आ. श्री. केतकर
चित्रपटांमध्ये आगगाडी आपण अनेकदा पाहतो. काहींना तर ती चित्रपटाची अपरिहार्य बाब वाटते. 'रेल्वे स्टेशन', 'प्लॅटफॉर्म', 'द ट्रेन' 'बर्निंग ट्रेन' या नावाचे चित्रपट बनले. इंग्रजीतही 'द ट्रेन', 'व्हॉन रायन्स एक्स्प्रेस', 'मर्डर ऑन द ओरिएंट एक्स्प्रेस', असे अविस्मरणय चित्रपट आले आहेत. पूर्वी धर्मेंद्रच्या बऱ्याच हिट चित्रपटांत रेल्वेगाडी हमखास दिसायची.
रेल्वेमध्ये चित्रित झालेली आणि रेल्वेसंबंधी गाणीही बरीच आहेत. अशोक कुमार यांनी गायिलेले रेलगाडी रेलगाडी, झुकझुक झुकझुक, बीचवाले स्टेशन बोले रुकरुक,' हे तसेच 'गाडी बुला रही है, सीटीबजा रही है' आणि आशा भोसले यांनी म्हटलेले 'झुकुझुकु झुकुझुकु आगीनगाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी' इत्यादी बरीच गाणी आजही ताजी वाटतात.
सध्याचा हीरो-सुपरस्टार शाहरुख खान याच्या चित्रपटांतही अनेकदा आगगाडी असते. त्यामुळेच इंग्रजीचे प्राध्यापक आणि सिनेरसिक अंकुर कोनार यांनी 'शाहरुख खान अँड द रेल्वे नरेटिव्हज' हे पुस्तक लिहिले असावे. या पुस्तकात शाहरुख खानच्या चित्रपटांचा प्रवास आणि त्यातील दृष्टिकोन आणि विचारसरणी यांचा विचार लेखकाने केला आहे. 'स्वदेस 'पासून 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' पर्यंत, लेखक म्हणतो प्रत्येक भारतीयाच्या मनात रेल्वेची किमान एकतरी आठवण असतेच. त्याचे कारण आगगाडीसारखेच माणसाचे जीवनही असते, हे असावे. त्यात चढउतार असतात, कमी जास्त वेग असतो, वेडीवाकडी वळणेही असतात.
हिंदी चित्रपटांतील रेल्वे आणि तिची भूमिका याबाबत लेखकाने बरेच संशोधन केले आहे. 'वीर झारा'मध्ये तर सीमारेषेवरील स्थानकाचा उपयोग केवळ पार्श्वभूमी म्हणून, वा नायक नायिकेला विरुद्ध दिशांना नेऊन त्यांच्या ताटातुटीसाठी केला आहे. शाहरुख खानच्या निवडलेल्या चित्रपटांत वेगवेगळ्या पिढ्यांना आवडणारी आगगाडीची दृश्ये आहेत आणि जगभरच्या प्रेक्षकांना ती वेगळाच अनुभव देतात.
शाहरुख खान साधारण उदारमतवादी मध्यमगर्वीय नायक असतो आणि त्याच्या चित्रपटांचा प्रेक्षकही साधारण मध्यमवर्गीयच असतो. तो स्वतःलाच नायकाच्या जागी पाहतो. चित्रपटांतील आगगाडी पाहणारे प्रेक्षक असंख्य आहेत. पण ते चित्रपटातील आगगाडीची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न क्वचितच करतात. त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे. त्यामुळे त्यांना रेल्वे डबे, विश्रांतीगृह, फलाटाचे टोक, तसेच रूळ त्यांमधील समांतर अंतर यांचे शाहरुख खानच्या चित्रपटातील स्थान समजेल. पुस्तकात आशिष राजाध्यक्ष, रिबेका हॅरिसन आणि उमर अहमद अशा अभ्यासूंच्या पुस्तकातील काही उद्धरणे आहेत. त्यांमुळे पुस्तकाचे मोल वाढले आहे.
लेखक म्हणतो की, शाहरुखच्या चित्रपटांत आगगाडी हे रूपक असते आणि तिचे मध्यवर्ती अस्तित्व लक्षात येण्याजोगे असते. त्यामुळेच शाहरुखची पडद्यावरील प्रतिमा आणि मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटांतील भावनिक संवाद बनले आहेत. लेखक वाचकांना आठवण करून देतो की, रेल्वे ही केवळ वस्तू नाही, ती वसाहतवादी साम्राज्याचे प्रतीक आहे. फाळणीच्या कटू आठवणी जागवणारी आणि समाजातील वर्गाची जाणीव करून देणारी आहे. आदित्य चोप्रा वा करण जोहर यांनीही त्यांच्या प्रभाव पाडणाऱ्या झगमगाटी कथानकांतही रेल्वेचा वापर केला असला, तरी ती त्यांत केवळ शोभेची वस्तू नाही. तर अनेक बाबींचे प्रतीक बनते.
कोनार विश्लेषण करतात आणि सहज टिप्पणीही. ते म्हणतातः शाहरुख खानच्या चित्रपटांतच नाही, तर प्रत्यक्ष जीवनातही रेल्वेला मोठे स्थान आहे. 'स्वदेस' या चित्रपटामध्ये आगगाडी म्हणजे नुसती गाडी नाही. तर त्यातील नायकाची नैतिक दिशा आहे. 'दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे' मध्ये शेवटच्या प्रसंगात ती केवळ नायिकेला हाताने गाडीत ओढून घेण्यापुरती मर्यादित नाही, तर तेथील फलाटावर घडणाऱ्या प्रसंगात ती परंपरा आणि आधुनिक विचार एकत्र येतात. काही चित्रपटांत ती त्यांचे प्रणयाचे पात्र आहे. तिच्यामुळे त्यांची ताटातूट होते, तसेच मिलनही होते.
म्हणजे 'वीर झारा', 'कल हो ना हो', 'कभी अलविदा ना कहना' 'देवदास' (२०२२), 'जब हॅरी मेट सेजल' आणि 'चेन्नई एक्स्प्रेस', आणि त्याच्या अगदी अलीकडच्या चित्रपटांत म्हणजे 'रईस', 'पठाण', 'जवान' किंवा 'डंकी'मध्ये ती मानसिक वेदना किंवा राजकीय तणाव घेऊन येते. पुस्तकात लहान, संकल्पनात्मक पाच प्रकरणे आहेत. कोनार यांचे लेखन हे सहजसुंदर आणि प्रेक्षकांच्या आठवणी जागवणारे मनोरंजक आहे. काही ठिकाणी वाक्प्रचारांची पुनरावृत्ती झाली आहे, तशा मजकुरात काही चुकाही आहेत. तरीही त्यामुळे वाचनाला बाघ न येता हे खिळवून ठेवणारे पुस्तक आहे.
(पुस्तक : शाहरुख खान अँड द रेल्वे नरेटिव्हज, लेखक : अंकुर कोनार)