बांगलादेशी मुस्लिमांना ‘जमात-ए-इस्लामी’ला का नाकारले?

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 d ago
मतदान केल्यानंतर जमात-ए-इस्लामीचे नेते शफीकुर रहमान (मध्यभागी) माध्यमांना संबोधित करताना.
मतदान केल्यानंतर जमात-ए-इस्लामीचे नेते शफीकुर रहमान (मध्यभागी) माध्यमांना संबोधित करताना.

 

डॉ. नौशाद आलम चिश्ती अलीग

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (BNP) नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील विजयामुळे जमात-ए-इस्लामी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. या निवडणुकीत ७० जागा जिंकून जमात-ए-इस्लामी दुसरी सर्वात मोठी राजकीय शक्ती म्हणून समोर आली खरी, पण आपल्या या संख्याबळाचे रूपांतर खऱ्या राजकीय यशात करण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत.

हा विरोधाभास काही योगायोगाने घडलेला नाही, किंवा तो केवळ आजच्या निवडणुकीपुरता मर्यादित नाही. याची पाळेमुळं पक्षाच्या ऐतिहासिक चुकांमध्ये, विचारसरणीतील ताठरतेमध्ये आणि दक्षिण आशियाई मुस्लिमांच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी काळात त्यांनी बजावलेल्या वादग्रस्त भूमिकेत खोलवर रुजलेली आहेत.

बांगलादेशात कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी जमात-ए-इस्लामीला आजही का संघर्ष करावा लागतोय, हे समजून घेण्यासाठी त्यांच्या उगमाकडे, राजकीय वर्तणुकीकडे आणि हिंसाचाराच्या त्या काळ्या इतिहासाकडे पुन्हा वळून पाहावं लागेल, ज्याचा प्रभाव आजही लोकांच्या मनावर कायम आहे.

मौलाना मौदुदी यांनी स्थापन केलेली जमात-ए-इस्लामी आज भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात मौलाना मौदुदी यांनी आपली भूमिका सर्वांपासून वेगळी ठेवली होती. त्यांनी ना काँग्रेसला पाठिंबा दिला, ना मुस्लिम लीगला. त्यांच्या मते, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे हे दोन्ही पक्ष दिशाहीन होते. इस्लामिक दृष्टीकोनातून ते या पक्षांना 'सैतानी शक्तींचे' माध्यम मानत असत.

मात्र, पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर, मौलाना मौदुदी आपली संपूर्ण राजकीय यंत्रणा घेऊन तिथे गेले. जमात-ए-इस्लामीच्या कट्टर राजकीय इस्लामचा अजेंडा तिथे राबवणे, हा त्यामागचा उद्देश होता. काळाच्या ओघात, इस्लाम लागू करण्याच्या नावाखाली पाकिस्तानमधील जमात-ए-इस्लामीने हातात शस्त्र घ्यायलाही मागेपुढे पाहिले नाही.

पाकिस्तानमधील जमात-ए-इस्लामी ही जहालमतवादाचा मोठा इतिहास असलेली एक हिंसक संघटना आहे. त्यांची विद्यार्थी शाखा असलेल्या 'इस्लामी जमियत-ए-तलब'ने एकेकाळी पाकिस्तानमधील महाविद्यालये आणि विद्यापीठांना कटकारस्थाने, गुंडगिरी आणि रक्तपाताचे अड्डे बनवले होते.

विद्यार्थी निवडणुकांमध्ये बूथ बळकावणे, प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अपहरण करणे, हत्या करणे आणि आपली इस्लामची आवृत्ती लागू करण्याच्या नावाखाली हिंसक धमक्या देणे, हीच त्यांची 'उपलब्धी' बनली होती. पंजाब युनिव्हर्सिटी लाहोर, मुल्तानमधील बहाउद्दीन झकारिया युनिव्हर्सिटी, सिंध आणि कराची युनिव्हर्सिटीसारख्या संस्था एकेकाळी त्यांच्या हिंसाचाराची भयानक केंद्रे बनल्या होत्या.

जेव्हा पूर्व पाकिस्तानमधील (आजचा बांगलादेश) बंगाली मुस्लिम जनता पश्चिम पाकिस्तानच्या नेत्यांच्या, नोकरशहांच्या आणि लष्कराच्या चुकीच्या धोरणांना कंटाळली होती, तेव्हा त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्या गोंधळाच्या काळात अनेकांनी स्वार्थासाठी पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला.

त्या कठीण काळात, बांगलादेशातील जमात-ए-इस्लामीने पश्चिम पाकिस्तानच्या अन्यायाविरुद्ध बंगाली मुस्लिमांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे होते. पण त्याऐवजी, त्यांनी पाकिस्तानी लष्कराची बाजू घेतली आणि स्वतःच्याच बंगाली मुस्लिम बांधवांच्या कत्तलीत सहभागी झाले. त्यानंतर, पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या उर्दू भाषिक लोकांनाही बंगालींकडून लक्ष्य केले गेले आणि त्यात अनेकांचे बळी गेले.

जर पश्चिम पाकिस्तानने बंगालींशी संवाद आणि परस्पर सामंजस्याचा मार्ग निवडला असता, आणि फाळणी जर शांततेने झाली असती, तर कोणत्याही बाह्य शक्तीला परिस्थितीचा फायदा घेता आला नसता. लाखो निष्पाप मुस्लिम स्त्री-पुरुषांचे प्राण वाचले असते. आपल्या प्रदेशात जमात-ए-इस्लामीने ऐतिहासिकदृष्ट्या कोणती भूमिका बजावली आहे, याची बंगाली मुस्लिमांना पूर्ण जाणीव आहे.

शिवाय, जमात-ए-इस्लामी ज्या राजकीय विचारसरणीचा पुरस्कार करते आणि इस्लामचे जे स्वरूप लादण्याचा प्रयत्न करते, ते दक्षिण आशियात कुठेही लागू करणे शक्य नाही. जोपर्यंत ही संघटना तळागाळातून स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करत नाही, तोपर्यंत ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही.

भारतात, जमात-ए-इस्लामीकडे ना राजकारणात टिकून राहण्याची क्षमता आहे, ना यशाची कोणतीही शक्यता. अफगाणिस्तानमध्ये ते आधीच अपयशी ठरले आहेत. पाकिस्तानमधील जमात-ए-इस्लामीची धोरणे काय आहेत, हे जगाला चांगलेच ठाऊक आहे. तसेच, बांगलादेशात या संघटनेने भूतकाळात काय केले, हे बंगाली मुस्लिम कधीही विसरू शकत नाहीत.

(लेखक अलिगढस्थित अभ्यासक आणि इस्लामिक विषयांचे तज्ज्ञ आहेत.)


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter