विद्यार्थ्यांना धर्माचा एकात्मिक अभ्यासक्रम शिकवणाऱ्या एका अद्वितीय संस्थेचे ओणमपल्ली मुहम्मद फैसी प्रमुख आहेत. केरळमधील त्रिशूर येथील त्यांची 'ॲकॅडमी ऑफ शरियत अँड ॲडव्हान्स्ड स्टडीज' या संस्थेतील विद्यार्थ्यांना केवळ इस्लामिक ग्रंथच नव्हे, तर संस्कृत आणि वेदांताचे धडेही दिले जातात.
या ॲकॅडमीचे प्राचार्य असलेले फैसी स्वतः कलाडी येथील श्री शंकरा विद्यापीठाचे संस्कृत विद्वान आहेत. संस्कृत ग्रंथांमध्ये संशोधन करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र हे स्वप्न ते पूर्ण करू शकले नाहीत.
'ॲकॅडमी ऑफ शरियत अँड ॲडव्हान्स्ड स्टडीज' ही संस्था 'समस्त' या सुफी सुन्नी मुस्लिम विद्वानांच्या संस्थेबद्दलही बरेच काही सांगून जाते, ज्यांनी एका दशकापूर्वी या ॲकॅडमीची सुरुवात केली होती. तथापि, फैसी यांनी येथील अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली. त्यांनी काही वर्षांपूर्वी संस्कृत भाषा आणि साहित्याला अभ्यासक्रमाचा अनिवार्य भाग बनवले.
विद्यार्थी दहावीनंतर एका प्रवेश परीक्षेद्वारे ॲकॅडमीमध्ये प्रवेश घेतात. ते इस्लामिक स्टडीजमध्ये आपले इंटरमिजिएट, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करतात. संस्कृत हा त्यातील एक प्रमुख पेपर असतो.
यामागील भूमिका स्पष्ट करताना ओणमपल्ली फैसी सांगतात की, "विद्यार्थ्यांनी डोळ्यावर झापडं लावून न जगता, सर्व काही जाणून घ्यावे अशी माझी इच्छा आहे." ओणमपल्ली कुराण आणि उपनिषदांवरही प्रवचन देत आले आहेत. त्यांना वाटते की आधुनिक शाळांनी मूल्य-आधारित शिक्षणाचा समावेश केला पाहिजे. "मूल्यांशिवाय शिक्षण पोकळ आहे," असे ते म्हणतात.
ओणमपल्ली फैसी केवळ ज्ञान कुठूनही आले तरी ते स्वीकारण्याबद्दल मोकळे नाहीत, तर त्यांनी विविध धर्मांच्या लोकांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठीही पुढाकार घेतला आहे.
ओणमपल्ली केरळमधील 'सीसीसी' (CCC - कौन्सिल फॉर कम्युनिटी कोऑपरेशन) च्या संस्थापकांपैकी एक आहेत. या परिषदेच्या मंडळावर दलाई लामा, शशी थरूर, स्वतः फैसी, स्वामी हरिप्रसाद, हिंदू नेते रामचंद्रन, बिशप अँटनी वडक्केकरा आणि इतर अनेक विविध धर्मांचे लोक आहेत.
केरळमध्ये सध्या केवळ दोन केंद्रे असलेली 'सीसीसी' लवकरच सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारणार आहे. "सर्व समुदायांसाठी अभिव्यक्तीचे एक समान व्यासपीठ असावे, जेणेकरून कोणीही एकटे किंवा वेगळे पडणार नाही, हे परिषदेचे उद्दिष्ट आहे," असे ओणमपल्ली सांगतात.
सध्या 'सीसीसी'च्या आगामी वार्षिक बैठकीत व्यस्त असलेले ओणमपल्ली फैसी शेवटी म्हणतात की, "राजकीय आणि हितसंबंधी गट धर्माचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत आहेत. आज प्रत्येक संस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे आणि यासाठी धर्म नव्हे, तर राजकारण जबाबदार आहे. लोक आपल्या स्वार्थासाठी धर्माचे राजकारण करत आहेत."