मुझफ्फरनगरमध्ये हजारो हिंदू-मुस्लिम महिलांनी एकत्र येत गायले राष्ट्रगीत!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
'पुरकाजी महिला दिवस-३' या कार्यक्रमात सहभागी महिला
'पुरकाजी महिला दिवस-३' या कार्यक्रमात सहभागी महिला

 

मुझफ्फरनगरमधील पुरकाजी शहरात सामाजिक एकता, नारीशक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा एक अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. या उपक्रमाने परिसरात सलोख्याचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. 'मिशन महिला शक्ती' अंतर्गत आयोजित 'पुरकाजी महिला दिवस-३' या कार्यक्रमात सर्वधर्मीय हजारो महिलांनी एकाच व्यासपीठावर एकत्र येत आपल्या एकजुटीचे दर्शन घडवले. पुरकाजी-खैखेरी रोडवरील सैनी फार्म हाऊसमध्ये हा भव्य सोहळा पार पडला. नगर पंचायत अध्यक्ष आणि भारतीय किसान युनियनचे प्रदेश सरचिटणीस जहीर फारुकी यांनी या कार्यक्रमाचे नेतृत्व केले.

या सोहळ्याची भव्यता आणि महिलांची गर्दी इतकी मोठी होती की आयोजकांनी केलेली आसनव्यवस्था अपुरी पडली. खुर्च्या कमी असूनही महिलांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विविध समुदायातील महिलांचा सामूहिक सहभाग. कार्यक्रमाच्या शेवटी हजारो महिलांनी एका स्वरात राष्ट्रगीत गायले आणि 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या. यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. पुरकाजीच्या विकासकामात आणि देशाच्या सन्मानासाठी सर्व समाजातील महिला खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत, याचीच प्रचिती या दृश्यातून आली. यावेळी महिलांनी देशाच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आणि आपल्या मुलांना चांगले शिक्षण अन् नैतिक संस्कार देण्याची शपथ घेतली.
 

उपस्थित महिलांना संबोधित करताना जहीर फारुकी म्हणाले की, "सशक्त समाजाच्या निर्मितीत महिलांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. आई हीच मुलाची पहिली गुरु असते. पुरकाजीतील मुले आयएएस, आयपीएस आणि न्यायाधीश यांसारख्या उच्च पदांवर विराजमान व्हावीत हे माझे स्वप्न आहे. यासाठी नगर पंचायत सर्वतोपरी मदत आणि संसाधने उपलब्ध करून देण्यास वचनबद्ध आहे." पुरकाजी शहराला एक मॉडेल टाऊन म्हणून विकसित करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी बोलताना बोलून दाखवला.

या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्त्या यशिका चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती. एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी घराबाहेर पडणे हा त्यांच्यातील जागरूकता आणि देशप्रेमाचा पुरावा असल्याचे त्यांनी सांगितले. बिजनौर लोकसभा क्षेत्रातील पुरकाजीच्या महिलांच्या या जिद्दीला त्यांनी सलाम केला आणि महिलांच्या हक्कांच्या लढाईत त्या नेहमीच सोबत राहतील, असे आश्वासन दिले. अध्यक्ष जहीर फारुकी यांनी राबवलेल्या सामाजिक आणि विकासकामांचेही त्यांनी यावेळी कौतुक केले.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter