हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या ॲक्शन आणि थ्रिलर चित्रपटांची लाट असताना, 'गुस्ताख इश्क' हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एका हळुवार झुळकीसारखा आला आहे. दिग्दर्शक विभू पुरी आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा (निर्माता) यांनी या चित्रपटाद्वारे ९० च्या दशकातील जुन्या दिल्लीची संस्कृती आणि उर्दू साहित्याचा गोडवा पुन्हा एकदा पडद्यावर आणला आहे.
चित्रपटाची कथा
ही कथा आहे ९० च्या दशकातील. जुन्या दिल्लीत राहणारा नवाबुद्दीन सैफुद्दीन रहमान उर्फ बब्बन (विजय वर्मा) आपल्या वडिलांचा तोट्यात चाललेला प्रिंटिंग प्रेस वाचवण्यासाठी धडपडत असतो. प्रेसला पुन्हा सुगीचे दिवस आणण्यासाठी त्याला एका दर्जेदार साहित्याची गरज असते. या शोधात त्याला पंजाबमध्ये अज्ञातवासात राहणाऱ्या एका महान पण प्रसिद्धीविमुख कवीचा, अझीझ बेग (नसीरुद्दीन शाह) यांचा शोध लागतो.
अझीझ बेग यांचे मन जिंकून त्यांची शायरी प्रकाशित करण्यासाठी बब्बन पंजाबला जातो. तिथे तो अझीझ यांचा शिष्य (शागिर्द) बनतो. पण या प्रवासात तो अझीझ यांची मुलगी मन्नत (फातिमा सना शेख) हिच्या प्रेमात पडतो. साहित्य, प्रेम आणि लपवलेले हेतू याभोवती ही कथा हळुवारपणे उलगडत जाते.
.jpg)
अभिनय
चित्रपटाचा खरा प्राण म्हणजे नसीरुद्दीन शाह. एक लहरी, तत्वनिष्ठ आणि जुन्या काळातील कवी त्यांनी ज्या ताकदीने उभा केला आहे, त्याला तोड नाही. त्यांची संवादफेक आणि देहबोली पाहणे ही एक पर्वणी आहे.
नेहमी गंभीर किंवा नकारात्मक भूमिकांमध्ये दिसणारा विजय वर्मा इथे चक्क रोमँटिक हिरोच्या भूमिकेत दिसतो. त्याचा हा बदल सुखद धक्का देणारा आहे. त्याने नवाबुद्दीनची घालमेल आणि प्रेम उत्तमरीत्या साकारले आहे.
मन्नतच्या भूमिकेत फातिमा सुंदर दिसते आणि तिने आपल्या संयत अभिनयाने पात्राला न्याय दिला आहे.सहाय्यक भूमिकेत असूनही शारीब हाश्मी लक्षात राहतात.
संगीत आणि दिग्दर्शन
चित्रपटाचे संगीत विशाल भारद्वाज यांनी दिले असून गीते गुलजार यांनी लिहिली आहेत. 'उल जलूल इश्क' सारखी गाणी आणि शेरो-शायरीने नटलेले संवाद चित्रपटाच्या वातावरणात वेगळीच जादू निर्माण करतात. दिग्दर्शक विभू पुरी यांनी सेट डिझाईन आणि वेशभूषेच्या माध्यमातून ९० च्या दशकातील वातावरण हुबेहूब उभे केले आहे.
.jpg)
का पाहावा?
जर तुम्हाला जुन्या काळातील 'मुस्लिम सोशल' म्हणजे मुस्लीम सामाजिक सांस्कृतिक जीवनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जॉनरचे चित्रपट, उर्दू भाषेचा लहेजा, शायरी आणि संथ गतीने फुलणारा रोमान्स आवडत असेल, तर 'गुस्ताख इश्क' तुम्हाला नक्कीच आवडेल. हा चित्रपट आजच्या वेगवान काळातील 'इन्स्टंट प्रेमा'च्या पलीकडे जाऊन 'इश्क'ची खरी नजाकत पेश करतो.
'गुस्ताख इश्क' हा प्रत्येकासाठी कदाचित नसेल, पण ज्यांना साहित्याची आणि निवांत सिनेमाची आवड आहे, त्यांच्यासाठी हा चित्रपट एक नजराणा आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -