भारताची इराणकडून तेल खरेदी पुन्हा सुरू; दोन महाकाय जहाजे भारतीय बंदरांवर दाखल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अमेरिकेने गेल्या महिन्यात दिलेल्या तात्पुरत्या सवलतीचा फायदा घेत भारतीय तेल कंपन्यांनी इराणकडून तेल खरेदी पुन्हा सुरू केली आहे. एलएसईजी (LSEG) कडील जहाजांच्या मागोवा घेणाऱ्या आकडेवारीनुसार, इराणच्या कच्च्या तेलाने भरलेली दोन महाकाय जहाजे (VLCC) भारतीय बंदरांवर पोहोचली आहेत. गेल्या सात वर्षांत प्रथमच भारताने तेहरानकडून ही खरेदी केली आहे. अमेरिकेने दिलेली ही सध्याची सवलत १९ एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे.

आकडेवारीनुसार, इराणचा ध्वज असलेले फेलिसिटी हे जहाज पश्चिम भारतातील सिक्का बंदरावर पोहोचले आहे. तर कुराकाओचा ध्वज असलेले जया हे जहाज ओडिशामधील पूर्व बंदरावर दाखल झाले आहे. एका महाकाय कच्च्या तेलवाहू जहाजाची (VLCC) क्षमता २० लाख बॅरल तेल वाहून नेण्याची असते.

जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार आणि ग्राहक असलेल्या भारताने मे २०१९ पासून इराणकडून तेल घेणे बंद केले होते. अमेरिकेच्या दबावामुळे भारताला ही खरेदी थांबवावी लागली होती.

देशातील सर्वात मोठी रिफायनर असलेल्या 'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन'ने जया या जहाजावरून इराणचे तेल खरेदी केले आहे. विशेष म्हणजे हे जहाज अमेरिकेच्या निर्बंधांखाली आहे, असे वृत्त गेल्या आठवड्यात रॉयटर्सने दिले होते.

भारताने जगातील सर्वात मोठ्या रिफायनिंग कॉम्प्लेक्सचे संचालन करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडलाही इराणकडून तेल खरेदीची परवानगी दिली आहे. रिलायन्सने कोमोरोसचा ध्वज असलेले अफ्रामॅक्स काविझ, कुराकाओचा ध्वज असलेले लेनोर आणि इराणचा ध्वज असलेली फेलिसिटी व हेडी या जहाजांवरून तेल मागवले आहे. ही सर्व जहाजे २० वर्षांहून अधिक जुनी असून ती अमेरिकेच्या निर्बंधांखाली आहेत.