समांतर आणि आशयप्रधान चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीला वेगळी ओळख दिली आहे; मात्र अशा सिनेमांना योग्य व्यासपीठ आणि पुरेसा कालावधी मिळतो का, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने अलीकडेच समांतर सिनेमांबाबत आपली भूमिका मांडताना या वास्तवाकडे लक्ष वेधले आहे.
नवाजुद्दीन म्हणाला, "चित्रपट फक्त मार्केटिंगवर अवलंबून असू नये. चांगल्या आशयाला प्रेक्षक मिळण्यासाठी प्रचाराची गरज नसते. पायल कपाडिया यांचा 'ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट' हा चित्रपट कान्ससारख्या प्रतिष्ठित महोत्सवात गौरवला गेला; पण भारतात प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत तो चित्रपटगृहांतून हटवण्यात आला. हे वास्तव खूप काही सांगून जातं."
नवाजुद्दीनच्या मते, प्रेक्षकांना दर्जेदार आशयाची जाण असते आणि चांगला चित्रपट आपोआपच आपले स्थान निर्माण करतो.