सरकार पाठवणार गुणवंतांना परदेशी !

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 4 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

ॲड. प्रवीण निकम

विद्यार्थ्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी व शैक्षणिक वाट अधिक सुखकर करण्यासाठी शिष्यवृत्ती हा खूप मोठा आधार आहे. हे लक्षात घेता, मागास प्रवर्गासोबत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी देखील शिष्यवृत्ती योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने २०१८ मध्ये घेतला.

 

गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील नामांकित विद्यापीठातील उच्च शिक्षण व त्या आधारित संधी यापासून ते वंचित राहावे लागू नये, यासाठी ही योजना राबविण्यात आली. ही शिष्यवृत्ती नेमकी कोणाला लागू होते आणि याचा शैक्षणिक जीवनात फायदा काय, याविषयी आज आपण जाणून घेऊयात.

 

प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये या शिष्यवृत्ती अंतर्गत शासनामार्फत अर्ज मागविण्यात येतात. यात कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी, अभियांत्रिकी/वास्तुकला शास्त्र आणि औषधनिर्माण शास्त्र या विषयाचा समावेश असतो.

 

या प्रत्येक क्षेत्रातील सदस्यांना सारख्याच नियम व अटी लागू होत असून, प्रतिवर्षी एकूण २० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम घेऊ इच्छिणाऱ्या १० विद्यार्थ्यांसाठी, तसेच पीएचडी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या १० अशा गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

 

पात्रता व निकष

परदेशातील विद्यापीठ / शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्णवेळ विद्यार्थी असावा. त्याने यापूर्वी कोणत्याही राज्य अथवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक भारताचे नागरिक, तसेच महाराष्ट्र राज्याचे आधिवासी असणे अपेक्षित आहे. तर इच्छित असणारे विद्यापीठ हे THE (Times Higher Education) किंवा QS (Quacquarelli Symonds) या पद्धतीच्या मानांकांमध्ये २०० नंबरच्या आत असणे आवश्यक आहे.

 

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांच्या वयाची कमाल ३५ वर्षे आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी ४० वर्षे वयोमर्यादा असावी. पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किमान ६०% गुणासहीत पदवी - पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

 

खुल्या प्रवर्गातून लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे आणि त्यांच्या पालकांचे सर्व प्रकारचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, अशी अट घालण्यात आली आहे. वरील पात्रता व निकषात बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडे उत्पन्नाचा दाखला, पदवी/पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक, दोन भारतीय नागरीकांचे जामीनपत्र, परदेशी शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळाल्याबाबतचे विनाअट (Unconditional) ऑफर लेटर,नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले आरोग्य चांगले असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

 

असा करा अर्ज

  • वरील शिष्यवृत्तीकरिता ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज स्वीकारला जातो.
  • इच्छुक विद्यार्थ्यांनी www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा.
  • अधिकृत संकेतस्थळामार्फत ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत व आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सोबत अर्ज संबंधित विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांच्याकडे मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी सादर करावा.

 

या प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासह भोजन व राहण्याचा खर्च, येण्याजाण्याचा विमान प्रवास देखील शिष्यवृत्ती स्वरूपात मिळतो. यामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींची परदेशी शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी भक्कम आधार होते.

 

सौजन्य: दै सकाळ