निरंजन केसकर
शांती फाउंडेशन निर्मित आणि डॉ. सोमनाथ मुटकुळे लिखित आणि दिग्दर्शित '.... ख़तरे में है?' हे नाटक, निसार शेख यांच्या कादंबरीतील सत्य घटनेवर आधारित स्वैर नाट्यरूपांतर आहे. आजच्या सामाजिक-राजकीय वातावरणात धर्म आणि न्याय यांच्या नावाने घडणाऱ्या भीषणतेकडे ते प्रामाणिकपणे बोट दाखवतं.
नाटकाची चौकट एका कारागृहाच्या जगातून उलगडते. येथे संजय (डॉ. सोमनाथ मुटकुळे) हा एक सकितिक पात्र आहे. महाभारतातील संजयप्रमाणे 'दिव्यदृष्टी' असलेला, जो दोन पोलिसांना त्यांच्या विभागात घडणाऱ्या गोष्टींचे प्रतिबिंब दाखवतो. याच दृश्यांमध्ये टीव्हीवर गृहमंत्री बापूसाहेब (राजन झांबरे) दिसतात. ज्यामुळे सत्ता-यंत्रणेचे दडपण अधिक स्पष्ट जाणवतं. संजयचं विधान सारखे प्रश्न विचारत राहतं. "माणूस देतं का कोणी.. माणूस? न्याय देतं का कोणी.. न्याय?"
या प्रश्नांच्या मध्यभागी उभा आहे इस्लाम (ज्ञानेश्वर वर्षे) एक साधा, मेहनती कामगार, ज्याच्यावर RDX, दहशतवाद अशा आरोपांची जबाबदारी जबरदस्ती ढकलली जाते. चौकशीदरम्यान त्याच्यावर होणारा अत्याचार, त्याच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि गुन्हा कबूल करण्यास लावलेली हिंसा, या सर्वांचे चित्रण नाटक प्रभावीपणे करते. इस्लामची प्रेयसी जुबेदा (विजया मांडे) त्याच्यावरची निष्ठा आणि आशा टिकवून ठेवताना दिसते आणि हे क्षण नाटकात मानवी उब राखतात.
नाटकात महत्त्वाचा टप्पा म्हणजे न्यायालयातील दृश्ये. अॅड. साटम (दिनेश भाने) आणि अॅड. कुरैशी (राजू अत्तार) यांच्या वादविवादातून सत्य आणि खोटं कसं मिसळलं जातं याचं चित्रण नेमकं उभं राहतं. कोळसेकर, सोनकांबळे, हानिफ पठाण, इन्स्पे. शिके आदी साक्षीदार (विठ्ठल शिंदे, प्रवीण घुले, उदय परदेशी, दीपक टाक) एकामागून एक हजर होत जातात आणि त्या साक्षांमधल्या विरोधाभासांमधून पोलिस तपासातील छिद्रं उघड होऊ लागतात.
विशेषतः स्वामी (संजय नवले) आणि राघवेंद्र (सुनील भांडगे) यांच्या साक्षींमधून इस्लाम हा फक्त बांधकाम करणारा कलाकार/कारागीर होता आणि ‘कलाकाराला जात-धर्म नसतो’ हा विचार शांतपणे पण प्रभावीपणे पुढे येतो.
तांत्रिक बाजूंवर नजर टाकली तर प्रोजेक्टरचा वापर करून दाखवलेली 'दिव्यदृष्टी' ही कल्पना अतिशय प्रभावी जाणवते. विशेषतः छुप्या कॅमेऱ्याने टिपलेला व्हिडिओ आणि त्या दृश्यात दिसणारे इन्स्पेक्टर सावंत (संदीप कोकणे) आणि रसूल भंगारवाला (वसंतराव बंदावणे) यांचे क्षण कथानकाची वास्तवता तीव्र करतात. नेपथ्य (ज्ञानेश्वर वर्षे व प्रवीण घुले) संकल्पनेला साजेसे असले तरी, जेलच्या लोखंडी जाळीसारख्या संरचनेमुळे काही दृश्यात कलाकार स्पष्ट दिसेनासे झाले. प्रकाशयोजना (वसंतराव बंदावणे) नाटकाच्या वातावरणाशी सुसंगत होती, पण काही दृश्यात धुरकटपणामुळे कलाकार झाकले गेले.
संगीत (शंतनू घुले, यश पावसे) नाटकभर परिणामकारक होतं, पण Fade-out वेळी संगीताचा अभाव जाणवला. वेशभूषा व केशभूषा (वंदना जोशी-बंदावणे) आणि रंगभूषा (ज्योती कुलथे) पात्रांच्या पार्श्वभूमीनुसार योग्य भासतात. काही कलाकारांचे संवाद मंद ऐकू येत होते. याचे कारण काहीवेळा कलाकारांचा आवाज कमी प्रोजेक्ट होणे असू शकते, पण तरीही माईक किंवा ध्वनिव्यवस्थेची पुनर्तपासणी आवश्यक वाटते.
पण नाटकाचा मूळ विचार अतिशय परिणामकारक आहे. धर्म, न्याय आणि राजकारण यांच्या नावाने चालवली जाणारी खेळी शेवटी माणुसकीला किती ‘खतरेमे’ टाकते हे ते ठामपणे दाखवतं.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -