मर्झिया शानू पठाण : सामाजिक आणि राजकीय बदलाची प्रेरणा!

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्झिया शानू पठाण
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्झिया शानू पठाण

 

भक्ती चाळक 

मुंबईच्या मुंब्रा उपनगरात सांस्कृतिक वैविध्य आणि सामाजिक आव्हाने एकत्र नांदतात. याच मुस्लिमबहुल मुंब्र्यात राजकीय चुणूक दाखवत एक मुस्लिम युवती नव्या बदलाची प्रेरणा बनली आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तिचे कार्य केवळ प्रेरणादायीच नाही, तर समाजातील लोकमान्यतेला आव्हान देणारे आहे.  

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारी मर्झिया शानू पठाण मुंब्र्यातील नागरी समस्या सोडवण्यासाठी अथक प्रयत्न करतेय. मुस्लिम समाजातील पारंपरिक बंधने तोडत, शिक्षण आणि नेतृत्वाच्या जोरावर ती स्वतःसह समाज आणि विशेषत: महिलांना सक्षम बनवत आहे. 

महिलांना विशेषता मुस्लिम समाजातील महिलांना शिक्षण घेण्यासाठी अनेक अडथळे येतात. त्यांच्या स्वप्नांना सामाजिक बंधनांची किनार असते. अशा परिस्थितीत मर्झियाने स्वतःचे शिक्षण पूर्ण करून, राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. कुटुंबातून राजकीय वारसा मिळाला असला तरीही एमएसपी केअर फाउंडेशनच्या माध्यमातून समजकार्यात स्वतःचा वेगळा ठसा उमटवत आहे. 
 
 

मुंब्रा हे क्षेत्र दाट लोकवस्ती, अपुरी नागरी सुविधा आणि सामाजिक-आर्थिक मर्यादा यांचा संगम आहे. या आव्हानांमध्ये राजकीय नेतृत्व स्वीकारत मर्झिया सामाजिक सुधारणांसाठी झटत आहे. तिचे कार्य राजकीय मंचापुरतेच मर्यादित नाही. तर ती मुंब्र्यातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या मूलभूत समस्यांसाठी वाचा फोडतेय. स्थानिक नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन, त्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ती सातत्याने प्रयत्न करत आहे. 

लहान वयात मोर्चाचे नेतृत्व 
तालिबानने पाकिस्तानातील स्वात खोऱ्यावर ताबा मिळवल्यानंतर मलाला यूसुफईने तिच्या शिक्षणाच्या हक्कासाठी लढा दिला होता. २०१२ मध्ये डोक्यात गोळी झेलून मलाला हिला तिच्या या लढ्याची किंमत चुकवावी लागली होती. मात्र यानंतर तिने पुन्हा उभे राहून शिक्षणासाठी हक्क बजावला. त्याच काळात स्त्रीशिक्षणाच्या हक्कासाठी मुंब्र्यात मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी त्या मोर्चाचे नेतृत्व १२ वर्षांच्या मर्झियाने केले होते. तेव्हापासूनच मर्झिया सामाजिक प्रश्न हाताळण्यात अग्रेसर आहे. 
 
 
 
वडिलांचा पाठिंबा 
मर्झिया ही ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अश्रफ (शानू) पठाण यांची कन्या आहे. बाप-लेकीची ही जोडी गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील मुलभूत प्रश्नांवर काम करत आहे. पाणी, कचरा, आरोग्य, महिला अत्याचार यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी ते सातत्यपूर्ण लढा देत आले आहेत. विशेषतः परिसरात नालेसफाई आणि कचरा प्रश्नावर ती जास्त काम करत आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ती समजकार्यात उतरली आणि आता एका राजकीय पक्षाची धुरा सांभाळतेय. 

 
मर्झिया एमएसपी केअर फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील सामाजिक प्रश्नांवर काम करत आहे. विद्यार्थी आणि तरूणांमध्ये संविधानाप्रति जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचेही ती आयोजन करते. तिच्या समाजकार्याच्या माध्यमातून आज ती तरुणांच्या स्वप्नांना उभारी देत आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना ती शिक्षणाच्या प्रवाहात आणत आहे. मर्झियाचे हे कार्य समाजातील इतर मुलींसाठी आशेचा किरण ठरत आहे. तिच्या नेतृत्वात मुंब्रा परिसरातील नागरिकांसाठी दर महिन्याला नेत्र तपासणीचे शिबीर भरवले जातात. त्यामाध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुद्धा मोफत केल्या जातात.  
 

रमजानच्या काळात ट्राफिकचे नियोजन
दोन वर्षांपूर्वी मर्झियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हिजाब परिधान केलेली मर्झिया एकदम आत्मविश्वासाने मुंब्र्याच्या रस्त्यांवर ट्राफिकचे नियोजन करत होती. रमजानच्या काळात आपल्या महिला साथीदारांसह मुंब्र्यासारख्या दाट वस्ती असलेल्या परिसरात रात्री दीड-दोन वाजेपर्यंत ती ट्राफिकचे नियोजन करते. 

याविषयी बोलताना मर्झिया म्हणते, “महाराष्ट्रात मोहम्मद अली रोडनंतर सर्वात मोठी बाजारपेठ मुंब्र्यात भरते. रमजानच्या काळात मुंब्रा-कौसा परिसरात दूर दूर वरून अनेक महिला खरेदीसाठी येतात. या काळात त्यांना सुरक्षितरीत्या रस्त्यांवर फिरता यावे म्हणून त्यांच्या सुरक्षेची काळजी आम्ही मुंब्र्यातील महिलांनी घेण्याचे ठरवले.” 

‘राजकारणातील महिला समाजात बदल घडवू शकतात’
मर्झियाचा राजकारणातील सहभाग हा केवळ समानतेपुरता मर्यादित नसून, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पाऊल आहे. एका मुस्लिम महिलेचे राजकीय प्रतिनिधित्व हे त्या समाजातील महिलांच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक न्याय आणि समावेशक धोरणांना चालना देण्यासाठी महत्त्वाचे आहे. मर्झियाचा राजकारणातील सहभाग हा सामाजिक पूर्वग्रह आणि रूढींना आव्हान देणारा तर आहेच परंतु, मुस्लिम महिलांबद्दलच्या गैरसमजांना दूर करणारा देखील आहे. 

राजकारणातील महिलांच्या सहभागाविषयी बोलताना मर्झिया म्हणते, “जनतेच्या मनात राजकीय प्रतिनिधींविषयी कुठेतरी नकारात्मक प्रतिमा तयार झालेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये वावरताना किंवा त्यांच्या अडचणी समजून घेताना मी कधीच राजकारणी म्हणून काम करत नाही. मी स्वतःला सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारी ‘लीडर’ समजते.” 
 
 
 
ती पुढे म्हणते, “मी खूप लहानपणापासून माझ्या वडिलांना समाजासाठी झटताना पाहिले आहे. त्यांना पाहूनच माझ्यामध्ये समाजकार्याची भूक निर्माण झाली. त्यामुळे मी नेहमी सांगते, ‘मर्झिया’च्या पुढे ‘शानू’ नाव लागणे खूप गरजेचे आहे. माझे आई-वडील मला या कार्यासाठी खूप प्रोत्साहन देतात. त्यांनी मला समाजकार्यासाठी कधीच नाही म्हटलेले मला आठवत नाही.” 

राजकारण नाही, समाजकार्याची आवड 
मर्झिया सांगते, “मी अगदी लहानपणापासूनच शिक्षण, महिला सक्षमीकरण, व्यसणमुक्तीच्या आंदोलनांमध्ये सहभागी व्हायचे. मला समाजासाठी काहीतरी करायचे या उद्देशाने मी सरकारी अधिकारी होण्याचे ठरवले. त्यासाठी मी पुण्यात आले आणि स्पर्धापरीक्षांचा अभ्यास सुरू केला. परंतु त्याच काळात कोरोना महामारी सुरू झाली आणि मी पुन्हा मुंबईत आले. त्यावेळी मी माझ्या वडिलांना जिवाची पर्वा न करता लोकांची सेवा करताना पहिले आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने मी समाजकार्य सुरू केले.” 

महिलांचे नेतृत्व
राजकारणात महिलांचा सहभाग वाढत असला तरी त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. पितृसत्ताक सामाजिक रचना आणि रूढीगत मानसिकता यामुळे महिलांना राजकीय क्षेत्रात पुढे येणे कठीण होते. याशिवाय सार्वजनिक जीवनात त्यांना टीकेला देखील सामोरे जावे लागते. परंतु तरीही या आव्हानांवर मात करून महिला नेतृत्व समाजात सकारात्मक बदल घडवू शकते, असे मर्झियाचे म्हणणे आहे.  

याविषयी ती म्हणते, “राजकारण किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात ज्या महिला आपलं स्थान निर्माण करू पाहत आहेत, त्या सगळ्यांना मी मानते. कारण त्या स्वतःच्या जिद्दीवर अस्तित्व निर्माण करत आहेत. माझे वडील राजकारणात असले तरी मलाही इतरांप्रमाणे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झगडावे लागले. परंतु मी नशीबवान आहे, मला पूर्ण पाठिंबा देणारे वडील मिळाले.”

सच्चर कमिटीच्या २००९ च्या अहवालानुसार मुस्लीम मोहोल्ल्यांमध्ये पायाभूत सुविधांचा प्रचंड वानवा असल्याचे चित्र समोर आले होते. मोहोल्ल्यांमधील परिस्थिती आजही फारशी बदललेली नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन मुंब्र्यासारख्या मुस्लीमबहुल भागात मर्झिया पुढाकार घेऊन राजकारणासोबतच धडाडीने समाजकारणाला देखील प्राधान्य देतीये. 
 

शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, मुलभूत सुविधा या गोष्टींकडे ती प्रशासनाचे लक्ष वेधून घेत आहे. संविधानिक मार्गाने सत्याग्रह आणि आंदोलने करून, तसेच प्रसंगी थोडी आक्रमक भूमिका घेऊन ती हे प्रश्न प्रशासनापुढे मांडण्याचा प्रयत्न करतीये.  वेळीच प्रशासनासोबत झगडून त्यांना या गोष्टीची दाखल घ्यायला लावतेय. तिच्या या नेतृत्वाला आणि लढाईला काहीसे यश मिळताना दिसतेय.  मुंब्र्यातील वर्षानुवर्षांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात ती सफल होत आहे.

आज मर्झिया सारख्या तरुण मुस्लीम मुलीने राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. राजकारणातील कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर अवलंबून न रहाता तिने स्वतःचे सामाजिक कार्य उभे केले. इतकेच नव्हे तर समाजकार्यात स्वतःला झोकून देऊन ती अगदी सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे ती काम करतेय. तिची समाजकार्यातील हीच चुणूक आणि तिचे नेतृत्व बघून तिला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे महत्वाचे पद बहाल करण्यात आले आहे. मर्झियाने घेतलेल्या या भरारीने अनेक महिलांच्या पंखाना बळ मिळत आहे. तिच्या या समाजकारणाला आणि राजकारणाला ‘आवाज द वॉइस’च्या शुभेच्छा! 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter