अजरामर गझलकार पंकज उधास

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 1 Months ago
गझलकार पंकज उधास
गझलकार पंकज उधास

 

ऐंशीच्या दशकामध्ये जेव्हा हिंदी सिनेमाच्या दुनियेत मारधाड, मारधाड, अॅक्शन पॅक सिनेमांची चलती होती आणि चित्रपट संगीताची जादू हरवत चालली होती, मेलडी कमी होत होती, त्या वेळेला नॉनफिल्मी म्युझिकची एक मोठी लाट भारतामध्ये आली होती. ज्यामध्ये गझल होती, भजन होते, कव्वाली होती. यातून अनेक नवीन गायक कलाकार या क्षेत्रामध्ये आले होते. त्यात प्रामुख्याने अनुप जलोटा, पंकज उधास, तलत अजीज, जगजीत चित्रा सिंग, पीनाज मसानी ही मंडळी अग्रेसर होती. आज यातील ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले आणि तो सगळा काळ डोळ्यापुढे उभा राहिला.
 
पंकज उधास यांनी चित्रपटासाठी तुलनेने तसे कमीच गायन केले; पण त्यांच्या एकाच गाण्याने त्यांचे नाव अजरामर झाले. हे गाणे पुढे त्यांचे सिग्नेचर साँग बनले. ते गाणे होते 'चिठ्ठी आई है...' महेश भट दिग्दर्शित 'नाम' या १९८६ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील. गीतकार आनंद बक्षी यांचे अतिशय उत्कट असे भावस्पशीं शब्द होते. या गाण्याच्या खूप आठवणी आहेत. गाण्याचे मेकिंग खूप इंटरेस्टिंग होते.

पंकज उधास यांनीच एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला होता. एकदा जयपूरहून पंकज उधास मुंबईला विमानाने येत होते. त्याच विमानात शोमन राज कपूरदेखील होते. राज कपूर यांना बघितल्यानंतर पंकज उधास लगेच त्यांच्या जवळ गेले. त्यांना नमस्कार केला. राजकपूर यांनी पंकज उधास यांना मिठीच मारली. म्हणाले, 'पंकज उधास तो अमर हो गया!' पंकज उधास यांना काहीच कळेना. ते म्हणाले, 'मै कुछ समझा नही.' त्यावर राज कपूर म्हणाले, 'चिठ्ठी आई है!' पंकज यांना आश्चर्य वाटले. कारण 'नाम' हा चित्रपट तेव्हा प्रदर्शित व्हायचा होता. मग राज कपूर यांना कसे कळाले? त्यावर राज कपूर यांनीच त्यांना जवळ बसवून, तो संपूर्ण किस्सा सांगितला.
 
अभिनेते राजेंद्र कुमार 'नाम' या चित्रपटाचे निर्मात होते. हे गाणे चित्रपटात पंकज उधास यांच्यावरच चित्रित झाले होते. राजेंद्र कुमार यांनी आपल्या घरातील मिनी थिएटरमध्ये आपल्या खास मित्रांना हे गाणे दाखवले होते. हे गाणे ऐकल्यानंतर राज कपूर अक्षरशः रडले होते. राज कपूर संगीतातील मोठे जाणकार आणि संवेदनशील कलाकार होते. त्यांची दाद खूप महत्त्वाची होती. ते राजेंद्र कुमार यांना म्हणाले, 'ऐसा गाना पिछले कई सालो में मैंने पहली बार सुना है.' या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा किस्सादेखील जबरदस्त होता.

संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी रेकॉर्डिंगच्या वेळेला दोन-तीन टेकनंतर थोडासा विचार बदलून रेकॉर्डिंग स्टुडिओच्या मध्यभागी पाच-सहा टेबल टाकून त्याच्यावर एक चादर टाकली. त्यावर एक हार्मोनियम ठेवला आणि पंकज उधास यांना त्यावर बसवले आणि सभोवताली सत्तर-ऐंशी वादकांना ठेवून या गाण्याचे रेकॉर्डिंग केले. नंतर एका टेकमध्ये हे गाणे ध्वनिमुद्रित झाले. हा पॅटर्न निमति राजेंद्रकुमार दिग्दर्शक महेश भट यांना इतका आवडला की, त्यांनी चित्रपटातदेखील हे गाणे पंकज उधास यांच्यावरच चित्रित केले.
 
-धनंजय कुलकर्णी
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Channel 

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter