प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथाकार कुमार साहनी यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. माया दर्पण आणि कस्बा सारख्या वेगळ्या विषयांवरील चित्रपटांची निर्मिती करुन साहनी हे चर्चेत आले होते.
साहनी यांच्या निधनानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बऱ्याच दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. केवळ दिग्दर्शनच नाही तर एक प्रख्यात शिक्षक, पटकथाकार म्हणून देखील त्यांनी त्यांची वेगळी लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या निधनानं बॉलीवूडलाही मोठा धक्का बसला आहे. साहनी यांच्या निधनाचे वृत्त कळताच बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
माया दर्पण, तरंग, ख्याल गाथा आणि कसबा साऱख्या चित्रपटांची निर्मिती करुन साहनी लोकप्रिय झाले. त्यांचा चाहतावर्ग मोठा होता. ७ डिसेंबर १९४० रोजी लरकाना शहरात जन्म झालेल्या कुमार यांनी उद्योगधंद्यासाठी मुंबई शहराची निवड केली. या शहरातच त्यांनी पुढे त्यांच्या नावाची मोहोर उमटवली. पुण्यातील एफटीआय इन्स्टियुटमधून त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाचे धडे गिरवले होते. त्यानंतर ते फ्रान्सला गेले आणि तिथेही त्यांनी दिग्दर्शनाचे धडे गिरवले.
फ्रान्समध्ये असताना त्यांना रॉबर्ट ब्रेसन नावाच्या कलाकाराकडून मोठी प्रेरणा मिळाली. ते त्यांना आपले शिक्षक मानत असत. निर्मल वर्मा यांच्या माया दर्पण नावाच्या चित्रपटाची निर्मिती करुन सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कारही जिंकला होता. या सह त्यांच्या तरंग, ख्याल गाथा, कसबा आणि चार अध्याय सारख्या चित्रपटांचे देखील प्रेक्षकांनी कौतुक केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता.
संगीत आणि नृत्य हा साहनी यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी या चित्रपटातून वेगळ्या प्रकारे भाष्य करत समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी १९८९ मध्ये ख्याल गाथा, १९९१ मध्ये भावनाथराना चित्रपटांची निर्मिती केली होती. १९९७ मध्ये साहनी यांनी रविंद्रनाथ टागोर यांच्या कादंबऱ्यांवर आधारित चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यात ओडिसी नृत्यांगना नंदिनी घोषाल यांनी महत्वाची भूमिका साकारली होती.