स्वास्थ्याशीही निगडित आहे. माझ्या या विषयांवरील व्याख्यानांमुळे लोकांच्या मनात लैंगिकतेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन तयार झाला आहे. विशेषतः तरुण पिढीला माझ्या मार्गदर्शनामुळे लैंगिकता आणि नातेसंबंधांबद्दल योग्य माहिती मिळत आहे.”
डॉ. सबिहा या केवळ लैंगिक आरोग्याविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला नाही, तर प्रेमसंबंधांमधील भावनिक आणि मानसिक पैलूंवरही गांभीर्याने प्रकाश टाकत आहेत. हे करताना कितीही संकटे आली तरीही त्यांनी मागे न हटण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कार्याविषयी सबिहा सांगतात, “मला कितीही संकटे आली तरीही मी माझे काम अविरत करत राहणार. मला तर वाटते सेक्स कोचिंग करता करताच माझा जीव जावा. माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मी जोडप्यांना मार्गदर्शन करत राहावे, असे वाटते.”
डॉ. सबिहा यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून वेबिनार्स आणि व्हर्च्युअल कोचिंग सत्रे सुरू केली असून, यामुळे देशभरातील आणि परदेशातील भारतीय समुदायापर्यंत त्यांचे कार्य पोहोचले आहे. यूट्यूब, इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्म्सवर त्यांचे हजारो फॉलोवर्स आहेत. मराठीतील कित्येक पॉडकास्टमध्ये त्या उघडपणे भाष्य करतात. यामाध्यमातून त्या लैंगिक शिक्षणाशी संबंधित लहान व्हिडीओ, प्रश्नोत्तरे आणि लाइव्ह सत्रे आयोजित करतात.
डॉ. सबिहा इनामदार यांचे कार्य समाजात सकारात्मक परिवर्तन घडवत आहे. त्यांनी लैंगिक आणि भावनिक स्वास्थ्याला प्राधान्य देत नातेसंबंधांमधील संवादाला नवे आयाम दिले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे सामान्य लोकांमधील सेक्सविषयीचे संकोच कमी होत आहेत. विशेषतः महिलांना त्यांच्या भावना आणि गरजा व्यक्त करण्याचे बळ सबिहा यांच्या कार्यामुळे मिळत आहे. सामाजिक टॅबूंना आव्हान देत, लैंगिकतेचा विषय सामान्य आणि सकारात्मक विचारसरणीकडे त्या घेऊन जात आहेत.