पुणे : विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून केंद्र सरकारच्या वतीने शैक्षणिक दूरचित्रवाहिन्या सुरू करण्यात येणार आहे. असे २०० वाहिन्या सुरू करण्यात येणार असून, प्रत्येक राज्याला ४ ते ५ वाहिन्या मिळतील. येत्या काही दिवसांत यावरील प्रसारणाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार यांनी दिली.
चौथ्या जी २० शिक्षण कार्यगटाची आणि शिक्षणमंत्र्यांची बैठक 'पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र' या विषयावर १७ ते २२ जून या कालावधीत पुण्यात होत आहे. या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत कुमार यांनी विविध शैक्षणिक उपक्रमांसोबतच जी २० शिक्षण कार्यगटाची बैठकीबाबत माहिती दिली. यावेळी उच्च शिक्षण विभागाचे सचिव के. संजय मूर्ती, आयसरचे संचालक प्रा. सुनील भागवत आदी उपस्थित होते.
कुमार म्हणाले,"करोनानंतर शिक्षण पद्धतीत अमूलाग्र बदल झाले आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने शिक्षण द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण विनामूल्य मिळण्यासाठी शैक्षणिक चॅनेलची संख्या वाढविण्यात येत आहे." या चॅनेल्सच्या माध्यमातून पहिली ते बारावीपर्यतचा अभ्यासक्रम शिकवण्यात येईल. हे सर्व फ्री टू एअर चॅनेल्स असल्याने, सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल, असे कुमार यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधत, त्यांना मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी साधारण ७२०० समुपदेशकांची नेमणूक करण्यात येणार आहे. देशात साधारण ७२०० ब्लॉक असून, त्या अंतर्गत अनेक शाळा कार्यरत आहेत. त्यामुळे येत्या काळात या शाळांना समुपदेशक मिळणार आहेत, असेही कुमार यांनी स्पष्ट केले.
पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र विषयावर जी २० कार्यगटाची बैठक
-
१७ जून - शैक्षणिक प्रदर्शन ( शैक्षणिक प्रयोग, उपक्रम, तंत्रज्ञान प्रकल्प )
-
१७ आणि १८ जून - दोन दिवसीय पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र या विषयावर परिषद
-
१९ जून - टीचिंग लर्निंग अॅप्रोचेस (सत्र पहिले), पॅरेन्टस् रोल : सोशिओ इमोशनल स्किल्स (सत्र दुसरे)
-
२० जून - हेरिटेज वॉक आणि जी २० मसुद्यावर चर्चा
-
२१ जून - योग दिवस सेलिब्रेशन आणि जी २० शिक्षणावर चर्चा
-
२२ जून - शिक्षणमंत्र्यांची बैठक