भक्ती चाळक
बांगलादेशमधील मैमनसिंह जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास एका हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर त्याचा मृतदेह महामार्गावर टाकून पेटवून देण्यात आला. दीपू चंद्र दास असे २५ वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना ताजी असतानाच ७ दिवसांनंतर जमावाच्या हल्ल्यात अजून एका हिंदू तरुणाचा जीव गेला आहे. राजबारी जिल्ह्यातील पांगशा परिसरात २९ वर्षीय अमृत मंडल या तरुणाला जमावाने मारहाण करून ठार केले. ही घटना कालीमोहोर युनियनमधील होसेनडांगा गावात घडली.
या अमानवीय घटनांमुळे जगभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. भारत सरकारनेही या घटनांविरोधात राजनैतिक प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय मुस्लिमांनी या घटनेचा तीव्र निषेध करून त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अन्यायविरोधात महाराष्ट्रातील मुस्लीम विचारवंतांनी 'आवाज-द-व्हॉईस मराठी'ला प्रतिक्रिया दिली आहे.
सद्भाव मंच जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक इब्राहीम खान यांनी 'आवाज-द-व्हॉईस मराठी'ला प्रतिक्रिया देताना म्हटले की, "बांगलादेशमध्ये ज्या दोन हिंदू तरुणांची हत्या झाली आहे, त्याचा एक मुस्लिम म्हणून मी तीव्र शब्दात निषेध करतो. मुस्लिमबहुल देश असल्यामुळे तिथल्या मुस्लिमांची अधिक जबाबदारी आहे की इस्लामचं खरं चित्र जगासमोर यावं."
ते पुढे म्हणतात की, "इस्लाममध्ये धार्मिकदृष्ट्या अल्पसंख्याकांच्या हक्कांचे मोठं रक्षण करण्यात आलं आहे. इस्लामिक राज्यात पण हे केले जायचे, याची आपल्याकडे शेकडो उदाहरणे सापडतात. त्यामुळे बांगलादेशमध्ये जे झालंय त्याचं कदापि धार्मिक अंगाने समर्थन होऊ शकत नाही. बांगलादेशने यापुढे अशा घटना होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. त्यांनी इस्लामी पद्धतीने अल्पसंख्यांकांचे रक्षण नेमकं कसं केलं जातं, याचे एक उदाहरण जगासमोर पेश करावे. दोषींना शिक्षा करावी आणि जे तरुण मारले गेले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी आणि यापुढे अशा घटना होणार नाहीत, याची काळजी घ्यावी."
हडपसरच्या गुलशने गरीब नवाज मशिदचे खतीब इमाम मौलाना मोहम्मद तौफिक अशरफी यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, "बांगलादेशमध्ये नुकत्याच मॉब लिंचिंगच्या काही घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये हिंदू समाजातील दोन निरपराध तरुणांची जमावाकडून हत्या करण्यात आल्याची आणि दोन लोकांचा बळी गेल्याची ही दुर्दैवी घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. एका मशिदीचा इमाम या नात्याने मी या घटनेचा तीव्र शब्दांत विरोध आणि निषेध करतो. कारण जे काही घडले आहे, ते इस्लामची शिकवण आणि कुराणच्या शिकवणीच्या पूर्णपणे विरोधात आहे."
ते पुढे म्हणाले की, "एखाद्या मुस्लिमाला किंवा मुस्लिम समाजाला अशा कोणत्याही निरपराध आणि अल्पसंख्याक किंवा कमी लोकसंख्या असलेल्या बिगर-मुस्लिम व्यक्तीची अशा प्रकारे जमावाकडून हत्या करणे किंवा त्यांच्यावर अशा प्रकारे अत्याचार करण्याची इस्लाममध्ये अजिबात परवानगी नाही. मी अत्यंत मनापासून खेद व्यक्त करत याचा निषेध करतो. तसेच माझी अशी इच्छा आहे की, आपल्या भारत देशाने यावर काहीतरी कारवाई करावी आणि राजकीय पातळीवरून हे रोखण्याचा प्रयत्न केला जावा. मी त्या घटनेचा पुन्हा एकदा तीव्र विरोध आणि निषेध करतो."
छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव काझी हैदर यांचे १३वे वंशज काझी सोहेल शेख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, "एखादा मुस्लिम असे कृत्य करतो, तेव्हा लाजेने मान खाली जाते. इस्लाम माणुसकी, शांतता आणि बंधुभावाचा संदेश देतो. बांगलादेशमध्ये घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. धर्म कोणताही असो, सर्वात आधी माणुसकी असते. कोणताही धर्म कोणालाही मारण्याची किंवा हिंसा करण्याची शिकवण देत नाही. जिथे कुठे अशा घटना घडत असतील, तिथे हिंसा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे."
अमन-ओ-इत्तेहाद ट्रस्टचे सेक्रेटरी आणि प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंड्सचे संस्थापक अध्यक्ष दिलावर शेख म्हणाले की, "भारताचा शेजारील देश बांग्लादेश बऱ्याच काळापासून अशांत आहे. बांगलादेशच्या निर्मितीत भारताचे मोठे योगदान आहे, पण गेल्या काही काळापासून बांगलादेश भारताचे उपकार विसरल्याचे दिसत आहे. मध्यंतरीच्या काळात बांगलादेशमधील हिंदूंच्या घरांवर हल्ले होत होते. आता त्याची तीव्रता अजून वाढली आहे. बांगलादेश मुस्लिम बहुल देश असल्यामुळे इस्लामचे प्रतिनिधित्व करण्याची तिथल्या मुस्लिमांची जबाबदारी आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, या घटना इस्लामला कदापि मान्य नाहीत."
ते पुढे म्हणतात की, "अल्पसंख्याकांच्या हक्कांचे इस्लाम समर्थन करते. प्रेषितांच्या काळातच 'मिसाक-ए-मदिना' हे याचे सर्वात उत्तम उदाहरण आहे की, अल्पसंख्याकांचे रक्षण कसे केले जावे. प्रेषितांनी याचे आपल्याला उदाहरण घालून दिले आहे. बांगलादेशमधील मुस्लिम, बांगलादेशमधील मुस्लिम राजवट आणि राज्यकर्ते हे विसरल्याचे दिसत आहेत. त्यामुळे बांगलादेशच्या हंगामी सरकारने लवकरात लवकर यावर कारवाई करावी, गुन्हेगारांना शिक्षा करावी आणि पीडित कुटुंबीयांना दिलासा द्यावा. तसेच त्यांचे पुढील आयुष्य सुखकर कसे होईल हे बघावे आणि यापुढे अशा घटना होणार नाहीत, याची काळजी घ्यावी आणि प्रतिबंध लावावा."
इलाही फाऊंडेशनचे पैगंबर शेख यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, "बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक समाजाविरोधातील या गोष्टी पूर्णपणे निषेधार्ह आहेत. त्याचा कितीही तीव्र शब्दांमध्ये निषेध केला तरीही कमीच आहे. बांग्लादेश हे एक मुस्लिमबहुल राष्ट्र असताना जगभरामध्ये एका मुस्लिमबहुल राष्ट्राचं काय चित्र तेथील नागरिक निर्माण करू पाहतायत आणि काय स्वतःला ते रिप्रेझेंट करू पाहतायत, याचा विचार खरंतर त्यांनी केला पाहिजे. बांगलादेशमधील हिंदूंसोबत भारतातील मुस्लिम समाज पूर्णपणे पाठीशी त्यांच्या उभा आहे. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचं कुठल्याही परिस्थितीमध्ये कधीही समर्थन होऊ शकत नाही. त्याचा निषेधच केला पाहिजे. मानवतेच्या अंगाने या गोष्टी पाहून त्याचा निषेध केला गेला पाहिजे. "
ते पुढे म्हणाले की, "राजकारणाचा भाग म्हणून या सगळ्या गोष्टी बांगलादेशमध्ये घडत आहेत. मात्र त्याचा किती विपरीत परिणाम आजूबाजूच्या देशांवर आणि जगभरातील इतर राष्ट्रांवर पडतोय, याचा विचार खरंतर बांगलादेशने करणं खूप जास्त गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर हे मुद्दे घेऊन ही प्रकरणे थांबवले गेले पाहिजेत. बांगलादेशवर दबाव आणला पाहिजे. कुठल्याही देशामध्ये एक माणूस मारला जाऊ दे किंवा हजारो माणसं मारली जाऊ दे धर्माच्या नावावर, ते थांबवलं गेलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये भारतीय मुस्लिमांचा या सगळ्या निषेधाच्या आवाजामध्ये एक मोठा निषेधाचा आवाज आहे."
मिस फरहा चैरिटेबल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. फरहा शेख म्हणाल्या की, "बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांत घडलेल्या अमानुष घटनांनी आमचे मन सुन्न झाले आहे. हिंदू समाजातील निरपराध नागरिकांवर झालेल्या कथित मॉब लिंचिंगच्या घटना आणि दोन तरुणांची निर्घृण हत्या या केवळ बातम्या नाहीत, तर मानवतेवर झालेले थेट हल्ले आहेत. हे पाहून वेदना होतात, राग येतो आणि अंतःकरणातून निषेध उमटतो. या पार्श्वभूमीवर मी अतिशय स्पष्ट शब्दांत सांगते आम्ही भारतीय मुस्लीम आहोत आणि आम्ही अशा कोणत्याही हिंसेला कधीही पाठिंबा दिलेला नाही आणि देणारही नाही. धर्माच्या नावाखाली रक्त सांडणे हा अपराध आहे. इस्लाम याला मान्यता देत नाही. इस्लाम माणसाला माणूस म्हणून पाहतो त्याचा धर्म, जात, ओळख काहीही असो."
त्या पुढे म्हणाल्या की, “हिंदू समाजावर झालेले हल्ले पाहून आमचे हृदय तुटले आहे. आम्ही पीडित कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहोत. इस्लाम निर्दोषांचे प्राण वाचवण्याची शिकवण देतो; हिंसा नव्हे. धर्माच्या नावाने दहशत माजवणारे इस्लामचे प्रतिनिधी असूच शकत नाहीत. आम्ही, भारतीय मुस्लीम म्हणून, या घटनांचा तीव्र निषेध करतो.”
सामाजिक कार्यकर्ते अन्वर शेख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “भारताची ओळख ही सहअस्तित्वाची आहे. येथे मुस्लीम, हिंदू, शीख, ख्रिश्चन सर्वांनी एकत्र राहून देश उभा केला आहे. म्हणूनच आम्ही स्पष्ट सांगतो हिंदू बांधवांवर होणारी हिंसा आम्हाला मान्य नाही. आज शांत राहणे म्हणजे अन्यायाला साथ देणे. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे.”
ते पुढे म्हणाले की, "आमची मागणी ठाम आहे बांगलादेश सरकारने या घटनांची तात्काळ, निष्पक्ष चौकशी करावी; दोषींवर कठोर कारवाई करावी; आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस, प्रभावी उपाय करावेत.आमचे आवाहनही तितकेच प्रामाणिक आहे दोष थांबवा, मानवता जपा. धर्म माणसाला तोडण्यासाठी नसतो; माणसाला जोडण्यासाठी असतो.आम्ही भारतीय मुस्लीम आहोत आणि आम्ही हिंसेच्या विरोधात, मानवतेच्या बाजूने ठाम उभे आहोत."
एकंदरीत पाहता बांगलादेशातील या अमानवीय घटनांमुळे भारतीय मुस्लीम समाजात तीव्र संताप आणि अस्वस्थता आहे. इस्लाम हा शांती, मानवता आणि बंधुभावाचा संदेश देणारा धर्म आहे. त्यात निरपराध लोकांच्या हत्येला किंवा हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही, ही भावना सर्वच विचारवंतांनी एकमुखाने व्यक्त केली आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या रक्षणाची जबाबदारी ही तेथील बहुसंख्य मुस्लीम समाजाची आणि सरकारची आहे, याची आठवण करून देत भारतीय मुस्लिमांनी पीडित हिंदू कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
धर्माच्या नावाखाली होणारा हिंसाचार हा केवळ मानवतेवरील हल्ला नसून तो इस्लामच्या शिकवणीच्या विरोधात आहे, हे या प्रतिक्रियांतून अधोरेखित होते. बांगलादेश सरकारने या घटनांची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, हीच मागणी या सर्वांनी केली आहे.