रमजानच्या पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम्सच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस महासंचालक आणि सहआयुक्तांची भेट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम्सच्या शिष्टमंडळासोबत मुंबईचे जॉइंट सीपी सत्यनारायण चौधरी
फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम्सच्या शिष्टमंडळासोबत मुंबईचे जॉइंट सीपी सत्यनारायण चौधरी

 

ओवैस सिद्दीकी, मुंबई

येत्या काही दिवसांत रमजानचा पवित्र महिना सुरू होत आहे. या काळात कोणताही वाद निर्माण होऊ नये आणि विशेषतः मुस्लिमबहुल भागात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, या उद्देशाने मुंबईतील काही मुस्लिम संघटनांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (DGP) सदानंद दाते आणि मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण यांची भेट घेतली.

या शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून विनंती केली की, रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम भागात पोलीस बंदोबस्त आणि नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवणार नाही.

शिष्टमंडळात उपस्थित असलेल्या 'मुंबई अमन कमिटी'चे अध्यक्ष फरीद शेख यांनी सांगितले की, "डीजीपी सदानंद दाते यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की, रमजान महिन्यात पोलिसांकडून सर्व मुस्लिम भागात चोख बंदोबस्त ठेवला जाईल." तसेच, डीजीपींनी मुस्लिम समाजालाही पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

शिष्टमंडळाचे दुसरे सदस्य आणि 'जमात-ए- इस्लामी हिंद महाराष्ट्र'चे उपाध्यक्ष हसीब भाटकर म्हणाले, "या भेटीद्वारे आम्ही मुंबईतील मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की त्यांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे. तसेच हा महिना संयम आणि उपासनेत घालवावा, जेणेकरून इस्लामचा शांततेचा संदेश सर्वदूर पोहोचेल." हे शिष्टमंडळ 'फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम्स'च्या नेतृत्वाखाली गेले होते, ज्यामध्ये अनेक प्रमुख मुस्लिम संघटना, उलेमा आणि इस्लामिक विद्वानांचा समावेश होता.

मुंबईतील शिया विद्वान मौलाना आगा रुहे जफर यांनीही आवाहन केले की, "रमजान हा अल्लाच्या जवळ जाण्याचा महिना आहे. ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी चांगली कामे केली जातात, ज्यामुळे इतरांना त्रास होईल अशी कामे करू नयेत. आपल्यामुळे इतर धर्मीय बांधवांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी."

या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने प्रशासनाकडे काही प्रमुख मागण्या केल्या. यामध्ये मुस्लिमबहुल भागातील वाहतूक नियंत्रण, सेहरी आणि इफ्तारच्या वेळी अजानसाठी लाउडस्पीकरचा नियमित वापर, तसेच रात्रीच्या वेळी खाद्यपदार्थांची दुकाने आणि स्टॉल्सचे व्यवस्थापन यांचा समावेश आहे.

'असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स महाराष्ट्र'चे सरचिटणीस शाकीर शेख यांनी सांगितले की, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. "पोलीस प्रशासनाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही रमजानमध्ये सर्व व्यवस्था केली जाईल. आमच्यासाठी सर्व धर्मांचे सण आणि उत्सव समान आहेत," असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter