"मी अर्धा हिंदू, अर्धा मुस्लिम, पण पूर्ण माणूस! - इशान खट्टर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 d ago
अभिनेता इशान खट्टर
अभिनेता इशान खट्टर

 

बॉलिवूड अभिनेता इशान खट्टर सध्या त्याच्या आगामी 'होमबाऊंड' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची भारताची 'ऑस्कर'साठी अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत इशानने आपली धार्मिक ओळख आणि भारताच्या संस्कृतीबद्दल केलेले विधान सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

"मी अर्धा हिंदू आहे आणि अर्धा मुस्लिम आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे मी पूर्ण माणूस आहे," असे इशानने म्हटले आहे.

इशानचे पालनपोषण एका बहुसांस्कृतिक वातावरणात झाले आहे. त्याची आई अभिनेत्री नीलिमा अझीम आणि वडील राजेश खट्टर आहेत. तसेच, अभिनेता शाहिद कपूर हा त्याचा सावत्र भाऊ आहे. आपल्या या पार्श्वभूमीचा उल्लेख करताना तो म्हणाला, "माझ्यासाठी हीच भारताची खरी कल्पना आहे. जेव्हा तुम्ही अशा घरात वाढता, जे सर्वसमावेशक, धर्मनिरपेक्ष आणि मोकळ्या विचारांचे असते, तेव्हा तुम्ही माझ्यासारखे घडता. मी लहानपणापासून मंदिरे, मशिदी आणि चर्चमध्ये जात आलो आहे. या सर्व धर्मांचे आणि संस्कृतींचे सौंदर्य मी अनुभवले आहे."

भारताची ताकद : संमिश्र संस्कृती

इशानच्या मते, हा बहुलवाद (Pluralism) किंवा धर्मनिरपेक्षता हीच भारताची खरी ताकद आहे. तो म्हणाला, "आपण एक अत्यंत कार्यक्षम लोकशाही आहोत. जेव्हा तुम्ही न्यूयॉर्क किंवा लंडनसारख्या शहरात जाता, तेव्हा तिथे विविध संस्कृतींचा मिलाफ दिसतो. तीच प्रगतीची खूण आहे. समाजात जेव्हा वेगवेगळे दृष्टिकोन आणि माणसे एकत्र येतात, तेव्हाच खरा विकास होतो."

भारताने आपली ही ओळख जपून ठेवावी, अशी आशा त्याने व्यक्त केली. "हे आपल्या देशाचे सौंदर्य आहे आणि ते आपल्यात नैसर्गिकरित्या रुजलेले आहे. ते कोणावरही लादलेले नाही. मला मनापासून वाटते की आपण हे टिकवून ठेवले पाहिजे."

'होमबाऊंड' : मैत्री आणि संघर्षाची कथा

नीरज घायवान दिग्दर्शित 'होमबाऊंड' हा चित्रपट २०२५ च्या ऑस्करसाठी 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट' श्रेणीत स्पर्धा करणार आहे. यात इशानने शोएब नावाच्या एका मुस्लिम मुलाची भूमिका साकारली आहे, ज्याची चंदन (विशाल जेठवा) या दलित मुलाशी घट्ट मैत्री असते. ही कथा २०२० मध्ये 'द न्यूयॉर्क टाईम्स'मध्ये बशारत पीर यांनी लिहिलेल्या एका स्तंभावर आधारित आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना इशान म्हणाला, "चित्रपटात दाखवलेली मैत्री खूप सुंदर आणि प्रतीकात्मक आहे. जेव्हा व्यवस्था तुम्हाला परिघाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न करते, तेव्हा एकमेकांशी जोडले जाणे हाच एक मूक प्रतिकार असतो."

हा चित्रपट केवळ हिंदू-मुस्लिम मैत्रीपुरता मर्यादित नाही. "ही दोन उपेक्षित मुलांची गोष्ट आहे, जे एकमेकांचे दुःख आणि अडथळे समजून घेतात. मला आनंद आहे की हा चित्रपट संवादाला चालना देत आहे, कारण पुढे जाण्याचा तोच एकमेव मार्ग आहे," असे इशानने सांगितले.

हॉलिवूड कनेक्शन

विशेष म्हणजे, या चित्रपटामध्ये जान्हवी कपूरचीही भूमिका असून, करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने याची निर्मिती केली आहे. हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेस हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता आहेत.

"हा चित्रपट कोणताही राजकीय पवित्रा घेत नाही किंवा कोणाला कमी लेखण्यासाठी भाषण देत नाही. हा वाद नाही, तर हा एक संवाद आहे," असे इशानने स्पष्ट केले.