श्रीलता मेनन / त्रिशूर
"तिथे असलेल्या सर्व मुलींसाठी..." दुबईच्या बुर्ज खलिफाच्या पार्श्वभूमीवर, हिजाब घातलेली हादिया हकीम फुटबॉलसोबत कलात्मक कसरती करतानाच्या व्हायरल इंस्टाग्राम पोस्टचे हे कॅप्शन आहे. हादिया हकीम व्यावसायिक फ्रीस्टाईल फुटबॉलपटू आहे. तिच्यामध्ये कलाकार आणि फुटबॉलपटू यांचा अनोखा संगम झाला आहे. फुटबॉलची कला सादर करण्यासाठी तिला ११ खेळाडूंच्या संघाची गरज पडत नाही.
केरळच्या कोझिकोडची असलेली हादिया वयाच्या १२ व्या वर्षी फ्रीस्टाईलिंगकडे वळली. ती कतारमध्ये शाळेत असताना फुटबॉल खेळायची. तिचे कुटुंब केरळला परतले, तेव्हा १२ वर्षांच्या हादियाला फुटबॉल खेळणे सुरूच ठेवण्याची तीव्र इच्छा होती. दुर्दैवाने, तिच्या घराच्या किंवा शाळेजवळ मुलींसाठी फुटबॉल संघ नव्हते. पण फुटबॉलशी तिचे नाते इतके घट्ट होते की, तिने हार मानली नाही.
हादिया हकीमने युट्यूबवर फ्रीस्टाईलिंगचे ट्युटोरियल्स शोधले आणि घरातच अनेक वर्षे सातत्य आणि सरावाने ती ही कला स्वतः शिकली. तिने युट्यूबवर आपल्या फ्रीस्टाईलिंगचे व्हिडिओ पोस्ट करण्यास सुरुवात केली. त्यांना हजारो व्ह्यूज मिळू लागले. अनेक तरुण तिला फॉलो करू लागल्याने ती इन्फ्लुएंसर म्हणून उदयाला आली. २०२२मध्ये कतारमधील फिफा (FIFA) आयोजन समितीचे लक्ष तिच्या व्हिडिओने वेधून घेतले आणि फिफाकडून तिला इन्फ्लुएंसर म्हणून विश्वचषक स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले.
यावेळी सामन्याच्या मधल्या वेळेत ४०,००० प्रेक्षकांसमोर तिला आपली कला सादर करण्याची संधीही मिळाली. फ्रीस्टाईल फुटबॉल जरी दक्षिण आशियातील काही पारंपरिक खेळांशी जोडले जात असले तरी, त्याचा सराव जादूच्या प्रयोगांमध्ये आणि नंतर मॅराडोनासारख्या प्रसिद्ध फुटबॉलपटूंकडून केला गेला आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाल्यामुळे आता या खेळाच्या चॅम्पियनशिप्स होतात.
हादिया हकीम म्हणते, तिचा आतापर्यंतचा प्रवास समाधानकारक राहिला आहे. आपल्या इंस्टाग्राम हँडलवर ती म्हणते, "फ्रीस्टाईल फुटबॉलमधील माझ्या प्रवासामुळे मला ॲथलेटिसिझम, कला आणि प्रभाव यांना एकत्र आणता आले. त्यामुळे मी एक कलाकार, ॲथलीट आणि कन्टेन्ट क्रिएटर म्हणून विविध भूमिका साकारू शकले."
बुर्ज खलिफाबाहेर आपली कला सादर करताना, ती आनंदाने सांगते की त्या पोस्टला आतापर्यंत मिलीयन्स लाईक्स मिळाले आहेत. ती म्हणते की, या खेळामुळे तिला जागतिक प्रेक्षकांशी संवाद साधता आला आणि फुटबॉल, फ्रीस्टाईल फुटबॉल व क्रीडा माध्यमांतील व्यावसायिकांशी जोडून घेता आले. यासाठी या खेळाची ऋणी आहे, असे ती म्हणते.
२०२३मध्ये फिफा विश्वचषक पाहण्यासाठी जमलेल्या आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर दोहा येथील स्टेडियममध्ये कला सादरीकरण हा तिचा शेवटचा गौरवाचा क्षण होता.
कोझिकोडमधून पदवी पूर्ण केल्यानंतर ती आता आपल्या कला सादरीकरणात आणि सोशल मीडिया कन्टेन्ट क्रिएटरच्या भूमिकेत व्यस्त आहे. एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये ती लिहिते: "मी शक्ती, उद्देश आणि एक फुटबॉल सोबत घेऊन चालते. केवळ माझ्यासाठी नाही; तर हे पाहणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी."
तिच्या बहुतेक इंस्टाग्राम पोस्टमध्ये महिला सक्षमीकरण आणि खेळांमधील महिला हे हॅशटॅग असतात, जणू काही तिच्या फ्रीस्टाईल फुटबॉलच्या उत्कटतेमागे हा एक छुपा संदेश आहे. या खेळामुळे तिला ओळख मिळाली आहे आणि त्या ओळखीने तिला स्वातंत्र्य दिले आहे, भव्य आसमंताखाली तिची स्वतःची जागा दिली आहे.
हादिया हकीमने आपले स्वातंत्र्य आणि आपले व्यक्तिमत्व आपल्या कलेद्वारे मांडण्याचा करण्याचा प्रयत्न केला. तिने तिच्या परंपरा किंवा संस्कृतीला त्यात अडथळा होऊ दिलेला नाही. "तुझा पोशाक जाचक आहे" असे लिहिलेल्या एका पोस्टमध्ये, ती या धारणेची खिल्ली उडवते आणि हिजाब गाऊन घालून सहजतेने फ्रीस्टाईल कला सादर करते. 'हिजाब दिन' साजरा करताना, ती पोस्ट करते, 'हिजाब सुंदर आहे, तो प्रेमाने आणि अभिमानाने परिधान करा'.
हादिया बहुतेक वेळा फ्रीस्टाईल करताना ट्राउझर्स, एक सैल टॉप आणि डोक्यावर स्कार्फ घालते. ती अशा प्रकारच्या कपड्यांसाठी जाहिरातीही करते... "माझ्या फुटबॉल फॅनडमसाठी योग्य पोशाख सापडले!"
हादिया आता कायमची युएईमध्ये स्थायिक झाली आहे. तिथे तिने आपल्या आवडीचे काम सुरू ठेवले आहे. तिचे आता लग्न झाले आहे. सोशल मिडीयावर एका मजेशीर पोस्टमध्ये ती म्हणते: "आयुष्यासोबत जुगलबंदी करण्यासाठी कुणीतरी सापडले..."
पण हादिया आपल्या सर्व पोस्टमधून आणि कलेतून हाच संदेश देऊ इच्छिते की, "तुम्हाला जो बदल घडवायचा आहे, त्याची सुरुवात स्वतःपासून करा..."