संगीत संस्कृती जोडण्याचे माध्यम, कोणाचं मन दुखावण्याचा हेतू नव्हता - ए. आर. रहमान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
संगीतकार ए.आर. रहमान
संगीतकार ए.आर. रहमान

 

मलिक असगर हाशमी

ऑस्कर विजेते आणि 'जय हो' सारख्या अजरामर गीतांचे निर्माते ए. आर. रहमान सध्या सार्वजनिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. नुकत्याच दिलेल्या एका विधानावरून उद्भवलेल्या वादावर त्यांनी आता अतिशय स्पष्ट आणि संवेदनशील शब्दांत आपली बाजू मांडली आहे. रहमान म्हणाले की, "संगीत हे माझ्यासाठी नेहमीच संस्कृतीशी जोडण्याचे, ती साजरी करण्याचे आणि तिचा सन्मान करण्याचे माध्यम राहिले आहे. भारत माझी प्रेरणा आहे, माझा गुरू आहे आणि माझे घर आहे."

त्यांनी पुढे असेही कबूल केले की, कधीकधी शब्दांचा चुकीचा अर्थ लावला जातो. पण संगीताच्या माध्यमातून लोकांना सक्षम बनवणे आणि त्यांची सेवा करणे हाच आपला कायम उद्देश राहिला आहे. कोणालाही दुःख पोहोचवण्याचा आपला कधीच हेतू नव्हता आणि लोक आपल्या प्रामाणिकपणाची दखल घेतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

वादाची ठिणगी कशी पडली?

ए. आर. रहमान यांनी 'बीबीसी'ला दिलेल्या एका मुलाखतीत हिंदी चित्रपटसृष्टीत काम मिळत नसल्याचा अनुभव सांगितला होता. गेल्या आठ वर्षांत त्यांच्या कारकिर्दीत कामाचा एक प्रकारचा दुष्काळ असल्याचे सांगताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता की, सिनेसृष्टीत बदलत्या काळासोबत काही 'अकलात्मक' निर्णय हावी होत आहेत का? अशा निर्णयामुळे सर्जनशीलतेवर परिणाम होत असल्याचे त्यांचे मत होते. मात्र, त्यांच्या या विधानात 'सांस्कृतिक भेदभाव' असा सूर निघत असल्याचे दिसताच वादाला तोंड फुटले.

दिग्गजांकडून टीकेची झोड

रहमान यांच्या विधानानंतर दिग्गज लेखक-गीतकार जावेद अख्तर, गायक शान, अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत आणि स्तंभलेखिका शोभा डे यांनी सवाल उपस्थित केले. शोभा डे यांनी या विधानाला 'धोकादायक' म्हटले आहे. त्यांच्या मते, गेल्या ५० वर्षांत बॉलीवूड नेहमीच सांप्रदायिक भेदाभेदांपासून मुक्त राहिले असून तिथे नेहमीच प्रतिभेचा सन्मान झाला आहे.

गायक शान यांनी देखील सांप्रदायिक अँगल फेटाळून लावला. कलाकाराच्या आयुष्यात चढ-उतार हे नैसर्गिक असतात, असे त्यांचे म्हणणे होते. जावेद अख्तर यांनीही आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत कधीही सिनेसृष्टीत सांप्रदायिकता अनुभवली नसल्याचे सांगितले. उलट, रहमान यांचा दर्जा इतका मोठा आहे की छोटे निर्माते त्यांच्याकडे जाण्यासही घाबरतात, असे त्यांनी नमूद केले.

कंगना रनौतचे गंभीर आरोप

या वादात सर्वात तीखी प्रतिक्रिया कंगना रनौतने दिली. कंगनाने म्हटले की, "मी रहमान यांच्यापेक्षा अधिक पूर्वग्रहदूषित व्यक्ती पाहिलेली नाही." कंगनाचा दावा आहे की, तिने आपल्या 'इमर्जन्सी' चित्रपटाची कथा ऐकवण्यासाठी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु रहमान यांनी कोणत्याही 'प्रोपांडा चित्रपटा'चा भाग व्हायचे नाही, असे सांगून भेटण्यास नकार दिला. 'इमर्जन्सी' हा चित्रपट अनेकांना आवडला असतानाही रहमान यांनी नकारात्मक विचारसरणीमुळे त्यापासून दूर राहणे पसंत केले, असा आरोप तिने केला.

समर्थनाचेही सूर उमटले

या वादात रहमान यांच्या बाजूनेही अनेक जण उभे ठाकले. सोशल मीडियावर त्यांच्या समर्थकांनी जॉन अब्राहमची जुनी मुलाखत शेअर केली, ज्यात त्याने 'द काश्मीर फाईल्स' सारख्या चित्रपटांपासून दूर राहण्याबाबत भाष्य केले होते. राजकीय स्तरावर एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी रहमान यांचे समर्थन करताना सांगितले की, रहमान आज ज्या उंचीवर आहेत ते त्यांच्या परिश्रमाचे फळ आहे. त्यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराने व्यक्त केलेली चिंता हलक्यात घेऊ नये.

चित्रपटसृष्टीतून मिळालेला पाठिंबा

रहमान यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर बॉलीवूडमधून ज्येष्ठ अभिनेते आणि माजी भाजप खासदार परेश रावल त्यांच्या पाठीशी उभे राहिले. रावल म्हणाले की, "ए. आर. रहमान हे देशाचा अभिमान आहेत आणि त्यांच्या कलेने भारताला जागतिक स्तरावर सन्मान मिळवून दिला आहे." रहमान यांच्यासारखा कलाकार कोणत्याही संकुचित विचारांच्या पलीकडे असतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

एकूणच, ए. आर. रहमान यांचे हे प्रकरण केवळ एका विधानापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्यातून भारतीय चित्रपटसृष्टी, कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांविषयीचे मोठे प्रश्न समोर आले आहेत. रहमान यांच्या स्पष्टीकरणामुळे हे सिद्ध झाले की, त्यांचा उद्देश कोणावर आरोप करणे नव्हता, तर आपले अनुभव मांडणे हा होता.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter