मोहम्मद मिन्हाज : रांचीच्या वस्त्यांमध्ये आशेचा दिवा पेटवणारा खरा हिरो

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 12 h ago
मोहम्मद मिन्हाज
मोहम्मद मिन्हाज

 

झेब अख्तर

झारखंडची राजधानी रांचीमध्ये जर तुम्ही मोहम्मद मिन्हाज यांना भेटलात, तर पहिल्या नजरेत त्यांच्या आत दडलेल्या त्या आगीचा अंदाज लावता येणार नाही, जी त्यांना गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ समाजाची सेवा करण्यासाठी प्रेरित करत आहे. साधेपणाने भरलेला चेहरा आणि शांत स्वभाव असलेले मिन्हाज, खरं तर एक अशी ताकद आहेत, ज्यांनी रांचीच्या वस्त्यांमध्ये आशेची नवी ज्योत पेटवली आहे. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि हक्कांसाठीच्या लढाईला आपल्या आयुष्याचे ध्येय बनवले आणि न थकता, न थांबता, हे ध्येय ते आजही पुढे नेत आहेत.

१९८२ मध्ये त्यांचा हा प्रवास सुरू झाला. त्या काळात रांची शहर तर वाढत होते, पण तिथल्या वस्त्या अंधारात बुडालेल्या होत्या. मजुरी करणारे, रोजंदारी कामगार आणि रिक्षाचालक कुटुंबे सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात गुंतलेली असत. अशा परिस्थितीत, शिक्षण त्यांच्यासाठी एक स्वप्नच होते. मिन्हाज यांनी त्याच वेळी ठरवले की, बदलाचा पाया शिक्षणच असेल.

त्यांनी गरीब वस्त्यांमध्ये रात्रशाळा (नाइट क्लासेस) सुरू केल्या. दिवसभर काम करून परतलेले मजूर आणि रिक्षाचालक जेव्हा झोपडीत आरामाच्या शोधात असत, तेव्हा मिन्हाज त्यांच्याकडे जात आणि त्यांना शिकवत. हे सोपे काम नव्हते. अनेक लोक संकोच करत आणि म्हणत—"आमच्यासाठी शिक्षणाचा काय उपयोग, आम्हाला तर पोट भरायचे आहे." पण मिन्हाज त्यांना संयमाने समजावत की, शिक्षणच त्यांच्या पुढच्या पिढीला गरिबीतून बाहेर काढू शकते. हळूहळू लोक सहमत होऊ लागले आणि या वस्त्यांमध्ये रात्रीचा प्रकाश केवळ दिव्यांमुळेच नव्हे, तर शिक्षणामुळेही चमकू लागला.

थोड्याच काळात त्यांना जाणीव झाली की, खरा बदल मुलांच्या शिक्षणाने होईल. जर मुले शाळेत गेली, तरच समाजाचे चित्र बदलेल. यासाठी त्यांनी राजधानीतील वस्त्यांचे रीतसर सर्वेक्षण केले. डोम टोली, हरिजन टोला, गडहा टोली, गुदडी मोहल्ला, कडरू टोली, इलाही नगर आणि इस्लाम नगर यांसारख्या भागांमध्ये त्यांनी पाऊल ठेवले. या त्याच जागा होत्या, जिथे लोक नाकावर रुमाल ठेवूनही जाण्यास कचरत. पण मिन्हाज तिथे पोहोचले, कुटुंबांना भेटले आणि मुलांना शाळेत पाठवण्याची मोहीम सुरू केली.

त्यांच्या या मार्गात मित्रांचीही साथ मिळू लागली. 'YMCA' ने मदतीचा हात पुढे केला आणि नंतर जर्मनीची संस्था 'CVJM' कडूनही पाठिंबा मिळाला. हळूहळू त्यांच्या मोहिमेला आकार येऊ लागला. अनेक वेळा ते स्वतः मुलांचा हात धरून त्यांना शाळेत घेऊन जात. कधी मुलांच्या आवडीची शाळा निवडून तिथे त्यांचा प्रवेश करून देत. याचा परिणाम असा झाला की, ९० च्या दशकापर्यंत शहरातील ३४ नामांकित शाळांमध्ये ४ ते ५००० गरीब मुले शिक्षण घेऊ लागली.

आज तीच मुले मोठी होऊन डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक आणि सरकारी अधिकारी बनली आहेत. मिन्हाज जेव्हा या मुलांच्या यशाच्या कथा सांगतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील चमक कोणत्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा मोठी वाटते.

इतके मोठे काम सांभाळणेही सोपे नव्हते. यासाठी त्यांनी वस्त्यांमध्ये दोन समित्या बनवल्या - 'लोकल कमिटी' आणि 'महिला मंडळ'. लोकल कमिटीमध्ये परिसरातील तरुण आणि पुरुष सहभागी होत, जे गरजा सांगत आणि मुलांना शाळेत पाठवण्यासाठी सहकार्य करत. महिला मंडळ घरोघरी जाऊन मातांना समजावत आणि मुलांना शिक्षणाकडे प्रेरित करत. खर्चाचा आराखडाही विचारपूर्वक बनवला होता. काही पैसे YMCA कडून येत, काही मिन्हाज यांच्या मित्रांकडून आणि थोडा वाटा मुलांच्या पालकांकडून घेतला जात असे. उद्देश स्पष्ट होता की, पालकांनीही जबाबदारीची जाणीव ठेवावी आणि शिक्षणाला फुकटची गोष्ट समजू नये.

जेव्हा शिक्षणाचा पाया मजबूत झाला, तेव्हा मिन्हाज यांना गरीब वस्त्यांमधील आरोग्य सेवांच्या कमतरतेची जाणीव झाली. त्यांनी शहरातील डॉक्टर, औषध विक्रेते आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांच्याशी संपर्क साधला आणि महिन्यातून एकदा झोपडपट्टी भागांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे (हेल्थ कॅम्प) लावण्यास सुरुवात केली. हळूहळू हा उपक्रमही मजबूत होऊ लागला. आजारी मुले आणि वृद्धांना उपचार आणि औषधे मिळू लागली. आजही हे काम अविरत सुरू आहे.

जवळपास दोन दशके शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम केल्यानंतर, मिन्हाज यांना आणखी एका मोठ्या आव्हानाची जाणीव झाली. त्यांनी पाहिले की, गरीब लोक केवळ अशिक्षित आणि आजारीच नाहीत, तर ते आपल्या हक्कांपासूनही पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. त्यांना हेही माहीत नव्हते की, त्यांच्या मुलांना मोफत शिक्षणाचा अधिकार आहे, रस्त्याशेजारची त्यांची दुकाने हटवली जाऊ शकत नाहीत किंवा सरकारच्या योजना त्यांच्यासाठीच बनलेल्या आहेत.

ही उणीव भरून काढण्यासाठी, मिन्हाज यांनी एक नवीन पाऊल उचलले आणि 'जागरूकता निर्माण समित्या' (Awareness Building Committees) बनवल्या. यात ११ सदस्य असत आणि त्यांचे काम एकच होते, लोकांना त्यांचे अधिकार आणि कर्तव्ये समजावून सांगणे. हळूहळू शहर आणि आसपासच्या वस्त्यांमध्ये अशा ३०-३५ समित्या तयार झाल्या. आज या समित्या शिक्षण, आरोग्य, रोजगार, घरकुल आणि कायदेशीर हक्कांपासून ते प्रत्येक मुद्द्यावर गरिबांना जागरूक करत आहेत.

२०१८ मध्ये मिन्हाज औपचारिकरित्या निवृत्त झाले. पण त्यांच्यासाठी निवृत्त होणे हा केवळ एक शब्द आहे. ते आजही म्हणतात, "जोपर्यंत ताकद आहे, मी निवृत्त होऊ शकत नाही. सेवेतून कोणतीही निवृत्ती नसते." हेच कारण आहे की, आजही ते समित्यांना मार्गदर्शन देतात, वस्त्यांमध्ये जातात आणि गरज पडल्यास प्रत्येक आघाडीवर उभे राहतात.

यादरम्यान, त्यांनी स्वतःला केवळ शिक्षण आणि आरोग्यापुरते मर्यादित ठेवले नाही. पाण्याची समस्या असलेल्या भागांमध्ये विहिरी आणि हातपंप (चापाकल) लावण्याचे कामही त्यांनी केले. यासाठी त्यांनी 'लोकसहभागा'चा (Public Participation) मार्ग स्वीकारला. म्हणजेच, आर्थिक मदत बाहेरून मिळाली, तर परिसरातील लोक किमान श्रमदान तरी करतील. त्यांचा विश्वास आहे की, जर लोकांनी स्वतः मेहनत केली, तर ते कामाचे महत्त्व समजतील आणि त्याची काळजी घेतील.

आज मिन्हाज यांची कहाणी हे सिद्ध करते की, बदल घडवण्यासाठी मोठ्या ताकदीची किंवा पदाची गरज नसते. गरज असते ती फक्त जिद्दीची, प्रामाणिकपणाची आणि धैर्याची. त्यांनी एकट्याने सुरुवात केली होती, पण त्यांच्यासोबत एक मोठा ताफा (कारवाँ) जुळत गेला. हजारो मुलांचे आयुष्य बदलले, वस्त्यांमध्ये शिक्षणाचा प्रकाश पसरला, आरोग्य सुविधा पोहोचल्या आणि लोक आपले अधिकार ओळखू लागले.

मिन्हाज जेव्हा हसून म्हणतात की, "आम्ही जे केले, ते समाजाने मिळून केले, मी तर फक्त एक माध्यम होतो," तेव्हा त्यांची नम्रता आणखी मोठी वाटते. खरे तर हेच खरे हिरो' असतात जे शांतपणे मेहनत करून लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणतातआणि मग मागे हटून म्हणतात, याचे श्रेय माझे नव्हे तर समाजाचे आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter