डावीकडून दाक्षिणात्य गायिका चिन्मयी श्रीपादा आणि संगीतकार ए.आर. रहमान
प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांनी एका मुलाखतीदरम्यान 'वंदे मातरम्' गाण्यास नकार दिल्याच्या चर्चेला सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल करून काही लोक रहमान यांच्यावर टीका करत आहेत. आता या वादात प्रसिद्ध दाक्षिणात्य गायिका चिन्मयी श्रीपदा यांनी उडी घेतली असून त्यांनी रहमान यांची भक्कम पाठराखण केली आहे. त्यांनी या सर्व दाव्यांचे जोरदार खंडन केले आणि याला निव्वळ अपप्रचार असल्याचे म्हटले आहे.
एका जुन्या मुलाखतीचा काही भाग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रहमान यांनी गाण्यास नकार दिल्याचे दाखवून काही युजर्स संताप व्यक्त करत आहेत. मात्र, चिन्मयी श्रीपदा यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले.
चिन्मयी यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, ए.आर. रहमान यांनीच भारताला 'वंदे मातरम्'चे आतापर्यंतचे सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित गाणे दिले आहे. त्यांचे 'माँ तुझे सलाम' हे गाणे आजही प्रत्येकाच्या मनात घर करून आहे आणि अंगावर शहारे आणते. असे असताना त्यांच्यावर गाण्यास नकार दिल्याचे आरोप करणे पूर्णपणे हास्यास्पद आहे.
हा व्हायरल व्हिडिओ संदर्भाशिवाय आणि जाणीवपूर्वक एडीट करून पसरवला जात असल्याचे चिन्मयी यांनी निदर्शनास आणून दिले. द्वेष पसरवण्याच्या हेतूनेच अशा क्लिप्स व्हायरल केल्या जात आहेत. रहमान यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांत 'वंदे मातरम्' पूर्ण आदराने गायले आहे. त्यामुळे अशा खोट्या बातम्यांवर आणि अपप्रचारावर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन चिन्मयी यांनी केले आहे.