छत्रपती संभाजी महाराजांवरील चित्रपटाला संगीत देणे माझ्यासाठी सन्मानच - ए.आर. रहमान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
संगीतकार ए.आर. रहमान
संगीतकार ए.आर. रहमान

 

छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या 'छावा' या चित्रपटावरील एका वक्तव्यामुळे संगीतकार ए.आर. रहमान गेले काही दिवस चर्चेत होते. २०२५ मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या या ऐतिहासिक चित्रपटाच्या वादावर रहमान यांनी प्रथमच मोकळेपणाने भाष्य केले आहे. याचबरोबर रणबीर कपूरच्या आगामी 'रामायण' चित्रपटासाठी संगीत देताना धर्म आड येतो का, यावरही त्यांनी आपले स्पष्ट मत मांडले आहे. माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी या दोन्ही विषयांवर सविस्तर चर्चा केली.

'छावा'ने लोकांमध्ये फूट पाडली? 

छत्रपती संभाजी महाराज आणि मुघल शासक औरंगजेब यांच्यावरील चित्रणामुळे 'छावा' चित्रपटावरून महाराष्ट्रात मोठे वादळ उठले होते. नागपूरसह अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही औरंगजेबाच्या चित्रणावरून जनक्षोभ उसळल्याचे मान्य केले होते. या वादावर बोलताना रहमान यांनी मान्य केले की, चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये मतभेद निर्माण केले.

यावर रहमान म्हणाले, "हा चित्रपट नक्कीच विभाजक होता. चित्रपटातून शौर्य दाखवणे हा या चित्रपटाचा मुख्य उद्देश होता." 

रहमान यांना चित्रपटाशी जोडले जाण्याबद्दल सुरुवातीला मनात शंका होती. याबाबत ते म्हणतात, "मी दिग्दर्शकाला विचारले होते की, या चित्रपटासाठी तुम्हाला माझीच गरज का आहे? त्यावर त्यांनी सांगितले की, आम्हाला फक्त तुम्हीच हवे आहात." 

'छावामध्ये काम करण्याची संधी म्हणजे सन्मानाची बाब'

संभाजी महाराजांच्या शौर्याबद्दल बोलताना ते म्हणाले, "छावा हे सर्वात प्रिय आणि सन्माननीय पात्र आहे. ते प्रत्येक मराठ्याच्या रक्तात आहेत. चित्रपटाच्या शेवटी जेव्हा ती मुलगी सुंदर कविता म्हणते, तो क्षण अत्यंत भावुक करणारा आहे. मराठ्याची स्पंदने आणि आत्मा असणाऱ्या चित्रपटाचे संगीत करण्याची संधी मिळणे म्हणजे सन्मानाची बाब आहे."

चित्रपटांमुळे लोक चुकीच्या पद्धतीने प्रभावित होतात का, या प्रश्नावर रहमान यांनी प्रेक्षकांवर विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, "हा चित्रपट मनोरंजक आहे, पण लोक त्यापेक्षा नक्कीच हुशार आहेत. लोकांकडे स्वतःचा विवेक असतो. त्यांना सत्य काय आणि दिशाभूल काय, हे समजते. मला मानवतेवर आणि लोकांच्या विवेकावर पूर्ण विश्वास आहे. लोक चुकीच्या माहितीला बळी पडण्याइतके मूर्ख नाहीत."

'म्हणून मी रामायणचे संगीत केले...' 

नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित 'रामायण' चित्रपटात ए.आर. रहमान आणि ऑस्कर विजेते संगीतकार हन्स झिमर एकत्र काम करत आहेत. आपण मुस्लिम असूनही हिंदू महाकाव्यावर आधारित चित्रपटाचे संगीत कसे करतो, यावर रहमान यांनी मनमोकळेपणाने उत्तर दिले.

ते म्हणाले, "मी एका ब्राह्मण शाळेत शिकलो आहे. तिथे दरवर्षी आम्हाला रामायण आणि महाभारत शिकवले जायचे, त्यामुळे मला या कथा माहीत आहेत. माझ्यासाठी या कथेचा गाभा महत्त्वाचा आहे. एखादी व्यक्ती किती नीतिमान असू शकते, उच्च आदर्श काय असतात, हे यातून शिकण्यासारखे आहे. लोक यावर वाद घालू शकतात, पण मी त्यातील चांगल्या गोष्टींचे आणि मूल्यांचे आचरण करतो."

धर्माच्या पलीकडे जाऊन कलेची निर्मिती 

या महाकाव्याच्या संगीतासाठी आंतरराष्ट्रीय सहयोगाचे महत्त्व सांगताना रहमान यांनी एक सुंदर विचार मांडला. "हन्स झिमर ज्यू आहेत, मी मुस्लिम आहे आणि रामायण हे हिंदू महाकाव्य आहे. हे त्रिकूट भारताकडून संपूर्ण जगाला प्रेमाचा संदेश देत आहे," असे त्यांनी सांगितले. 

प्रेषितांच्या वचनाचा दाखला देत ते पुढे म्हणाले, "ज्ञान हे अमूल्य असते, मग ते राजाकडून मिळो, भिकाऱ्याकडून मिळो किंवा चांगल्या-वाईट कृतीतून. आपण ज्ञानापासून दूर पळू शकत नाही. आपण संकुचित विचारांच्या आणि स्वार्थाच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा."

कलाकाराच्या जबाबदारीबद्दल बोलताना रहमान यांनी शेवटी सांगितले, "ईश्वराने आम्हा कलाकारांना म्हणूनच शक्ती दिली आहे की, आम्ही आमच्या शब्दांतून, कृतीतून आणि कलेतून वाईटाच्या जागी चांगले रुजवू शकू." वाईट हेतूने बनवलेल्या चित्रपटांपासून आपण लांबच राहतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बॉलीवूडबाबत वक्तव्य...

अनेक चित्रपट निर्माते आणि कलाकारांनी दावा केला आहे की, बॉलीवूडमध्ये तमिळ समुदायाबाबत भेदभावाची वागणूक दिली जाते. पण १९९० च्या दशकात परिस्थिती कशी होती? या प्रश्नावर रहमान म्हणतात, "मला याची कधी जाणीवच झाली नाही किंवा कदाचित माझ्यापासून या गोष्टी लपवून ठेवल्या गेल्या असतील. मला स्वतःला मात्र असा अनुभव कधीच आला नाही."

मात्र ते पुढे म्हणतात, "गेल्या ८ वर्षांत चित्रपटसृष्टीतील सत्तेची गणिते बदलली आहेत. जे लोक सर्जनशील नाहीत, ते आता निर्णय घेत आहेत. यात कदाचित जातीय किंवा धार्मिक कारणेही असतील, पण माझ्या तोंडावर तरी असे कोणी बोलले नाही. हो, काही कुजबूज नक्कीच माझ्या कानावर आली. उदाहरणार्थ एखाद्या चित्रपटासाठी मला बुक केले होते, पण दुसऱ्या एका म्युझिक कंपनीने त्या चित्रपटाला फायनान्स केले आणि स्वतःचे संगीतकार आणले. अशा वेळी मी म्हणतो, ठीक आहे! मी आराम करेन आणि कुटुंबासोबत वेळ घालवेन."

ते पुढे म्हणतात, "मी कामाच्या मागे धावणारा माणूस नाही. उलट कामानेच माझ्याकडे यावे, अशी माझी इच्छा असते. माझ्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणामुळे मला यश मिळावे, असे मला वाटते. गोष्टींच्या मागे धावणे किंवा त्या शोधणे मला अपशकुन वाटते. जे माझ्या हक्काचे आहे, ते ईश्वर मला नक्कीच देईल."


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter