शाहरुखच्या ‘किंग’मध्ये दिसणार अर्शद वारसी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 9 d ago
अर्शद वारसी आणि शाहरुख खान
अर्शद वारसी आणि शाहरुख खान

 

बॉलीवूडचा ‘सर्किट’ आणि ‘असुर’ या दमदार भूमिकांमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अर्शद वारसी पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी कारण आहे शाहरुख खानचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘किंग’. सूत्रांनुसार, या मोठ्या प्रोजेक्टमध्ये अर्शद वारसी एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. निर्मात्यांनी याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी शाहरुख खान, सुहाना खान, दीपिका पादुकोण, अभिषेक बच्चन आणि अभय वर्मा यांच्यासोबत अर्शदच्या नावाने चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सध्या अर्शद ‘जॉली एलएलबी ३’ आणि ‘वेलकम टू द जंगल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. पण ‘किंग’मधील त्याची एन्ट्री ही चाहत्यांसाठी खास सरप्राइझ आहे.
 
 
‘किंग’ हा सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट तसेच मार्फ्लिक्स प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली बनणारा अ‍ॅक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिका साकारणार आहे. तर त्याची मुलगी सुहाना खान या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. दीपिका पादुकोण आणि अभिषेक बच्चन यांच्या महत्त्वाच्या भूमिका असतील. ‘मुंज्या’ फेम अभय वर्मा आणि जयदीप अहलावत यांचाही चित्रपटात समावेश आहे. 

या चित्रपटाची कथा २००० मधील बॉबी देओल आणि राणी मुखर्जी यांच्या ‘बिच्छू’ चित्रपटाशी काही प्रमाणात मिळतीजुळती असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटात अ‍ॅक्शन, रोमांच आणि भावनिक क्षणांचा संगम असेल, असा अंदाज आहे. अर्शद वारसीच्या भूमिकेबाबत अद्याप गुप्तता आहे पण त्याचा विनोदी आणि गंभीर अभिनयाचा मेळ या चित्रपटाला नक्कीच वेगळी उंची देईल.

शाहरुख आणि अर्शद यांची मैत्री बॉलीवूडमध्ये सर्वश्रुत आहे. २००५ मध्ये अर्शदच्या ‘कुछ मीठा हो जाए’ या चित्रपटात शाहरुखने छोटीशी पाहुण्या भूमिका केली होती. तेव्हा शाहरुखचा स्टारडम आकाशाला भिडत होता, तरीही त्याने आपल्या मित्रासाठी ही भूमिका स्वीकारली. आता, जवळपास २० वर्षांनंतर, ‘किंग’मध्ये दोघे पहिल्यांदाच पूर्णवेळ सहकलाकार म्हणून एकत्र दिसणार आहेत.

अर्शदच्या करिअरचा विचार केला, तर ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील सर्किटपासून ते ‘असुर’ वेब सीरिजमधील गंभीर भूमिकेपर्यंत त्याने आपल्या अभिनयाची विविधता सिद्ध केली आहे. त्याच्या सहज अभिनयाने आणि विनोदाच्या टायमिंगने तो नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकतो. ‘किंग’सारख्या मोठ्या चित्रपटात त्याची भूमिका सकारात्मक असो वा नकारात्मक, तो आपल्या अभिनयाने लक्ष वेधून घेईल, यात शंका नाही.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter