सबा खान : मुंब्राच्या मुलींसाठी स्वप्नांचे मैदान उभारणारे प्रेरणादायी नेतृत्व

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
सामाजिक कार्यकर्त्या सबा खान
सामाजिक कार्यकर्त्या सबा खान

 

भक्ती चाळक 

मुस्लिमबहुल मुंब्राच्या गजबजलेल्या गल्ल्यांमधून स्वप्ने उराशी बाळगून मैदानात उतरणे सोपे नव्हते. परंतु सबा खान यांनी सामाजिक रूढींना आव्हान देत त्या दिशेने एक पाऊल टाकले. ‘परचम’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहसंस्थापक आणि समाजसेविका असलेल्या सबा यांनी मुलींसाठी क्रीडा क्षेत्रात योगदान देण्याचे ठरवले. त्यांच्या या उपक्रमाने मुंब्राच्या मुलींना पारंपरिक बेड्या तोडून आकाशाला गवसणी घालण्याची ताकद दिली आहे.

आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या सबा यांचे कार्य केवळ व्यायाम आणि मनोरंजनापुरते मर्यादित नाही. त्यांचा हा उपक्रम मुलींना खेळासाठी जागा मिळवून देण्याचा आणि त्यांच्यात आत्मविश्वास वाढवण्यासाठीचे एक महत्वाचे पाऊल आहे. त्यांच्या या उपक्रमाने मुंब्राच्या मुलींना मैदानावरच नव्हे, तर आयुष्यातही ‘गोल’ करण्याची प्रेरणा दिली आहे. सामाजिक बंधने तोडत, लैंगिक समानता आणि धार्मिक ऐक्याला प्रोत्साहन देणारी त्यांची ही चळवळ आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
 

मुंब्रामध्ये ८०-९० टक्के मुस्लिम समाज आहे. तिथेच मदनपुरामध्ये एका मुस्लिम कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि बालपणही गेले. आई-वडील आणि तीन भावंडांचे त्यांचे सर्वसामान्य कुटुंब. आई शिक्षिका तर वडील रेल्वेमध्ये नोकरीला. पालक उच्चशिक्षित असल्याने घरात परिवर्तनाचे वातावरण होते. याचाच प्रभाव सबा यांच्यावर पडला आणि त्यांनी समाजकार्याचा मार्ग निवडला. अर्थशास्त्रात पदवीधर होऊन त्यांनी टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS)मधून समाजकार्यात पदव्युत्तर पदवी मिळवली. इथून पुढे सबा यांच्या समाज कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. 

‘परचम’ची स्थापना 
मुंब्रातील महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम सबा करतच होत्या. परंतु २०१२ मध्ये त्यांनी  समाजकार्याच्या दिशेने संस्थात्मक पाऊल टाकले. ‘मॅजिक बस’ या संस्थेच्या साथीने मुलींना फुटबॉलचे प्रशिक्षण देण्याचे त्यांनी ठरवले. यासाठी त्यांनी २०१३ मध्ये ‘परचम’ नावाची नोंदणीकृत संस्था सुरू केली. 

याविषयी सबा सांगतात, “मी सुरुवातीपासूनच मुंब्राच्या मुस्लिम महिलांच्या सबलीकरणासाठी काम करत होते. त्यामुळे माझी तेथील महिलांसोबत चांगली ओळख होती. या महिलांसाठी काहीतरी चांगले करण्याची संधी माझ्याकडे चालून आली. मॅजिक बस संस्थेत कार्यरत असलेल्या माझ्या एका मित्राने मुंब्रातील मुलींना प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव माझ्यापुढे मांडला. त्यानंतर मी लगेचच मुलींसोबत याविषयी चर्चा केली आणि मुलीही तयार झाल्या.”
 

सबा यांच्यासाठी सुरुवात सोपी नव्हती. खेळासाठी मैदान मिळवण्यापासून ते मुलींचा फुटबॉल संघ उभा करण्यापर्यंत संघर्ष मोठा होता. सर्वात आधी घराघरात जाऊन त्यांनी पालकांशी संवाद साधला. फुटबॉलमुळे मुलींचे भविष्य उजळेल हे पटवून दिले. पालकांचा विरोध, मुलींना फुटबॉल खेळण्यावरून टीका आणि मुलींसाठी खेळाचे मैदान मिळवण्याचा प्रवास खडतर होता. परंतु तरीही सबा यांनी हार मानली नाही. 

मैदान मिळवण्यासाठी संघर्ष 
जास्तीत जास्त मुलींना खेळता यावे यासाठी सबा यांनी शाळा-महाविद्यालयांमध्ये पत्रके वाटली, मुलींना प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. काही काळाच्या अविरत मेहनतीनंतर अखेर मुलींचा फुटबॉल संघ तयार झाला. परंतु आता प्रश्न होता फक्त मैदानाचा. मुलींना पुरुष खेळाडूंसोबत मिश्र मैदाने वापरावी लागायची. यातूनच सबा यांच्या नेतृत्वाखाली मुलींनी स्वतःचं मैदान मिळवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली. त्यासाठी मुंब्रामधील जवळपास १००० महिलांच्या स्वाक्षरी घेतल्या. 

या अभियानाबद्दल बोलताना सबा सांगतात, “मुंब्रातील महिलांच्या स्वाक्षरी घेऊन आम्ही आमदार जितेंद्र आव्हाडांकडे गेलो. आमच्या या उपक्रमाबद्दल ऐकून सुरुवातीला ते चकित झाले. कदाचित मुस्लिम मुली फुटबॉल खेळत असतील असा विचारही कुणी केला नसेल. परंतु आमच्या कामाबद्दल ऐकून ते खुश झाले आणि त्यांनी उपक्रमाचे कौतुक केले. मग त्यांनी आम्हाला आयुक्त असीम गुप्ता यांना भेटवले. त्यांनंतर आयुक्तांनी आमच्यासाठी मैदान राखीव ठेवले.”
 

सबा पुढे म्हणतात, “मैदानासाठीचा आमचा संघर्ष इथेच संपला नाही. मैदानासाठीच्या राखीव जागेला जवळजवळ १० वर्षे होत आलीत. परंतु अजूनही आम्हाला हक्काचे मैदान मिळालेले नाही. मैदानासाठीच्या असलेल्या राखीव जागेचा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वापर केला जातो. त्यामुळे बऱ्याचदा आमच्या खेळाच्या प्रॅक्टिसमध्ये व्यत्यय येतो.  राखीव मैदान मिळवण्यासाठी आता आम्ही पुन्हा आमदारांकडे गेलो. येत्या काळात आम्हाला मैदान मिळाले नाही तर आम्ही आंदोलन करू.”

धार्मिक ऐक्याला प्रोत्साहन देणारे मैदान 
सबा यांनी मुलींना फक्त फुटबॉलच नाही, तर स्वप्नांना पंख आणि समाजात सन्मानाने उभे राहण्याचे बळ दिले. त्यांच्या या कार्याने लैंगिक आणि धार्मिक भेदभाव मिटवत समाजात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पाया रचला. सबा सांगतात, “आज समाजात धर्माच्या नावावर अतिशय द्वेषाचे वातावरण पसरलेले आहे. सोशल मीडियाद्वारे मुस्लिम समाजाबद्दल अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. मग अशा द्वेषाच्या वातावरणात आम्ही खेळातून मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्याचे ठरवले.”

त्या पुढे म्हणतात, “लहानपणी आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींसोबत सण-उत्सव साजरे करायचो, त्यामुळे आम्हाला एकमेकांच्या संस्कृतींबद्दल माहिती होती. परंतु आजकालच्या मुलांना या गोष्टी माहितीच नाहीत. एखाद्या समाजाबद्दल असलेल्या गैरसमजांचे हेच एक मोठे कारण ठरत आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही समाजातील मुलींना एकत्र खेळवाचे ठरवले. फुटबॉल हा सांघिक खेळ आहे त्यामुळे सगळ्या मुली एकाच संघात मैत्रीपूर्ण भावनेने खेळतील असा विचार आम्ही केला. परचमची सुरुवातच आम्ही याच उद्देशाने केली.”
 

पहिल्या संघाच्या आठवणी सांगताना सबा म्हणतात, “सुरुवातीचा काळ आमच्यासाठी खूप कठीण होता. आमचा पहिला संघ ४० मुलींचा होता. त्यातील फक्त ५-६ मुलींच्या कुटुंबांनाच माहिती होते की आपल्या मुली फुटबॉल खेळतात. बाकी इतर मुली अभ्यासाचे कारण देऊन लपून घराबाहेर पडून फुटबॉल खेळायच्या. मुली खोटे बोलून येतात हे आम्हालाही पटत नव्हते त्यामुळे आम्ही फुटबॉल प्रॅक्टिसनंतर त्यांचे इंग्रजीचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली. परिणामी आत्ता पालक स्वतः मुलींना फुटबॉल साठी प्रोत्साहन देऊन आमच्याकडे पाठवत आहेत.”  

‘फुटबॉलर्स ऑफ परचम’ 
भारतासारख्या पुरुषप्रधान देशात, विशेषता मुस्लिम समाजातील रूढींमुळे महिलांना खेळात सहभागी होणे कठीण आहे. चुकीच्या धार्मिक समजुती आणि सांस्कृतिक बंधने यामुळे महिला खेळात मागे राहतात. सबा खान यांनी या बंधनांना छेद दिला. अधिकाधिक मुलींना फुटबॉल खेळायला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी ‘फुटबॉलर्स ऑफ परचम’ नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी फुटबॉल खेळण्यासाठी संघर्ष करणाऱ्या १२ हिंदी आणि मुस्लिम मुलींची गोष्ट सांगितली आहे. 

'हिजाब अडथळ्याचे कारण ठरू शकत नाही'
आज मुंब्राच्या मैदानांवर मुलींचे अनेक संघ खेळताना दिसतात. पण त्यामागचा लढा खूप मोठा आहे. सबा यांनी मुलींच्या कुटुंबांना विश्वासात घेण्यासाठी आणि त्यांना फुटबॉल खेळण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी पालकांशी सातत्याने चर्चा केली. पालकांसाठी शहरातील ५-६ ठिकाणी समुपदेशन सत्रे आयोजित केली. यात मुलींच्या खेळण्यामुळे त्यांच्या शिक्षणावर, आत्मविश्वासावर आणि नेतृत्वगुणांवर होणारा सकारात्मक परिणाम पटवून दिला. 

याविषयी सबा सांगतात, “मुलींच्या पालकांना अनेक गोष्टींची काळजी असते. त्यामुळे फुटबॉलसाठी पालक सहजासहजी तयार होत नव्हते. मग आम्ही पालकांसोबत बोलून त्यामागचे नेमके कारण जाणून घेतले. त्यात गंभीर्याने लक्षात येणारी बाब म्हणजे अनेक पालकांना मुलींच्या कपड्यांबाबत समस्या होती. ही समस्या केवळ मुस्लिमच नाही तर हिंदू पालकांची सुद्धा होती. मुलींनी शॉर्ट्स घालून बाहेर पडणे त्यांना मान्य नव्हते.”
 

त्या पुढे म्हणतात, “आम्ही सुद्धा खेळासाठी मुलींना कोणत्या ठराविक कपड्यांची सक्ती केली नाही. त्यांनी घराबाहेर पडून खेळणे आमच्यासाठी महत्वाचे आहे, मग ते कोणत्याही कपड्यांमध्ये असो. आमच्या संघात इतर धर्मातील अनेक मुली उत्तरप्रदेश, बिहारवरून आलेल्या आहेत, त्यांच्याकडे डोक्यावरून पदर घेण्याची प्रथा आहे. किंवा अनेक मुस्लिम कुटुंबांमध्ये हिजाबचे बंधन असते. मग अशावेळी खेळासाठी आम्ही ठराविक ड्रेसकोड ठेवला तर या मुलींना घराबाहेर पडताच येणार नाही. त्यांना मनमोकळं खेळता यावं यासाठी आम्ही त्यांच्यावर कोणतीही सक्ती केलेली नाही.”

विद्यार्थी सक्षमीकरणाचे व्यासपीठ  
परचम हे केवळ मुलींच्या सक्षमीकरणाचे व्यासपीठ नाही तर इथून अनेक विद्यार्थी सुद्धा घडत आहेत. संस्थेची सुरुवात जारी फुटबॉलच्या उद्देशाने झाली असली तरी यामार्फत अनेक उपक्रम राबवले जातात. त्यांच्या इतर उपक्रमांविषयी सबा सांगतात, “या मुस्लिमबहुल भागात गरीबीचे प्रमाण जास्त आहे. यामुळे अनेक मुलांना शिक्षण घेणे अवघड जाते. त्यांना शाळेत ज्या गोष्टी शिकता येत नाहीत, ते प्रशिक्षण देण्याचे ठरवले. कम्प्युटर वापरणे, प्रेजेंटेशन बनवण्यापासून शिकवायला सुरुवात केली.”

त्या पुढे म्हणतात, “या मुलांना समाजात सक्षम बनवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आम्ही शिकवतो. त्यांना संविधान, लोकशाही, राजकारण यांचे महत्व आणि त्याविषयची माहिती देतो. गेल्या सहा वर्षांपासून आम्ही ‘उरूज’ नावाचा एक उपक्रम राबवत आहोत. त्याद्वारे आम्ही मुलांना राजकीय, सामाजिक नेतृत्वांसोबत संवाद साधण्याची संधी देतो. यातून त्यांना राजकीय आणि समाजव्यवस्थेची ओळख तर होतेच परंतु त्यांचा आत्मविश्वास देखील वाढतो. या उपक्रमांमुळे मुंब्रामध्ये परचमच्या मुलांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.” 
 

‘सावित्री-फातिमा फाउंडेशन’द्वारे महिलांना माहेरपण  
सबा यांचे कार्य मुला-मुलींपुरतेच मर्यादित नाही, तर त्या महिला सशक्तीकरणासाठी देखील झटत आहेत. ‘सावित्री-फातिमा फाउंडेशन’द्वारे त्या महिलांसाठी अनेक उपक्रम राबवतात. महिलांना माहेराव्यतिरिक्त मनमोकळं करण्यासाठी हक्काच घर सबा यांनी मिळवून दिले. ‘गुफ्तगू’च्या छत्रछायेत त्या महिलांना आश्रय देतात. याविषयी सबा सांगतात, “आम्ही गुफ्तगू नावाची एक हक्काची जागा तयार केली निर्माण केली. जिथे महिला येऊन निवांत बसू शकतात. तिथे अनेक बैठे खेळ, पुस्तके, टीव्ही सारखे मनोरंजनाची साधने तिथे ठेवलेली आहेत.”
 

त्या पुढे म्हणतात, “गुफ्तगू ही अशी जागा आहे जिथे अनेक नाती जोडली गेली. अनेकांना मैत्रिणी मिळाल्या. इथे केवळ मनोरंजनच नाही तर आर्थिक सक्षमीकरण देखील होते. अनेक मुस्लिम महिलांना पैसा कमावण्यासाठी घराबाहेर पडता येत नाही. अनेक कुटुंबांमध्ये महिलांना शालेय शिक्षणसोबातच मेहंदी आणि शिवणकाम देखील शिकवले जाते. मग या व्यवसायाला मोठ्या स्तरावर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत. आम्ही या महिलांना याबाबतले प्रशिक्षण दिले आणि परिणामी टाटा इंस्टीट्यूटमध्ये महिलांनी शिवलेल्या बॅग्सचा पहिला स्टॉल आम्ही यशस्वीरित्या लावला. इथे दोन दिवसात आम्ही २२ हजारांच्या वस्तु विकल्या.” 

आज अनेक तरुण-तरुणी परचमच्या या उपक्रमांमध्ये योगदान देत आहेत. लैंगिक समानतेसाठी ही सगळी मंडळी सबा यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. मुंब्राच्या या मुली केवळ बॉलला लाथ मारण्यापुरत्या मर्यादित नसून त्या आत्मविश्वासाने स्वप्नांचा पाठलाग करत आहेत. हिजाब घालूनही मैदानात खेळता येऊ शकते याचा आत्मविश्वास सबा यांनी मुलींना दिला. त्यांच्या या चळवळीने मुंब्रासारख्या मुस्लीमबहुल भागातील रहिवाश्यांच्या दृष्टीकोनात आश्वासक बदल घडतो आहे. आणि तो  एका नव्या, सशक्त समाजाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. सबा यांच्या या कार्याला ‘आवाज द वॉइस’च्या शुभेच्छा! 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter