बॉलिवूडमध्ये सुपरडुपर हिट ठरलेल्या 'बॉर्डर' या चित्रपटाचा सिक्वल 'बॉर्डर-२' या नावाने रिलीज होणार असून, या चित्रपटाचे गाणे लिहिण्यासाठी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना विचारणा करण्यात आली होती, पण त्यांनी त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला होता.
आता तेच गाणे पुन्हा लिहिणे म्हणजे शुद्ध बौद्धिक दिवाळखोरी असल्याचे मत त्यांनी मांडले. भूतकाळातील रेषा पुन्हा ओढण्याऐवजी काहीतरी वेगळे नवीन निर्माण करायला हवे, असेही त्यांनी एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले.
अख्तर म्हणाले की, "एखाद्या नव्या चित्रपटासाठी तुम्हाला जुन्या गाण्याचा वापर कशासाठी करावा लागतो. जुन्या गाण्यामध्ये बदल करून तुम्ही काही तरी वेगळे सादर करू पाहात आहात. खरेतर आता तुम्ही नवे गाणे लिहायला हवे नाही तर हे मान्य करा की त्या तोडीचे काम तुम्ही करू शकत नाही. एखाद्या नव्या चित्रपटातील गाणे हे देखील नव्या धाटणीचेच असायला हवे. आता बॉलिवूडमधील संगीत हे भूतकाळातच रमताना दिसते," असे त्यांनी म्हटले आहे.
रेहमान यांचा दावा फेटाळला
ऑस्कर विजेते प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहेमान यांनी मागील आठ वर्षांमध्ये केंद्रात सत्ताबदल झाल्यापासून आपल्याला मिळणारे काम कमी झाल्याचा दावा केला होता. समाजमाध्यमात यावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
आता जावेद अख्तर यांनी त्याबाबत भाष्य केले आहे. ए. आर. रेहमान यांच्या वक्तव्याशी त्यांनी असहमती दर्शविली आहे. "चित्रपट उद्योग हा नेहमीच धर्मनिरपेक्ष राहिला आहे. अनेक मुस्लिम गायक आणि गीतकारांनी हिंदूंची भजने गायली आहेत," असे अख्तर यांनी नमूद केले.