भारतातील उत्साही तरुण-तरुणी त्यांच्या स्वप्नातील भारत साकारण्याची अनोखी संधी दिल्लीतील ‘खुसरो फाउंडेशन’ने उपलब्ध करून दिली आहे. संस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील वार्षिक निबंध स्पर्धेच्या माध्यमातून १४ ते १८ वयोगटातील भारतीय मुले-मुली भविष्यातील भारताचे चित्र निबंधाच्या माध्यमातून रेखाटू शकतील.
या निबंध स्पर्धेसाठी ‘माझ्या स्वप्नातील भारतातील माझी भूमिका’ असा विषय ठरवण्यात आला आहे. स्पर्धक मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, आसामी आणि उर्दू या भारतीय भाषांमध्येही निबंध लिहू शकतील. त्यासाठी दीड ते दोन हजारांची शब्दमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी निबंध जमा करण्याची अंतिम तारीख १४ ऑक्टोबर २०२३ असल्याचे संस्थेने निवेदनात म्हटले आहे.
स्पर्धेतील सर्वोत्तम निबंधाला रोख रक्कम ३०,००० आणि सुवर्णपटाने सन्मानित करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या निबंधांना अनुक्रमे रोख रक्कम २०,००० आणि १०,००० सोबत रजतपट व ताम्रपट दिले जाणार आहे. याशिवाय २५ निबंधांना उत्कृष्टतेचे प्रशस्तीपत्रही दिले जाणार आहे. विशेष म्हणजे सर्वोत्तम पाच निबंध ‘आवाज द व्हॉईस’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाणार आहेत.
‘खुसरो फाउंडेशन’ने आयोजित केलेल्या या वार्षिक निबंधलेखन स्पर्धेला डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानामुळे डॉ. कलाम यांनी जनसामान्यांच्या हृदयात जागा मिळवली. माजी राष्ट्रपती डॉ. कलाम हे राष्ट्राप्रती त्यांच्याठायी असलेल्या समर्पणाच्या भावनेसाठी ओळखले जात. त्यांच्या सन्मानार्थ खुसरो फाउंडेशनने या निबंधस्पर्धेला डॉ. कलाम यांचे नाव दिले आहे.
धर्म आणि विज्ञान सुसंवादाने एकत्र राहू शकतात, हे डॉ. कलाम यांनी दाखवून दिले. धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक भावना यांमध्ये त्यांनी उत्तम समन्वय साधला. त्यांचे जीवन एकता, देशभक्ती आणि ज्ञानलालसा यांनी ओतप्रोत भरलेले आहे. भविष्यातील भारत याविषयी त्यांनी केलेली मांडणी सर्वांनाच प्रेरणा आणि स्फूर्ती देणारी राहिली. त्यामुळे या स्पर्धेला त्यांचे नाव दिले जाने सयुक्तिकच आहे.
डॉ. कलाम यांचा जीवनप्रवास देशातील तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांचा ठाम निर्धार, ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न हे प्रत्येक महत्त्वाकांक्षी तरुण-तरुणीसाठी प्रेरित करण्याचे काम करते. त्यांचा वारसा नव्या पिढ्यांना प्रेरणा देत राहणार आहे. त्यांना त्यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रेरित करत आहे.
या स्पर्धेत सहभागी होणारे तरुण आणि तरुणी डॉ. कलाम यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवतील आणि विविध सामाजिक विषयांवर साधकबाधक चर्चा करतील, महानतेसाठी प्रयत्नशील राहतील, आव्हाने स्वीकारतील आणि समाज व देशाच्या उन्नतीला विधायक हातभार लावतील, असा खुसरो फाउंडेशनला विश्वास आहे.
या स्पर्धेमधून ‘माझ्या स्वप्नातील भारतातील माझी भूमिका’ या विषयावर विचारप्रवर्तक आणि दिशादर्शक निबंध आपल्या सर्वांना वाचायला मिळतील, अशी ‘खुसरो फाउंडेशन’ला आशा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तरुण-तरुणींना आपला विचार मांडण्याची, त्याद्वारे समाजात स्वतःची ओळख निर्माण करण्याची व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भविष्यातील भारताचे वैचारिक नेतृत्व करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
स्पर्धेचा विषय - माझ्या स्वप्नांच्या भारतात माझी भूमिका
निबंध स्पर्धेचे नियम आणि इतर तपशील पुढीलप्रमाणे
• शब्द मर्यादा : १५०० – २००० शब्द.
• निबंध स्पर्धकांनी स्वतः लिहिलेले असावेत.
• निबंध वर्ड किंवा पीडीफमध्ये पाठवावेत व फाइलला स्पर्धकाचे नाव असावे.
• निबंधासोबत स्पर्धकांनी ५०० शब्दांमध्ये स्वत:बद्दल माहिती लिहून पाठवावी.
• निबंधामध्ये स्वतःचा पत्ता, फोन नंबर आणि ईमेल समाविष्ट करणे बंधनकारक आहे.
निबंध कुठे पाठवावेत?
स्पर्धेसाठी निबंध www.khusrofoundation.org या वेबसाइटवर ऑनलाइन सबमिट करता येतील. किंवा [email protected] या ईमेल आयडीवरही निबंध पाठवता येतील. निबंध पोस्टाने पाठवण्याचा पर्यायही उपलब्ध असून ‘३१९ डी, डिफेन्स कॉलनी, नवी दिल्ली’ या पत्त्यावरही निबंध पाठवता येतील.
निबंध पाठविण्याची अंतिम तारीख : १४ ऑक्टोबर २०२३
खालील मुद्यांच्या आधारे मूल्यमापन केले जाईल
• अभिव्यक्ती, प्रवाह आणि सुसंगता यांची स्पष्टता.
• विषय समजून घेण्याची आणि त्याचा अर्थ लावण्याची क्षमता.
• संशोधन आणि तथ्यांच्या अचूकतेचा वापर.
• नाविन्य आणि सर्जनशीलता
• भाषा आणि व्याकरणाची अचूकता.
बक्षिसे :
प्रथम क्रमांक – ३०,००० रोख रक्कम आणि सुवर्ण सन्मानपत्र
द्वितीय क्रमांक – २०,००० रोख रक्कम आणि रजत सन्मानपत्र
तृतीय क्रमांक – १०,००० रोख रक्कम आणि कास्य सन्मानपत्र
संपर्कासाठी :
डॉ. हाफिजुर रहमान
संयोजक, खुसरो फाउंडेशन.
फोन : ९३१८४३१३४१.
‘खुसरो फाउंडेशन’विषयी
खुसरो फाऊंडेशन ही दिल्लीस्थित सामजिक संस्था आहे. इस्लामबद्दल योग्य माहिती देणे आणि अफवा व गैरसमज पसरवणाऱ्या घटकांचा मुकाबला करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. भारतीय समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी खुसरो फाऊंडेशनतर्फे उर्दू, हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये दर्जेदार साहित्य प्रकाशित केले जाते. संस्थेद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध धर्मीय लोकांमध्ये सौहार्द,सहिष्णुता आणि समजूतदारपणा वाढवण्यावर भर दिला जातो.
खुसरो फाऊंडेशनने नुकतेच सौदी अरेबियाचे माजी न्यायमंत्री व मुस्लिम वर्ल्ड लीगचे सरचिटणीस डॉ. मोहम्मद बिन अब्दुल करीम अल-इसा यांना भारतात आमंत्रित केले होते. इस्लामच्या उदारमतवादी मांडणीसाठी ते जगभर ओळखले जातात. धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेचा आदर करणारा समाज निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे व भारतीयांनामध्ये आत्मसन्मान, सकारात्मकता आणि आत्मविश्वास दृढ करणे, हे खुसरो फाऊंडेशनचे मुख्य उद्दिष्ट आहे.