असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया विभागाच्या उद्घाटनात बोलताना केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह
सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी), पुणेच्या असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया (एपीआय) चॅप्टरचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तसेच, यावेळी ‘वैद्यकीय क्षेत्रातील उदयोन्मुख कल' यावरील एपीआय-एएफएमएस कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन (सीएमई) च्या पहिल्या वार्षिक परिषदेचेही उदघाटन झाले.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, “एएफएमसी हे दिल्लीतील एम्स महाविद्यालय अस्तित्वात येण्यापूर्वी केंद्र सरकारची वैद्यकीय शिक्षणाची पहिली संस्था होती. स्वतंत्र एएफएमसीची कल्पना अन्य कोणाकडून नव्हे तर खुद्द डॉ. बी. सी. रॉय यांनी मांडली होती. डॉ. रॉय यांना असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया (एपीआय) या संस्थेला मोठे करण्याचे श्रेयही जाते. सामायिक वारसा म्हणून, एपीआय आणि एएफएमसीच्या एकत्र येण्याला एक ऐतिहासिक मूल्य आहे आणि पहिल्या पिढीतील डॉ. रॉय यांना ही योग्य मानवंदना असेल”.
परिषदेतील उद्घाटनपर भाषणात डॉ. सिंह म्हणाले, “कप्या-कप्यामध्ये काम करण्याचे युग आता संपले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील नऊ वर्षांच्या काळात मंत्रालये आणि विभागांसह विविध संघटना, विशेषत: आरोग्य सेवा क्षेत्रातील उच्च आणि नैपुण्य शिक्षण देणाऱ्या संस्था आणि उद्योग यांसारख्या सरकारच्या विविध संस्थांचे एकत्रीकरण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले आहेत.”
“निदान आणि उपचारात्मक वैद्यकीय शास्त्राच्या नवीन साधनांसाठी इष्टतम परिणाम साध्य करण्यासाठी समग्र आणि संपूर्ण विज्ञान दृष्टिकोन आवश्यक आहे. गेल्या सुमारे पन्नास वर्षात आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संपूर्ण रोगाच्या निदान तसेच उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक पद्धतींमध्ये आता आमूलाग्र बदल झाला आहे,” असेही प्रतिष्ठित मधुमेह तज्ञ आणि वैद्यक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. सिंह म्हणाले.
पुण्यातील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या या समारंभात जैव तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश एस. गोखले आणि एएफएमएसचे महासंचालक लेफ्टनंट जनरल दलजीत सिंग यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांवर आणि घातक कर्करोगासारख्या आजारांवर परिणामकारक अशा जीनोमिक्ससारख्या क्षेत्रांमध्ये नवीन संशोधन सुरू करण्यात या सामंजस्य करारामुळे मदत होईल.
सहकार्यात्मक संशोधन आणि प्रशिक्षणासाठीच्या आंतर-मंत्रालयीन सहकार्यावरील या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी जैव तंत्रज्ञान विभाग आणि एएफएमसी एकत्र आल्याबद्दल डॉ. सिंह यांनी अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले, “सैन्यातील जवानांचे आरोग्य, सुरक्षा आणि कामगिरी सुनिश्चित करण्यात बायोटेक ऍप्लिकेशन्स वैविध्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण आहेत. जैव तंत्रज्ञान विभागाने जैव-वैद्यकीय क्षेत्रात विशेषत: प्रगत निदान, उपचारपद्धती आणि लसींच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आपल्या आरोग्य यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी ते अत्याधुनिक संशोधन करत आहेत."
पुढे डॉ. सिंह म्हणाले, “अमृत काळातील अर्थव्यवस्थेसाठी तसेच भारताला जगातील आघाडीचे राष्ट्र बनवण्यासाठी देखील जैवतंत्रज्ञान ही गुरुकिल्ली ठरेल. जैवतंत्रज्ञान क्षेत्रात गेल्या ९ वर्षात वेगाने वाढ झाली आहे आणि आता भारताचा उल्लेख जगातील अव्वल १२ जैवतंत्रज्ञान देशांमध्ये केला जातो.”